पुतळ्यांतून येशूंचा जीवनपट; चिनी बनावटीचे सजावट साहित्य

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

नाताळ सण काही दिवसांवर आला असून वाशीतील बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारात येशू व मेरी यांच्या जीवनपटाची कहाणी सांगणारे पुतळ्यांचे संच आकर्षित करीत आहेत. जन्म ते मृत्यूपर्यंतची कहाणी सांगणारे विविध प्रकारचे पुतळे ३०० ते ६ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा हेअर बॅण्डवर विविध आकारांचे सांता उपलब्ध असून त्याला अधिक मागणी आहे.

सजावटीचे साहित्यखरेदीला ग्राहकांची लगबग सुरू आहे. मात्र बाजारपेठेत मेड इन चायना वस्तू, सजावटीचे साहित्य मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. मागील वर्षी प्रत्येक सणामध्ये भारतीय बनावटीच्या साहित्यांचा पुरवठा व मागणी होती. ग्राहक तेसच विक्रेते भारतीय बनावटी वस्तूंना प्राधान्य देत होते.

यंदा मात्र बाजारात ‘मेड इन इंडियाची क्रेज कमी दिसत असून चायना मेड वस्तूच अधिक उपलब्ध आहेत. यामध्ये सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, बेल्स, चांदणी, खेळणी, सांताक्लॉज असलेले हेअर बॅण्ड, येशू व मेरी यांचे पुतळे, रोषणाई व विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध आहेत.

दर गेल्या वर्षीएवढेच

यंदा या वस्तूंचे बाजारभाव देखील गतवर्षीप्रमाणेच असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. यंदा हेअर बॅण्डवर विविध आकाराचे असलेले सांता याला अधिक मागणी असल्याचे विक्रेते शाहू पटेल यांनी सांगितले.

सांताक्लॉज : ४० ते  ७०० रुपये

ख्रिसमस ट्री : ५० ते २ हजार

रोषणाई असलेले ट्री : ५ हजार.

चांदणी : ३५ ते १००रुपये.

बेल्स : ४० ते १५० रुपये.

मॅन ५० ते ३०० रुपये.

सध्या बाजारात मेड इन चायना वस्तू, साहित्य उपलब्ध आहेत. खूप कमी प्रमाणात भारतीय बनावटीचे साहित्य उपलब्ध आहे. सर्वच वस्तूंना विशेषत: येशू पुतळ्यांना अधिक मागणी आहे.

– सुरेश गोस्वामी, विक्रेता