शेतीमालाच्या थेट विक्रीनंतरही ग्राहकांना फटका
राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट पणन करण्याची मुभा दिली असताना शेतमाल आठवडय़ानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात उतरविला जात आहे. त्यामुळे सोमवारी भाजी बाजारात ६७५ तर मंगळवारी ४४० ट्रक भरून भाजी आली. शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी दलाली आता खरेदीदारांकडून घेतली जात असल्याने त्याचा फटका अखेर ग्राहकांना बसला. स्थिती यापूर्वी होती तशी आज कायम आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चढेच असून किरकोळ बाजारात ते कमी होण्याचे नाव घेईनासे झाले आहेत.बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांकडून आठ टक्के दलाली घेत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात कमी पैसे पडत असल्याने सरकारने ही दलाली घेण्यास व्यापाऱ्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे व्यापारी ही दलाली आता घाऊक बाजारात शेतमाल खरेदी करण्यासाठी येणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांकडून वसूल करीत आहेत. व्यापाऱ्यांनी वसूल केलेली दलाली हे किरकोळ विक्रेते ग्राहकांच्या खिशातून वसूल करीत असल्याने कालचा गोंधळ बरा होता अशी स्थिती आहे. राज्यात असलेल्या किरकोळ विक्रेत्यांवर कोणतेही शासकीय नियंत्रण नसल्याने पूर्वीच्या परस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. उलट यापूर्वी केवळ वाहतुकीवर होणार खर्च व आपला नफा वसूल करणारा किरकोळ विक्रेता आता व्यापाऱ्यांना देत असलेली दलालीदेखील ग्राहकांच्या किमतीवर लावत असल्याचे दिसून येत असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चढेच आहेत. राज्यातील काही शेतकरी थेट मुंबईत शेतमाल विकण्याचा प्रयत्न करीत असून याला शासकीय यंत्रणेचे ठोस सहकार्य मिळाल्यास ग्राहकांना स्वस्त भाजी व इतर शेतमाल मिळण्याची शक्यता आहे. मात्र पालिकांची फेरीवाल्यांवर कधी संक्रांत येईल याचा नेम नसल्याने ह्य़ा थेट पणन व्यापाराला अडथळा निर्माण होत असल्याने सरकारने तशी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. भाजी बाजाराप्रमाणे कांदा बटाटा बाजारात मंगळवारी १८७ ट्रक फळबाजारात २०८ वाहने आल्याची नोंद आहे. ही आवक यापूर्वीदेखील होत होती.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2016 रोजी प्रकाशित
भाज्यांचे दर चढेच
भाजी बाजाराप्रमाणे कांदा बटाटा बाजारात मंगळवारी १८७ ट्रक फळबाजारात २०८ वाहने आल्याची नोंद आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-07-2016 at 02:07 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable prices still high in navi mumbai