पूरस्थितीमुळे शेती पाण्याखाली गेली असून भाज्यांच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. एपीएमसी बाजारात राज्यातून व परराज्यांतून होणारी भाजी व फळांची आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तुटवडा जाणवू लागला आहे. भाज्यांचे दर ३० ते ४० टक्के वाढले आहेत.

कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, सोलापूर या भागांत पूरस्थिती आहे. शेती पाण्याखाली गेल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्नाटक येथून येणाऱ्या शेतमालाच्या गाडय़ादेखील पूरस्थितीमुळे अडकल्या आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात शेतमाल कमी प्रमाणात येत आहे. बेळगावाहून येणारी आवकदेखील ठप्प आहे. भाजीपाला बाजारात नित्याने ६०० ते ७०० गाडय़ा येतात. शुक्रवारी अवघ्या ४५० ते ५०० गाडय़ा आल्या. भाजीपाल्याची राज्यातून ३०, तर परराज्यांतून ७० टक्के आवक होते. कर्नाटकमधून १५ ते ३० टक्के होणारी आवक कमी झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारात ३० ते ४० टक्के भाज्यांचे दर वाढले असल्याची माहिती घाऊक व्यापारी कैलास तांजणे यांनी दिली आहे.

पपई, सीताफळ, आंब्याची आवक घटली

एपीएमसी फळबाजारात नित्याने होणाऱ्या आवकीत ८० टक्के घट झाल्याची माहिती फळव्यापारी संजय पानसरे यांनी दिली. आज बाजारात २०० ते २५० गाडय़ाच आल्या. सध्या फळबाजारात आंबा, पपई, सीताफळ या फळांचा हंगाम सुरू आहे. कर्नाटक येथून नीलम आंबा, सीताफळ, पपई यांची आवक होत असते, तर सांगलीतून डाळिंबाची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असते. पपईच्या २५ ते ३० गाडय़ा दाखल होत होत्या, यामध्ये ५ ते १० गाडय़ा कमी झाल्या आहेत. त्यामुळे बाजारभाव वाढले असल्याचे पिंपळे यांनी सांगितले. पपईचे घाऊक बाजारात प्रतिकिलोचे दर ४० ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत.