|| विकास महाडिक

सराईत गुन्हेगारांचा शोध लावण्यापासून निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारांच्या हालचालीवर लक्ष ठेवणारे पोलिस दलातील खबरी आता कालबाह्य़ झाले आहेत. मोबाईल, विविध प्रकारचे अ‍ॅप्स आणि गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा यामुळे पोलिसांना एखाद्या गुन्ह्य़ांचा तपास करणे आता सुकर झाले आहे. काही वर्षांपूर्वी पोलिस गुन्हेगार क्षेत्रासाठी निगडीत असणारे तसेच पोलिसांना मदत करण्याच्या हेतूने काही सामाजिक कार्यकर्ते माहिती (खबरे) देण्याची कामे करीत असत. त्यांच्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘सिक्रेट फंड’ राखून ठेवला जात होता तर काही पोलिस कर्तबगारीसाठी पदरपोड करून या खबऱ्यांना सांभाळत होते.

गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी त्याच गुन्ह्य़ातील एखाद्या फुटीर गुन्हेगाराला हाताशी धरून पोलिस गुन्ह्य़ाच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न करीत होते. ही पद्धत पोलिस दलात गेली अनेक दशके सुरु आहे. त्यासाठी किरकोळ गुन्हेगारांबरोबरच समाजातील चांगले नागरिकही पोलिसांना माहिती देण्याची कामे करीत होते. मुंबई आणि आजूबाजूच्या भागात ह्य़ा खबऱ्यांचे फार मोठे जाळे विणले गेले होते. एका अधिकाऱ्यांच्या मते या भागात दीड हजार खबरी माहिती देण्याची कामे पोलिसांना करीत होते.  मुंबई, पुणे, ठाणे , नवी मुंबई या शहरात स्थानिक प्राधिकरणांनी मोक्याच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे  लावले आहेत. त्याची जोडणी पोलिसांनी नियंत्रण कक्षाला करून आहे.

मोबाइलमुळे काम सोपे

खबरी प्रत्येक निवडणुकीत पोलिसांना प्रमुख उमेदवारांच्या हालचाली, पैशांचे  व्यवहार, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सुरू असलेला प्रचार याची माहिती देत होते मात्र या खबऱ्यांवर अवलंबून राहण्याचे दिवस आता सरले आहेत. पोलिसांकडे असलेली मोबाइल यंत्रणेमुळे गुन्हेगार मोबाईल वापरत असल्यास त्याचा ठावठिकाणा लावणे पोलिसांना आता सहज शक्य होत आहे. यात काही खासगी कंपन्यांनी मोबाइलधारकाचा ठावठिकाणा सांगणारे अ‍ॅप देखील तयार केले आहेत.