संतोष सावंत, रमेश पाटील

देशी वस्त्रपरंपरेतील उबदार ‘गोधडी’ची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे आणि ती पोहोचवणारी गावे आहेत महाराष्ट्रातील. एक पनवेलमधले तळोजा आणि दुसरे वाडय़ातले हमरापूर. तळोजा गोधडी इंग्लंडची राणी जेथे खरेदीला जाते त्या हेरेड्सच्या बाजारात, तर हमरापुरची गोधडी अमेरिकेत गेली आहे.

हमरापुरी गोधडी तेथील ओमगुरुदेव महिला बचत गटाच्या महिला बनवतात, तर तळोजा गोधडी तेथील औद्योगिक वसाहतीतील अचला जोशी यांच्या लघुउद्योगातील कुशल हात तयार करतात.  पनवेलला खेटून असलेले तळोजा हे लहानसे गाव इंग्लंडमध्ये गोधडय़ांमुळे परिचित झाले आहे. इंग्लंडमध्ये ‘तळोजा क्वील्टस’ या ब्रॅण्डच्या गोधडय़ा इंग्लडची राणी ज्या प्रसिद्ध हेरेड्सच्या बाजारपेठेत खरेदीला जाते तेथे सजावटीने विक्रीसाठी ठेवल्या जातात. आकर्षक झालरने नटलेल्या या गोधडय़ा राणीच्या बाजारपेठेत भाव खाताहेत. उद्योजिका अचला जोशी यांच्यामुळे  या गोधडय़ा तेथे पोहोचल्या. परदेशातील नागरिक जास्तीतजास्त दोन हजार पौण्ड म्हणजेच एक लाख ८० हजारांपर्यंत किमतीच्या या गोधडय़ा खरेदी करतात.

अचला जोशी आज ८२व्या वर्षीही त्यांच्या तळोजातील लघुउद्योगामध्ये १२ कारागिरांसह काम करताना दिसतात. युरोपातील इंग्लड, स्वित्र्झलड यांसारख्या थंड प्रदेशाच्या देशात तळोजा गोधडय़ांना प्रचंड मागणी आहे. उद्योजिका अचला जोशी २० वर्षांपासून गोधडय़ांची निर्यात करतात. यापूर्वी उद्योगक्षेत्रात ‘वाइनलेडी’ असे नाव कमावलेल्या जोशी यांनी त्याच कारखान्यात त्यांच्या गोधडय़ांच्या दुसऱ्या छंदाला व्यापाराचे स्वरूप दिल्याने अनेक कारागिरांच्या हाताला काम आणि कलेला दाम मिळाले.

परदेशी नागरिकांना गडद रंगसंगती आवडते. भारतामधील मोठय़ा उद्योग घराण्यांतील महिलांनाही अशाच पद्धतीचे रंग आल्हाददायक वाटतात, असे अचला जोशी सांगतात. जोशी यांच्या उद्योगात एका रंगसंगतीची, डिझाईनची एकच गोधडी तयार होते. तशी गोधडी पुन्हा तयार होत नाही. म्हणजे प्रत्येक गोधडीचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते. एखाद्या व्यक्तीने एक गोधडी खरेदी केली की तशी गोधडी कोणाकडेही आढळत नाही.

वाडा तालुक्यातील दिड हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या हमरापुर गावातील ओम गुरुदेव हा महिला बचत गट कापडी पिशवी, मेकपचे साहित्य तयार करत असतो. तीन वर्षांपासून या बचत गटातील १० महिलांनी वैशिष्टय़पूर्ण गोधडय़ा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

हमरापूर गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेजमध्ये परदेशी पर्यटक येतात. महिलांनी त्यांच्यापर्यंत गोधडी पोहोचवली आणि अमेरिकेतील पर्यटकांना या गोधडीची भुरळ पडली. अमेरिकी पर्यटकांनी या बचत गटाकडून शंभरहून अधिक गोधडय़ा खरेदी केल्या. या गोधडय़ा अमेरिकेतील नागरिकांना त्यांच्या पांघरुणाहून जास्त उबदार असल्याने भावल्याचे महिलांनी सांगितले.

मुंबईतील महालक्ष्मी सरसमध्ये या बचत गटाने ३५ हजार रुपयांच्या गोधडय़ा विकल्या. बचत गटातील प्रतीक्षा पाटील, हर्षली पाटील या महिला एवढय़ावरच थांबलेल्या नाहीत, तर त्या वाडा, विक्रमगड या तालुक्यांतील अनेक गावांत जाऊ न तेथील महिलांना गोधडय़ा शिवण्याचे प्रशिक्षणही देत आहेत.

अत्यंत हलकी असलेली ही गोधडी कमी तापमानामध्ये ऊब देतात, पण अधिक तापमानामध्येही त्यांचा त्रास होत नाही. एका गोधडीसाठी ६०० ते ७०० रुपये खर्च येतो आणि तिला एक हजार ते १२०० रुपयांचा भाव मिळतो. ही गोधडी चार ते पाच वर्षे टिकते असे ओमगुरुदेव बचत गटाच्या सचिव हर्षली हितेश पाटील यांनी सांगितले.

गोधडय़ांची नावे न्यारी..

सध्या स्वित्र्झलडमध्ये उशी आणि त्यावरील आवरणाची मागणी वाढली आहे. परदेशात गोधडय़ा वारसाप्रमाणे आजी नातीला देण्याची पद्धत रुजली आहे. त्यामुळे देशात मायेची ऊब देणाऱ्या गोधडीप्रमाणे परदेशात परंपरा सांगणाऱ्या गोधडय़ा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्याची रीत आहे. गोधडी खरेदी करताना टिकाऊपणा, उबदारपणा आणि आकर्षकता अशा तिन्ही घटकांना महत्त्व दिले जाते. अचला जोशी यांनी गोधडय़ांना होळी, दिवाळी, रंगपंचमी अशी पारंपरिकनावे दिल्याने हे मराठमोळे सण परदेशात पोहचले आहेत.

आश्रमशाळा, रुग्णालयांत गोधडय़ा पुरवाव्या : सरकारी रुग्णालयातील रुग्णांना आणि आश्रमशाळा विद्यार्थ्यांना सरकारने गोधडय़ा पुरविल्या, तर ग्रामीण भागातील शेकडो बचत गटांतील हजारो महिलांना एक चांगला रोजगार मिळेल. तशा प्रकारचा प्रयत्न पालघरचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केला होता. मात्र त्यांची बदली झाल्याने तशा प्रकारचे प्रयत्न नंतर झाले नाहीत.

गोधडीला सरकारने निश्चित अशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर अनेक बचत गटांतील महिलांना कायमचा रोजगार मिळेल.

– प्रतीक्षा प्रमोद पाटील, अध्यक्षा, ओम गुरुदेव महिला बचतगट, हमरापूर, वाडा