महिनाभरापासून पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. गढूळ, हिरवेगार पाणी नळाला येत आहे. गेली तीन दिवसांपासून यात वाढ झाली आहे. या संदर्भात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. मात्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

जुलै महिन्यापासून शहरात अस्वछ पाणीपुरवठा होत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून त्यांनतरच पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगत आहेत. मग हे गढूळ पाणी कसे येते असा सवाल नागरिक करीत आहेत. या पाण्यामुळे ताप, सर्दी, खोकला, कावीळ, जुलाब, पोटदुखी हे आजार वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

असे असताना पालिका प्रशासन कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. साधे नागरिकांना पाणी उकळून प्यावे असे आवाहनही पालिकेने केलेले नाही. तीन दिवसांपासून तक्रारी वाढल्यानंतर आता जलवाहन्यांची पाहणी करण्यात येत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

बेलापूरमधील जलशुद्धीकरण केंद्र बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राबरोबर बेलापूर सेक्टर २८ येथील जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. भोकरपाडा येथे प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी जलवाहिनीद्वारे नवी मुंबईत येते. मात्र दरम्यान कुठे गळतीमुळे पाणी अस्वच्छ होण्याची शक्यता पाहता बेलापूर येथे हे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. मात्र येथील ‘क्लोरीन प्लांट’ सुरू असून देखील याचा वापर सुरू नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाणीपुरवठा अधिकारी हा प्रकल्प सुरू असल्याचा दावा करीत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. कोणत्या भागात जलवाहिन्यांना गळती आहे का? याची तपासणी सुरू आहे.     – मनोहर सोनवणे, कार्यकारी अभियंता,  पाणीपुरवठा विभाग, मोरबे धरण.