अपहरण झाल्याची पोलिस ठाण्यात खोटी तक्रार
पत्नीचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून प्रत्यक्षात पत्नीला विष देऊन ठार मारणाऱ्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. संजय सुधाकर सकपाळ (४२) असे या संशयित आरोपी पतीचे नाव असून चार महिन्यांनी त्याला वसई येथून अटक करण्यात आली आहे.
पनवेल येथील भंगारपाडा येथे राहणारी ललिता सकपाळ ही २४ सप्टेंबरला बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा भाऊ प्रकाश धुळे याने शहर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. ललिता व संजय यांना १७ वर्षांचा एक मुलगा आहे. तो पेण येथे राहतो. संजय हा भंगारपाडा येथे पारू नावाचा ढाबा चालवतो. प्रकाशने ललिता बेपत्ता झाल्याची तक्रार केल्याचे समजल्यानंतर काही क्षणात संजयने पोलिसांना तिचे अपहरण झाल्याची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. चार महिने उलटले तरीही ललिता पोलिसांना सापडत नव्हती. डिसेंबर महिन्यात पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुनील बाजारे यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी बेपत्ता व अपहरण झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केले.
ललिता यांचा पती संजय याने ललिता बेपत्ता झाल्याच्या रात्रीपासून मोबाइल फोनच्या सिम कार्डची अदलाबदली केली असल्याचे तपासात निदर्शनास आले. त्या संशयावरून बाजारे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. टी. जाधव यांना संजयच्या पाळतीवर राहण्यास सांगितले.
ललिता बेपत्ता झाल्यानंतर वेळोवेळी संजयने इतर मोबाइल फोन वापरणे व राहण्याची ठिकाणे बदलण्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
अखेर काही दिवसांपूर्वी संजय वसई येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संजयला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ललिताच्या बेपत्ता होण्यामागे संजयचा हात असल्याचे चौकशीत समोर आले. संजयने ललिताला विष पाजून तिचा खून केल्याचे त्याने कबूल केले. तसेच रात्रीच्या काळोखात तिला घराजवळच्या निर्जनस्थळी पुरल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
संजय सध्या शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. पनवेलचे तहसीलदार व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शहर पोलीस संजयच्या पत्नीचा पुरलेला मृतदेह लवकरच बाहेर काढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.