ऐरोली सेक्टर-४ मधील उद्यान व्यायाम करणाऱ्यांसाठी वरदानच ठरले आहे; परंतु येथील पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांचा वावर. जागोजागी खाद्यपदार्थ टाकलेले आणि टाइमपास करण्यासाठी येणारी तरुणांची टोळक्यांमुळे एक किलोमीटरचे अंतर असलेले उद्यान हवेशीर असले तरी काही समस्यांमुळे इथल्या अनेकांचा श्वास कोंडला जात आहे. त्यात बदल करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
डॉक्टरांनी सांगितलेय म्हणून सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकांना सकाळी उद्याने आणि खास तयार केलेले जॉगिंग ट्रॅक गाठावे लागतात; परंतु ऐरोलीतील सेक्टर- ४ मधील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली पालिकेने साकारलेल्या उद्यानात अनेकांशी स्नेहबंध जोडण्यासाठी अनेकांची पावले इकडे वळतात. काही जण इथे पोहोचल्यावर कसून व्यायामात दंगलेले असतात. काही जण फेरफटका मारण्यासाठी पावले झपाझप टाकतात. तर काहींची संथ लयीत पडत असतात. आरोग्याची काळजी घेण्याच्या विविध पद्धती असल्या तरी ‘पतंजलि योग समिती’ने इथे नि:शुल्क योग प्रशिक्षण शिबीर सुरू केले आहे. मॉर्निग वॉकसाठी आलेले अनेक नागरिक हळुहळू या समितीच्या योगासनांचे निरीक्षण करून नंतर त्यात सामील होतात. यातील संख्या आता वाढली आहे. प्रशस्त जागा ही या उद्यानाची खासियत. त्यात एक किलोमीटरचा आयताकृती जॉगिंग ट्रॅक धावपटूंना आकर्षून घेतो. उद्यानाच्या ठिकाणी असणाऱ्या जागेवर भराव टाकून या उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे.
उद्यानात लहान मुलांसाठी स्केटिंग मैदान आहे. या उद्यानांची स्वच्छता नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी शुद्ध हवेसह सुगंधी फुलांचीही सोबत आहे. मित्रांची संगत ही चांगली गोष्ट असते. अनेकजण त्यासाठी सकाळची आतुरतेने वाट पाहात असतात. एखाद्या वेळेस गटातील मित्र उद्यानातील ठरलेल्या ठिकाणी न आल्यास काहींना चुकल्यासारखे वाटते. उद्यानातील हा स्नेहमेळावा हा ऐरोलीतील अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
उद्यानातील हा चांगल्या गोष्टींचा भाग असला तरी काही गोष्टींनी अनेकांची मने दुखावली जात आहेत. उद्यानात अनेक जण कुत्र्यांसोबत फेरफटका मारण्यासाठी येतात. या वेळी त्यांचे नैसर्गिक विधी या उद्यानात पार पाडले जातात. त्यामुळे सर्वत्र दरुगधीचा सामना करावा लागत आहे. काहीजण येथे खाद्यपदार्थ घेऊन येतात. त्यामुळे सर्वत्र कचरा पडलेला असतो. यात उद्यानात वेळ घालविण्यासाठी अनेक जण रेंगाळत असतात. त्यांना काही काळानंतर मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. उद्यानात व्यायामाची उपकरणे बसविण्याची मागणीही करण्यात येत आहे. उद्यानात पिण्याच्या पाण्याची वा शौचालयाची सोयही नाही. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांची गैरसोय होते. उद्यानाशेजारी पार्किंगची सोय करण्याची मागणी करण्यात येत आहे. या सर्व सुविधा दिल्यानंतरच उद्यानाचे उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नगरसेविका हेमांगी सोनवणे यांनी केली आहे.
योग शिबीर
सर्वानी निरोगी राहवे या दृष्टिकोनातून पतंजलि योग समिती नवी मुंबईच्या वतीने नि:शुल्क प्रशिक्षण शिबीर या उद्यानामध्ये चालवण्यात येते. सकाळी ६ वाजल्यापासून ८ वाजेपर्यंत योग शिकवण्यात येते. असे योग शिक्षिका ललिता बोडगे यांनी सांगितले. योग शिकवत असताना अपुसकच वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या नजरा योगा करणाऱ्याकडे जातात. हास्यासन करत असताना होणारा आवाज बघून वॉकिंगसाठी येणारेदेखील हसण्याचा आनंद घेतात.
योग दिन
उद्यानात योग करण्यासाठी इथे मी येतो. त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते. तसेच काम करण्याची ऊर्जा मिळते. येथे आल्याने अनेकांशी स्नेहसंबध जोडले आहेत. त्याचाही आनंद झाला आहे. सकाळच्या वेळी आपोआप मॉर्निग वॉकसाठी येतो.
– ऊर्मिला धाकड
पहाटे उठायची सवय..
पहाटे लवकर उठायची सवय लागते आणि शरीरालाही शिस्त लागते. उद्यान चारही बाजूंनी खुले असल्याने शुद्ध हवा आणि प्रसन्न वातावरण असल्याने या उद्यानात व्यायाम करतो. फुलांच्या दरवळाने मन प्रसन्न होते.
– शरद वाघमारे, नागरिक