नवरात्रोत्सवासाठी कपडय़ांपासून टिपऱ्यांपर्यंत अनेक वस्तूंची जोरदार खरेदी करण्यासाठी तरुण-तरुणींची झुंबड उडाली आहे. नवरात्रीच्या काळात दांडिया खेळायला जाताना आपण वेगळे व आकर्षक दिसायला हवे यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. त्यासाठी टॅटू काढून घेण्यासाठी टॅटू पार्लर्समध्ये गर्दी होत आहे. आज घटस्थापना होत असल्याने सगळीकडे उत्सवी वातावरण आहे. दांडियासाठी साजेसे कपडे आणि त्याला सुसंगत ठरतील अशा दागिन्यांच्या खरेदीसाठी निघालेल्या तरुण-तरुणींमुळे बाजार ओसंडून वाहत आहे.
बॉडी पीअर्सिग
अंगावर टोचून घेण्याच्या आधुनिक पद्धतीला बॉडी पीअर्सिग म्हटले जाते. टॅटूप्रमाणे बॉडी पीअर्सिग शरीरावर कुठेही करता येते. पीअर्सिग जिथे करायचं, तो भाग आधी इंजेक्शन देऊन बधिर केला जातो त्यानंतर तेथे टोचून त्यात रिंग घातली जाते. साधारणपणे भुवया, हनुवटी आणि जिभेवर पीअर्सिग करण्याकडे तरुणांचा कल आहे.
ऑक्सडाईज दागिन्यांची क्रेझ
गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी जितका पोशाख महत्त्वाचा तितकेच दागिने महत्त्वाचे असतात. या दागिन्यांच्या खरेदीसाठी तरुणाईची गर्दी होत आहे. या दागिन्यांमध्ये डिझायनर्स दागिन्यांची मागणी जास्त होतेच, पण दीपिका पडुकोनच्या रामलीला स्टाइलच्या ऑक्सडाईज दागिन्यांची यंदा चलती आहे. याशिवाय सिल्व्हर, अबला, शंख, काचा आणि कवडय़ांपासून पारंपरिक पद्धतीने बनविलेले दागिने उपलबध आहेत. ऑक्सडाईज दागिन्यांची किंमत किमान ५० रुपये आहे.
पूजा साहित्यालाही मागणी
बाजारपेठांमध्ये घटस्थापनेसाठी लागणारे घट, वेताची परडी, वस्त्र, माती, वाणाचे साहित्य, कापसाचे वस्त्र, चुनरी, फले यासारखी साहित्य बाजारात उपलब्ध असून हे साहित्य ६० ते ७० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. देवीच्या शृंगारासाठी वेणी, कुंकू, कानातले अलंकार, मंगळसूत्र, मुखवटा, पैंजण, जोडवे, देवीचे मुकुट, घागरा, ओढणी, साडी, खण अशा खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत विशेष गर्दी दिसून येते. बाजारात शंभर ते अडीच हजारांपर्यंत मुखवटे उपलब्ध आहेत. पूजा साहित्य आणि हवन सामग्रीचीही विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.