27 February 2021

News Flash

मेंदूशी मैत्री : विविधतेने नटलेल्या भाषा

एखादी नवी किंवा अनोळखी भाषा शिकण्याची-आत्मसात करण्याची ही अतिशय सहज पद्धत आहे

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मेंदूच्या क्षमतेला खरोखर मर्यादा नाही. ठरवलं तर मेंदू कितीही भाषा शिकू शकतो. त्याच वेळी या भाषा परस्परांपासून वेगळ्या ठेवण्याचीही विशेष क्षमता असते. आपल्यासारख्या बहुभाषक- बहुसांस्कृतिक देशात  तर भाषाशिक्षणाच्या अपार संधी आहेत. इतर देशांना ही संधी फारशी नसते. तिथे एक-दोन भाषाच बोलल्या जातात.  पण आपल्याकडे तर वातावरणच वेगळं आणि भाषासंपन्न आहे.

आपल्या देशाच्या प्रतिज्ञेमध्ये एक वाक्य आहे- ‘माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे’- या विविध परंपरांमध्ये भाषिक परंपराही महत्त्वाच्या आहेत. आपल्या आसपास अनेक भाषा बोलणारी माणसं राहतात. ती माणसं आपापल्या घरात, त्यांच्या समाजात वावरताना त्यांच्या भाषेचा किंवा बोलीचा वापर करतात. त्यांच्यासोबत राहून ती भाषा फक्त ऐकली तरी हळूहळू समजायला लागेल. शब्दांचे-वाक्यांचे अर्थ आणि त्यातला आशय समजायला लागला की त्यातले शब्द वापरून बघावेत असं वाटायला लागेल. एखादी नवी किंवा अनोळखी भाषा शिकण्याची-आत्मसात करण्याची ही अतिशय सहज पद्धत आहे. अशा पद्धतीने भाषा शिकण्यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही आणि ती न देताही चांगल्या प्रकारे बोलणं समजतं, बोलताही येतं.

विशिष्टभाषक कुटुंबाबरोबर, मित्र-मत्रिणींबरोबर गप्पा मारल्याने भाषा ऐकली जाते, समजते, भाषेचा लहेजा समजतो. भाषा बोलण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास फार सहजपणे मिळतो. यापुढे जाऊन त्या भाषेविषयी आवड निर्माण झाली की लिपी समजून घेता येईल. अक्षरं वाचता आली की पत्रं, पुस्तकं वाचता येतील. यानंतर हवं असेल तर त्या लिपीतून लिहिण्याचा प्रयत्न करता येईल. एक नवी भाषा स्वत:हून शिकणं हा एक वेगळाच अनुभव असतो. ही भाषा शिकून त्याचा काय उपयोग असं म्हणून आहे तिथेच थांबण्यापेक्षा, भाषा कळावी, यावी यासाठी प्रयत्न करणं जास्त चांगलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 4:11 am

Web Title: about language diversity and the brain zws 70
Next Stories
1 कुतूहल : हृदयविकाराचे मर्म
2 मधुमेहामागचे इंगित
3 स्क्रीन-शिक्षण
Just Now!
X