अरॅमिड तंतूंचे गुणधर्म हे तंतूच्या बहुवारिकेतील रेणूंच्या रचनेवर अवलंबून असतात. तंतूंमधील रचनेतील स्फटिकांचे प्रमाण आणि त्यांची संरचना हे तंतूंच्या गुणधर्मासाठी महत्त्वाचे घटक आहेत. सर्वसाधारणपणे अरॅमिड तंतू हे मध्यम ते अतिउच्च तन्येतेचे असून त्यांची लंबनक्षमता कमी ते मध्यम असते. त्यांचे स्थितिस्थापकत्व मध्यम ते अतिउच्च दर्जाचे असते आणि त्यांची घनता १.३५ ग्रॅम प्रति घन सें.मी. ते १.४५ ग्रॅम प्रति घन सें. मी. इतकी असते.  मेटाअरॅमिड तंतूंमध्ये अति उच्च उष्णता व ज्वालारोधकक्षमता असते. अरॅमिड तंतूंची बाष्पशोषक क्षमता चांगली असते. हे तंतू अतिशय चांगल्या प्रतीचे रसायनरोधक असल्यामुळे त्यांच्यावर सेंद्रिय द्रावक आणि क्षारांचा काही परिणाम होत नाही. हे तंतू आम्ल आणि अल्कली यांना नायलॉनपेक्षा अधिक चांगला विरोध करतात; परंतु पॉलिस्टरपेक्षा यांची आम्ल व अल्कलीसाठी रोधकक्षमता थोडीशी कमी असते. या तंतूंची पारंपरिक पद्धतीने रंगाई अतिशय कठीण असते. हे तंतू रूढ अर्थाने वितळत नाहीत कारण उष्णेतेने वितळण्याच्या अगोदरच त्यांचे विघटन होते. हे तंतू ५००ओ ते ६००ओ से. तापमानापर्यंत टिकाव धरू शकतात आणि ते सहजपणे जळत नाहीत.या तंतूंचा उपयोग चिलखत, हेल्मेट या आघातापासून संरक्षणवस्त्रात तसेच हातमोजे, अ‍ॅप्रन, संरक्षक बूट, खेळाडूंचे बूट तसेच उच्च तापमानरोधक वस्त्रांत केला जातो.
उष्णतारोधक आणि आम्लरोधक गाळण वस्त्रे, विणलेले वाहकपट्टे आणि अरुंद कापड, स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये नदी, समुद्र यांचे काठ आणि डोंगराचा पृष्ठभाग येथील मातीची धूप रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कापड,  दोरखंड, उच्च कार्यक्षमतेचे विना-वीण कापड अशा औद्योगिक वस्तूंमध्येही अरॅमिड तंतूंचा वापर होतो.
याशिवाय या तंतूंनी मजबुतीकरण केलेले प्लास्टिक;  विमानाचे सुटे भाग, क्रीडा साहित्य, दाब पात्रे आणि इलेक्ट्रॉनिक्समधील छापील सíकट बोर्ड, औद्योगिक यंत्रांचे सुटे भाग आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे सुटे भाग यासाठी वापरले जाते. तसेच अ‍ॅसबेसटॉसला पर्याय म्हणून, इंजिनाचे गॅसकेट्स, घर्षण वस्तू उदा. गतीवरोधकाची आवरणे, क्लचचे पृष्ठभाग इत्यादी आणि  पॅकिंगसाठी हा तंतू वापरतात. त्याचप्रमाणे सीमेंटच्या मजबुतीकरणासाठी, पाइप, बांधकामामध्ये वापरण्यात येणारे पूर्वखेच दिलेले घटक तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या अन्य वस्तू इत्यादींकरिता अरॅमिड तंतूंचा वापर केला जातो.
चं. द. काणे  (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – जींद : कुशासनातून सुशासनाकडे
जींद संस्थानात राज्यकर्त्यांने ब्रिटिशांचे लांगूलचालन करणे, सामान्य जनतेची पिळवणूक केल्यामुळे लोकांनी बंड करणे, राज्यकर्त्यांने ब्रिटिशांच्या मदतीने ते बंड मोडून काढणे हे प्रत्येक राजाच्या कारकीर्दीत घडले. राजा सरूपसिंगााच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रघबीरसिंग गादीवर येताच थोडय़ाच दिवसांत गावागावातून असंतुष्ट, गरीब शेतकरी एकत्र येऊ लागले. अवाजवी शेतसारा, सरकारी भ्रष्टाचार संपविण्यासाठी काय कृती करता येईल याचा विचार करू लागले. गावांमधले चौधरी, हकीम, कासीम यांच्या नेतृत्वाने सुमारे ५० गावांमधील शोषीत गरीब शेतकऱ्यांची चळवळच उभी राहिली. तिचे रूपांतर िहसक दंगलीत होऊन बंडखोरांनी दरबारातील अधिकाऱ्यांना मारहाण केली, जींद व आसपासच्या गावांतील ठाणेदारांनाच कैदेत टाकले. त्यानंतर नेहमी घडे, तेच झाले. ब्रिटिशांच्या मदतीने मोठी फौज शेतकऱ्यांवर पाठवून बंडाचा बीमोड करण्यात राजा यशस्वी झाला. पुढे दुसऱ्याअँग्लो अफगाण युद्धात राजाने ब्रिटिशांना सनिक, युद्ध खर्च व शस्त्रास्त्रे  पुरवून मोठी मदत केली. त्याचा मोबदला म्हणून ब्रिटिशांनी रघबीरसिंगाला ‘राजा-इ-राजन’ किताब दिला. रघबीरसिंगच्या मृत्यूनंतर त्याचा  नातू रणबीरसिंग हा वयाच्या आठव्या वर्षी जींदच्या गादीवर आला. तो अल्पवयीन असल्यामुळे ब्रिटिशांनी पालक प्रशासक मंडळ (रिजन्सी) नेमले होते. त्याची कारकीर्द इ.स.१८८७ ते १९४८ अशी झाली. त्याने सनिकी शिक्षण घेऊन ब्रिटिश सन्यात मानद ब्रिगेडियरच्या पदावर काम केले. पहिल्या महायुद्धात पूर्व आफिक्रेत व दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजविरुद्ध मलेशियात रणबीरसिंग लढला. उजव्या कानाने बहिराच असलेल्या रणबीरसिंगाने कल्याणकारी प्रशासन दिले. रुग्णालये, विधवाश्रम, शाळा इत्यादी सुरू करून जींदमध्ये मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. या सुप्रशासनामुळे ब्रिटिशांनी रणबीरसिंगाला महाराजा हा किताब दिला. त्याच्या ५ पत्नींपकी जसवंत कौर (मूळची ऑलिव्ह मोनोलेस्क)रूमानियाची होती. स्वतंत्र भारतात विलीन झाल्यावर जींद संस्थान, पेप्सु या हंगामी प्रांतात आले. सध्या जींद हा हरियाणातील जिल्हा आहे.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com