आपल्या पूर्वजांचे राहणीमान, व्यवहार आणि जीवनशैली कशी होती, याचे कुतूहल मानवाला सदैव राहिलेले आहे. ते शमवते पुरातत्त्वशास्त्र (आर्किओलॉजी) ही ज्ञानशाखा. या शाखेत पुरातन तसेच ऐतिहासिक स्थळांच्या सर्वेक्षणातून आणि उत्खननातून प्राप्त झालेल्या वस्तूंचे आणि अवशेषांचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ, सिंधु संस्कृतीबद्दल हडप्पा व मोहेंजो-दारो या भूभागातील उत्खननाने मिळालेली माहिती. आधुनिक पुरातत्त्वशास्त्राची सुरुवात सतराव्या शतकात युरोपात झाली. त्याची सखोलता व विश्वासार्हता गणित आणि संख्याशास्त्र यांच्या वापराने अलीकडे वाढली आहे, हे मात्र सहसा माहीत नसते.

आदिम काळातील सापडलेल्या पदचिन्हांवरून व्यक्तीची उंची, चालण्याची किंवा धावण्याची गती पुरातत्त्वशास्त्रज्ञ गणिती पद्धतींनी काढतात. तसेच उत्खनन स्थळावरील घरे, किल्ले, प्रार्थनास्थळे अशा वास्तूंची रचना, रस्ते, पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा आदी जाळ्यांचे विश्लेषण करतो. सापडलेली नाणी व वजने यांवरून त्याकाळच्या मोजमापन परिमाणांवर प्रकाश टाकतो. सांख्यिकी पद्धतींनी नमुने घेऊन स्थळाच्या परिस्थितीबाबत अनुमान केले जाते. दोन किंवा अधिक सापडलेल्या वस्तू कितपत एकसारख्या आहेत, एकाच स्रोतातून आल्या आहेत का, हे तपासण्यासाठी परिकल्पना चाचणी (हायपोथिसिस टेस्टिंग) आणि ‘महालनोबीस अंतर’ अशा संख्याशास्त्रातील संकल्पना वापरल्या जातात. ‘सिरीएशन’ ही विशेष सांख्यिकी पद्धत पुरातत्त्वशास्त्रासाठीच विकसित केली गेली आहे.

पौराणिक, ऐतिहासिक, सागरांतर्गत आणि नागरी पुरातत्त्वशास्त्र यांच्या जोडीला ‘आर्किओमेट्री’ तसेच ‘कम्प्युटेशनल आर्किओलॉजी’ किंवा ‘आर्किओ इन्फॉर्मेटिक्स’ ही गणिती विज्ञानाचा पाया असलेली नवी शाखा उदयास आली आहे. या शाखेत संगणकाधारित भौगोलिक माहिती संयंत्रणा (जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम) आणि गणिती प्रारूपे यांचा वापर होत असल्यामुळे पुरातत्त्वशास्त्राला काहीसे विज्ञानाचे रूप आले आहे. पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासक्रमात आता गणित-सांख्यिकी पद्धतींचा समावेश भरीव प्रमाणात झालेला आहे. म्हणूनच गणिताची बैठक असलेल्या व्यक्तींना पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास करून वेगळी कारकीर्द घडवता येऊ शकते. राष्ट्रीय व अन्य शासकीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, वारसा संरक्षण संस्था, वस्तुसंग्रहालये, कलादालने यांना अशा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. याच्या जोडीला संग्रहालयशास्त्राचा (म्युझिओलॉजी) अभ्यासही गणिती व्यक्तीला उपयुक्त ठरू शकतो. खास विषयांना वाहिलेली वस्तुसंग्रहालये स्थापन होण्याचा वाढता कल बघता, वस्तुसंग्रहालयाचा अभिरक्षक (क्युरेटर), दालन मांडणीकार, नाणीश्रेणिक (ग्रेडर), मार्गदर्शक अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. थोडक्यात, गणिती विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने इतिहास, भूगोल, संगीत, क्रीडा अशा वेगळ्या विषयांत रस घेतल्यास, ती ‘हट के’ काही करू शकते. गणितातून दुसऱ्या क्षेत्रात भरारी मारणे शक्य आहे. – डॉ. विवेक पाटकर     

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org