स्वत:ला जसं आहे तसं स्वीकारणं सोपं नसतं. आपल्याला स्वत:कडून मोठमोठय़ा अपेक्षा असतात. अपेक्षा असाव्यात;  पण त्या वास्तवाच्या पायावर उभारलेल्या असाव्यात. आपलं शरीर आणि आपलं मन, हे दोघं जसे आहेत तसे असोत; ते आपले जिवलग मित्र आहेत. या मित्रांना नीट ओळखलं तर त्यांच्यात सुधारणा घडवून आणता येईल. स्वत:चा स्वभाव बदलण्याची आपली इच्छा असेल तर  घाई करून चालणार नाही. आपल्या असण्यावर आधी प्रेम करायला शिकलं पाहिजे.

स्वत:ला ओळखण्यासाठी आधी स्वत:बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. आवडी- नावडींसारखी माहिती तर यात असेलच. याशिवाय आपण स्वत:ला कितपत ओळखतो? आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारलं आहे का? आपल्या भावना आपल्याला ओळखता येतात का? भावनांच्या छटा ओळखता येतात का? भावना योग्य पद्धतीने व्यक्त करता येतात का? एखादी चमत्कारिक किंवा अनपेक्षित परिस्थिती उभी राहिली तर आपण गडबडून, गोंधळून जातो की त्यातून शांतपणाने वाट काढतो? आपली स्वत:ची-मग ती छोटी असोत किंवा मोठी – ध्येयं ठरवलेली आहेत का? आपल्याला राग आला म्हणून आपण तो व्यक्त करतो, पण त्याचे परिणाम काय होतील याचा जरासा विचार आपण करतो का?

अशा स्वरूपाचे प्रश्न आपण अनेकदा स्वगतासारखे मनाशी बोलत असतो. पण स्वत:पुरता सोयीस्कर अर्थ लावून मोकळे होतो. इथे चूक होते. ‘मी चांगली व्यक्ती आहे, सर्वाशी चांगलंच वागण्याचा माझा प्रयत्न असतो. समोरची व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने वागत नाही,’ असं आपण मनाशीच ठरवतो आणि विषय सोडून देतो. पण हा विषय सोडून द्यायचा नाही. घटनेमागची प्रामाणिक आणि खरीखुरी उत्तरं शोधायची आहेत.

जर एखाद्या प्रसंगात आपली चूक असेल तर त्यामागची कारणं शोधून काढावी लागतील. ती भावनिक बुद्धिमान होण्यातली पहिली पायरी असेल. ‘आपलंच घोडं अन जाऊ द्या पुढं’ ही म्हण माहीत असेलच. मानवी स्वभावावर ही म्हण चांगला प्रकाश टाकते. कोणत्याही प्रसंगात आपली चूक कधी नसतेच, असं समजणारी माणसं खूप असतात. अहंभाव जपणं आणि जोपासणं ही गोष्ट वेगळी. आणि याच ‘अहं’ला छान जाणून घेणं वेगळं! डॅनिअल गोलमन यांच्या मते ही पहिली पायरी अतिशय महत्त्वाची आहे.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com