02 June 2020

News Flash

मनोवेध : परिस्थितीचा स्वीकार

सारे काही निश्चित असेल तरच निश्चिंत राहता येते, हा अविवेकी समज आहे. हाच समज चिंता वाढवतो.

संग्रहित छायाचित्र

डॉ. यश वेलणकर

डॉ. अल्बर्ट एलिस यांनी स्व, इतर माणसे आणि परिस्थितीविषयी आपल्या मनात कसे अविवेकी समज असतात, हे स्पष्ट केले आहे. आपली परिस्थिती कशी असावी, हे माणसाने ठरवलेले असते. कोणतीही अनिश्चितता माणसाला अस्वस्थ करते याचे कारण सारे काही ठरवल्याप्रमाणे घडावे असे वाटत असते. पण आपण ठरवतो त्यानुसारच घडते असे नाही. प्रवासाचे नियोजन केलेले असते आणि अचानक गाडी बिघडते. एखादा सार्वजनिक कार्यक्रम निश्चित केलेला असतो आणि करोनाची साथ येते. याने झालेले आर्थिक नुकसान पेलण्याची क्षमता नसेल, तर माणूस उद्ध्वस्त होऊ शकतो. ही अनिश्चितता लक्षात घेऊनच विमा कंपन्या सुरू झाल्या. म्हणजेच माणसाने अनिश्चिततेचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सारे काही निश्चित असेल तरच निश्चिंत राहता येते, हा अविवेकी समज आहे. हाच समज चिंता वाढवतो.

विवेकनिष्ठ मानसोपचारात हा समज बदलण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या नियंत्रणात जे जे काही आहे ते करू या आणि जे नियंत्रणात नाही त्याचा स्वीकार करू या, असे प्रशिक्षण दिले जाते. असा समज बदलता आला आणि त्यामुळे चिंता निर्माण करणारे त्रासदायक विचार कमी झाले, तर ते चांगलेच आहे. ईश्वरावर भरवसा ठेवून प्रयत्न करीत राहा, हा संतांचा संदेश अनिश्चिततेचा तणाव दूर करणारा मानसोपचारच आहे. पण माणसाचे मन विचित्र आहे. चिंतेचे विचार येऊ द्यायचे नाहीत असे प्रयत्न माणूस करतो, त्या वेळी ते विचार थांबत नाहीत असा अनेकांचा अनुभव असतो. अस्वस्थता वाढवणारे विचार थांबवता येत असतील, तर ते अवश्य थांबवायचे. पण ते थांबत नसतील तर त्यांच्यावर आपले नियंत्रण नाही हे मान्य करायचे आणि त्यांचा स्वीकार करायचा. हा स्वीकार शक्य होण्यासाठी ‘अटेन्शन ट्रेनिंग’ म्हणजेच ध्यानाचा सराव आवश्यक असतो. असे विचार येत असतील त्या वेळी त्यांच्याशी झगडत न राहता आपले लक्ष शरीरावर न्यायचे. हे विचार अस्वस्थता निर्माण करणारे असल्याने शरीरात काही संवेदना निर्माण करतात. छातीवर भार जाणवतो. या संवेदनांचा साक्षीभाव ठेवून स्वीकार करायचा. त्यामुळे अस्वस्थता कमी होते. समज किंवा विचार बदलण्याचे उपाय प्रत्येक वेळी यशस्वी होतातच असे नाही, हे लक्षात आल्यानेच ध्यानाचा उपयोग मानसोपचारात होऊ लागला.

डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:07 am

Web Title: article on acceptance of the situation abn 97
Next Stories
1 कुतूहल : जागतिक स्थलांतरित पक्षी दिन
2 मनोवेध : ‘स्व’विषयी समज
3 कुतूहल : भारत जैवविविधता पुरस्कार
Just Now!
X