07 August 2020

News Flash

मनोवेध : स्नेहबंध

प्राण्यांचे कळप हे जास्तीत जास्त पन्नासेक सदस्यांना सामावून घेणारे असतात.

संग्रहित छायाचित्र

– डॉ. यश वेलणकर

मेंदूत ‘सेरोटोनिन’, ‘डोपामाइन’ आणि ‘एण्डॉर्फिन’ ही रसायने उत्साह, आनंद निर्माण करतात; तसेच ‘ऑक्सीटोसिन’ हे रसायनदेखील आनंद निर्माण करणारे संप्रेरक आहे. ‘ऑक्सीटोसिन’ हे रसायन सहवासाचा आनंद देणारे आहे. माता बाळाला स्तनपान देत असते तेव्हा हे रसायन शरीरात मोठय़ा प्रमाणात असते. प्रसूतीमध्येही त्याचे महत्त्वाचे कार्य असते. त्यामुळे पूर्वी हे स्त्रियांमध्येच असणारे लैंगिक संप्रेरक आहे असे वाटत होते, पण नंतरच्या संशोधनात हे मेंदूतील एक ‘न्युरोट्रान्समीटर’देखील आहे हे स्पष्ट झाले. ते पुरुषांच्याही मेंदूत असते आणि त्यामुळेच दुसऱ्या व्यक्तीविषयी स्नेह निर्माण होतो. ‘मी’चा ‘आम्ही’मध्ये विकास होण्यासाठी हे रसायन गरजेचे असते. संघभावना, एकमेकांना मदत करण्याची प्रेरणा यामुळे निर्माण होते. मित्र एकमेकांना सहकार्य करतात, सामूहिक कृती करतात तेव्हा हे रसायन अधिक पाझरते.

गंमत म्हणजे, हे रसायन युद्धस्थितीमध्ये शरीरात जे त्रासदायक बदल होतात, त्यांचे दुष्परिणाम कमी करते. कोणताही धोका जाणवला, की त्यापासून बचाव करण्यासाठी शरीरात युद्धस्थिती निर्माण होते. पण ती कायम राहिली तर अनेक शारीरिक, मानसिक त्रास होऊ लागतात. अशा वेळी एकमेकांचा आधार घेतला, ‘मी एकाकी नाही, समूहाचा भाग आहे’ याची जाणीव झाली, की मेंदूत हे रसायन पाझरते आणि माणसाचे शरीर-मन शांतता स्थितीत येते. माणसाच्या उत्क्रांतीमध्ये धोक्यांना तोंड देण्यासाठी समूह निर्माण करण्यात या रसायनाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीला आपल्या मनातील वेदना बोलून दाखवल्यानंतर बरे वाटते, तेव्हा हेच रसायन काम करीत असते.

माणूस कोणतीही शारीरिक शक्ती नसतानाही अन्य प्राण्यांना वरचढ ठरला, त्याचे कारण तो ज्यांनी एकमेकांना पाहिलेलेही नाही अशा व्यक्तींचे समूह निर्माण करू शकला हे आहे, असे उत्क्रांतीतज्ज्ञांचे मत आहे. प्राण्यांचे कळप हे जास्तीत जास्त पन्नासेक सदस्यांना सामावून घेणारे असतात. माणूस मात्र प्रत्यक्षात एकत्र राहात नसेल तरी वंश, भाषा, उपासना पद्धती, तत्त्वप्रणाली यांमुळे मोठे समूह निर्माण करू शकला. अमूर्त चिंतन करण्याची माणसाच्या मेंदूची क्षमता यास कारणीभूत असली तरीही, नंतर हे संघटन टिकून राहण्यासाठी, संघटनेतील इतरांविषयी आपलेपणा वाटण्यासाठी मेंदूत हे रसायन तयार होणे गरजेचे असते. मानसिक तणावाचे दुष्परिणाम कमी करायचे असतील, तर शरीरात ऑक्सीटोसिन तयार करणारे असे स्नेहबंध निर्माण करणे गरजेचे आहे.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:07 am

Web Title: article on affection abn 97
Next Stories
1 कुतूहल : खारफुटीचे अस्तित्व
2 कुतूहल : खारफुटी महोत्सव
3 मनोवेध : प्रतिबिंब
Just Now!
X