– डॉ. यश वेलणकर

माहितीवर प्रक्रिया करणे हे मेंदूचे महत्त्वाचे काम आहे. याला ‘कॉग्निशन’ म्हणता येईल. त्यामधून विचार निर्माण होतात. मेंदू ज्ञानेंद्रियांनी जगाची माहिती घेतो. कानावर एक आवाज पडतो. या आवाजाची फाइल स्मृतीत साठवलेली असेल तर तो आवाज कुणाचा आहे, हे मेंदू ओळखतो. ‘हा लतादीदींचा आवाज आहे’ हे समजते, म्हणजेच तो विचार येतो. लतादीदींचा आवाज कधी ऐकलाच नसेल अशा आफ्रिकेतील एखाद्या माणसाला हा विचार येणार नाही. त्याला हा कोणत्या तरी स्त्रीचा आवाज आहे, असा विचार येईल. म्हणजेच पूर्वीचा अनुभव आणि त्याची स्मृती यांचा उपयोग मेंदू नवीन माहितीवर प्रक्रिया करताना करतो. आपले लक्ष जेथे असते ती माहिती मेंदू प्रामुख्याने घेत असतो. बाह्य़ जगाच्या माहितीकडे लक्ष नसेल तेव्हा मेंदू स्मृतीतील माहितीवर काम करतो. भूतकाळातील आठवणींचे विचार अशा वेळी येत राहतात. बऱ्याचशा आठवणी भावनिक असतात. म्हणजे रागाचे वा भीतीचे प्रसंग पुन:पुन्हा आठवतात. त्या आठवणींत रमलो, की त्या अधिक ठळक होत जातात. भविष्यातीलही भावनिक प्रसंगांचे विचार येत राहतात. कुणाला तरी भेटल्याने वाटणारी उत्तेजना असेल वा भीती असेल, त्याच दिवास्वप्नात माणूस रमतो.

असे सतत विचारात राहणे हे चिंतारोग, औदासीन्य, मंत्रचळ अशा अनेक भावनिक आजारांचे एक कारण आहे. ते दूर करण्यासाठी व आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठीही आपले लक्ष अधूनमधून वर्तमान क्षणात आणायला हवे. म्हणजे आत्ता आवाज कोणकोणते येत आहेत, काही गंध जाणवतो आहे का, शरीरात स्पर्श कुठे जाणवतो आहे, याकडे लक्ष द्यायला हवे. असे लक्ष देतो त्या वेळी मेंदूतील ठरावीक विचारांच्या चौकटीतून आपण काही क्षण बाहेर पडतो. असे लक्ष देऊ लागतो तेव्हा जाणीव आणि आकलन यांतील सूक्ष्म फरक आपल्याला समजू लागतो. एखादा वास येतो म्हणजे जाणीव होते आणि हा वास कांदाभज्यांचा आहे हे ओळखतो, त्या वेळी त्याचे आकलन होते. आकलन झाले की विचार जन्माला येतो. कोणीही माणूस हुशार आहे, असे आपण म्हणतो, तेव्हा त्याची आकलनशक्ती चांगली असते. असे आकलन होण्यामधून विचार निर्माण होतो. मात्र हे आकलन आणि विचार प्रत्येक वेळी अचूकच असतात असे नाही. ती एक शक्यता असते. हे भान वाढवण्यासाठी ध्यानाचा सराव आवश्यक असतो.

yashwel@gmail.com