– डॉ. यश वेलणकर

माणसाच्या मेंदूत तीन पातळीवरील भावना शक्य असल्या तरी जैविक भावना जन्मत: मेंदूच्या रचनेत कोरलेल्या असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीवरील भावना मुद्दाम विकसित कराव्या लागतात. त्या विकसित करण्याचा एक मार्ग शिक्षण, संस्कार हा आहे. मात्र विचारांच्या पातळीवर एखादी गोष्ट कळली, पटली तरी त्यामुळे भावना बदलतातच असे नाही. कळते पण वळत नाही. राग कमी करायला हवा, भीती चुकीची आहे हे विचारांना पटत असले तरी बदल होत नाही. याचे कारण मेंदू संशोधनात समजले आहे. कोणताही धोका आहे हे जाणवले की अमायग्डला प्रतिक्रिया देतो. त्यामुळे राग, भीती, उदासी अशा जैविक भावना निर्माण होतात. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, एखादी गोष्ट काय आहे याचे बुद्धीला आकलन होण्यापूर्वीच अमायग्डलाला त्याचे आकलन होते आणि तो प्रतिक्रिया करतो. यासाठी विविध प्रयोग शास्त्रज्ञ करीत आहेत. एका प्रयोगात त्यांनी काही चित्रे माणसांना दाखवली. चित्र कुणाचे आहे हे ओळखणारा मेंदूतील बुद्धीशी संबंधित भाग किती वेळात सक्रिय होतो ते नोंदवले. सापाचे चित्र ओळखीचे असेल तर ते दाखवल्यानंतर हा साप आहे हे ओळखणारा सेरेब्रल कोर्टेक्समधील भाग ३५० मिनीसेकंदांत सक्रिय होतो. पण अमायग्डलाची प्रतिक्रिया मात्र खूप जलद असते. ते चित्र दृष्टीसमोर आल्यानंतर फक्त ५० मिनीसेकंदांत अमायग्डला प्रतिक्रिया करतो. एक मिनीसेकंद म्हणजे सेकंदाचा एक हजारावा भाग. ‘हा साप आहे’ हे जागृत मनाला समजण्यापूर्वीच जागृतीच्या पलीकडील मनाने, भावनिक मेंदूने त्याला प्रतिक्रिया केलेली असते. ‘कळते पण वळत नाही’ याचे कारण कळण्यापूर्वीच वळलेले असते, बुद्धीला समजण्यापूर्वीच भावनिक प्रतिक्रिया झालेली असते. अशा प्रतिक्रियेने भावनिक विचार निर्माण होत असतात. ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’ या पुस्तकात डॅनिएल काह्नेमान या नोबेल विजेत्या संशोधकाने याच दोन प्रकारच्या विचारप्रक्रियांचा ऊहापोह केला आहे. वैचारिक मेंदूला कळण्याच्या आधीच भावनिक मेंदूतून येणारी प्रतिक्रिया जाणणे हे सजगतेच्या सरावानेच शक्य होते. त्यासाठीच चिंतन चिकित्सा करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांना उपचारात ध्यानाचा समावेश आवश्यक वाटू लागला. साक्षीध्यानाच्या सरावाने सजगता वाढून भावनिक मेंदूची अतिसंवेदनशीलता कमी होते.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Can you feed ducks bread
तुम्ही बदकांना ब्रेड खायला घालू शकता का? बदकांना काय खायला द्यावे, काय नाही?
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

yashwel@gmail.com