डॉ. श्रुती पानसे

बदल हा कधीच टाळता येत नाही. बदल झालाच नसता तर काय झालं असतं, याचा विचार केला तर हे लक्षात येईल. त्यामुळे बदल होत राहतो हेच चांगलं आहे. प्रत्येक नव्या वळणावर काही चांगल्या तर काही वाईट, तर कधी संपूर्ण अनपेक्षित आपली वाट बघत असतात. त्या नव्या अनपेक्षित बदलांशी जुळवून घेणं हे कधी सोपं वाटतं तर कधी अत्यंत अवघड. कधीकधी तर जमणार नाही- जुळणार नाही, म्हणून आपण सोडूनही देतो बऱ्याच गोष्टी. खरं सांगायचं तर बदल ही एक मजेदार गोष्ट असते.

आपल्याला अनेकदा बदल हे त्रास का देतात? तर याचं कारण म्हणजे संपूर्णपणे नव्या गोष्टी, कला, वातावरण, भाषा, देश, प्रदेश, माणसं, नवीन नाती, नव्या कामांच्या जागा अशा गोष्टींच्या न्यूरॉन्सची जोडणी मेंदूमध्ये तयार झालेली असते. जोपर्यंत या जोडण्या व्यवस्थित तयार होत नाहीत तोपर्यंत बदलांचा स्वीकार आपण करत नाही. मात्र काही काळानंतर न्यूरॉन्सच्या जोडण्या तयार झाल्यावर बदल हा बदल वाटतच नाही. हे बदल इतके अंगवळणी पडतात की आपल्याला याच बदलांचा सुरुवातीला त्रास झाला होता, हे लक्षातही राहत नाही आणि जाणवतही नाही.

अनेकदा बदल झाल्यामुळे ज्या गैरसोयी निर्माण होतात त्यांचा त्रास होतो. त्यामुळे आपण बदल नाकारायचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात नवी पिढी जगण्याचा एक भाग म्हणून बदल फारच सहज स्वीकारून टाकते.

याच्या अगदी उलट असलेली गोष्ट म्हणजे रुटीन. रुटीनचेही काही फायदे नक्की असतात. रुटीन नसतं तर सगळीकडे अराजक निर्माण होऊ शकतं. घर, शाळा, ऑफिस, जेवण खाण, व्यायाम सगळीकडे रुटीनला फार महत्त्व असतं. रुटीन पाळलं तर मूल खऱ्या अर्थाने प्रगती करेल, असं त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं. पण मग त्यांच्या आयुष्यात, मोठं झाल्यावर जे अपेक्षित आणि अनपेक्षित बदल घडणारे असतील, त्या बदल सहजपणे स्वीकारतील की कुरकुर करतील? आजच मुलं दुसऱ्या जागेवर, दुसऱ्यांच्या घरी कम्फर्ट जाईल म्हणून जाणं नाकारतात. त्यामुळे दोन्हीची सवय हवी. रुटीनची आणि बदलांची.

contact@shrutipanse.com