News Flash

मेंदूशी मैत्री : उगवत्यांचं संपणं!

वास्तविक शिक्षण घेत असताना, कोणत्या तरी कारणाने जीव संपवण्याचा निर्णय घ्यावा, हा खरं तर संपूर्ण व्ययस्थेलाच काळिमा आहे

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

मेंदू हा स्वत:च्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठीचा खास अवयव आहे, म्हणूनच तो हुशार आहे.. कोणत्याही प्रसंगातून जिवाला वाचवतो!  वेदना- जखमा- आजार झाला तरी काही दिवसांत आपोआप बरं होण्याची ताकद  मेंदूत- शरीरात असताना काही जण मृत्यूला कसे कवटाळतात, हा प्रश्न फार गहन आहे.

अमुक एका परीक्षेत नापास झाल्यामुळे, विशिष्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही, कोणी रागावलं म्हणून, इंटरव्ह्य़ू चांगला झाला नाही म्हणून, ‘ती’ मुलगी नाही म्हणाली म्हणून स्वत:चा जीव द्यावासा का वाटतो? एक परीक्षा, एक इंटरव्ह्य़ू संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठं कधीच नसतं. वास्तविक प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडत असतो. स्वत:च्या अस्तित्वावर फार प्रेम करत असतो. छोटीशी मुंगीसुद्धा स्वत:च्या जिवाला जपते. एखादा धोका आला तर धावून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करते.

जन्म घेऊन ज्यांनी अजून वयाची वीसेक वर्षही पूर्ण केलेली नाहीत ती मुलं हे छोटंसं आयुष्य का संपवतात? याचा अर्थ मुलं अत्यंत ताणाखाली असतात. त्यांच्या अंतर्मनातला ताण  त्यांना सहन करता येत नाही. मुलांच्या जवळच्यांनाही जाणवत नाही.

वास्तविक शिक्षण घेत असताना, कोणत्या तरी कारणाने जीव संपवण्याचा निर्णय घ्यावा, हा खरं तर संपूर्ण व्ययस्थेलाच काळिमा आहे. अभ्यास, शिक्षण यांनी मुलांना आधार द्यायला हवा, प्रोत्साहन द्यायला हवं की पायाखालची जमीन काढून घ्यायला हवी? मुलांना आयुष्यातून उठण्याची वेळ येतेच का? प्रश्न असतातच. ते नव्याने पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात, ते प्रश्न सोडवायला शिकवलं पाहिजे.

आत्यंतिक ताणकारक विचारांमध्ये गुरफटणारी मुलं असुरक्षिततेच्या छायेत वावरतात. त्यांच्या मनाचा एक कोपरा कायम भीतीच्या सावटाखाली असतो. अशी मुलं एरवी नीट वागली, तरी त्याच्या मनावर घातक परिणाम झालेले असतात. सगळ्यांशी मिळून मिसळून राहू – बोलू शकत नाही. मोकळेपणाने कुणाशी मत्री करू शकत नाही. आत्मविश्वास कमी होतो. मनावर झालेला परिणाम शरीरावरही दिसून येतो. असे नकारात्मक परिणाम त्यांच्यावर होत असतात. या नकारात्मकतेच्या मुळाशी असलेली भावना जास्त घातक आहे ती म्हणजे स्वत्वाला बसलेला धक्का. मुलांशी आपण उपदेशविरहित संवाद करायला शिकलो, तर अशी वेळ येणार नाही.

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 12:10 am

Web Title: article on end of the rise abn 97
Next Stories
1 कुतूहल : रसायनांची नामकरणे
2 मेंदूशी मैत्री : डेन्ड्राइट्सचं जंगल
3 कुतूहल : विखुरणारा प्रकाश
Just Now!
X