25 February 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : खोटं बोलण्याचं वाढीव ओझं..

लहान मुलांनी खोटं बोलू नये यासाठी मोठी माणसं लक्ष ठेवून असतात. खोटं बोलणं हे खूपच वाईट समजलं असतं.

(संग्रहित छायाचित्र)

श्रुती पानसे

मुलं खोटं का बोलतात? मोठी माणसं खोटं का बोलतात? हे खोटं बोलणं मेंदूच्या परिभाषेत कुठे बसतं? असं म्हणतात की, खरं बोललेलं लक्षात ठेवावं लागत नाही. खोटं बोललेलं लक्षात ठेवावं लागतं. मग हे वाढीव ओझं मेंदू का स्वीकारतो?

कुठल्या तरी नकोशा प्रसंगाला तोंड द्यावं लागू नये म्हणून. किंवा कुठल्या तरी अवघड प्रसंगातून स्वत:ची किंवा इतरांची सुटका पटकन व्हावी म्हणून. स्वत:चा स्वार्थ साधायचा, या कारणासाठीही रेटून आणि जाणीवपूर्वक खोटं बोललं जातं. मोठमोठय़ा पदांवरची माणसंही असं खोटं बोलत असतात.

लहान मुलांनी खोटं बोलू नये यासाठी मोठी माणसं लक्ष ठेवून असतात. खोटं बोलणं हे खूपच वाईट समजलं असतं. मुलं खोटी बोलल्याचं सापडलं की लगेच मोठी माणसं मुलांशी मोठय़ा आवाजात, रागवून, डोळे वटारून, धमकीच्या सुरात भरपूर ओरडतात. मारतात. शिक्षा करतात. खोटं बोलल्यावर अशाच प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत, असा काही नियम आहे का? जोपर्यंत आपण असं बोलत नाही तोपर्यंत मुलं आपलं ऐकणारच नाहीत आणि खोटं बोलण्याचं थांबवून टाकतील असं काही आहे का?

अशा प्रकारची शिक्षा होईल या भीतीनेच मुलं पुढच्या प्रत्येक वेळेला खोटं बोलत नसतील हे कशावरून?  भीती दाखवली नाही तर मुलं पूर्णपणे बिघडतील, कोणाचंही ऐकणार नाहीत, त्यांना कसलंही वळण लागणार नाही, ते कायम खोटंच बोलतील हे आपण गृहीत धरून चाललो आहोत का?

आपल्या घरातली मोठी माणसं किंवा शिक्षक आपण कसे वागलो तर नाराज होतात, कसे वागलो तर रागावतात, याचा अंदाज मुलांना आलेला असतो. तर्क आणि विश्लेषण यासाठी बुद्धी त्यांना मदत करते. त्यामुळे ते एखाद्या प्रश्नाने आधीच सावध  होतात आणि सुटकेसाठी खोटं बोलू बघतात. मुलं खोटं बोलत आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांना न रागवता किंवा ओरडता योग्य प्रकारे विषय वळवला, मुलांना असं का करावंसं वाटलं हे जाणून घेतलं तर मुलं पुढच्या वेळी खोटं बोलणार नाहीत किंवा खोटं बोलणं टाळता येईल का हे नक्की बघतील. खोटं बोलण्याचं वाढीव ओझं मेंदू स्वीकारणार नाही.

contact@shrutipanse.co

First Published on May 22, 2019 12:11 am

Web Title: article on increasing burden of lying speech
Next Stories
1 कुतूहल : फर्माचे अंतिम प्रमेय
2 फिबोनास्सीची क्रमिका
3 मेंदूशी मैत्री : शिक्षा- कॉर्टिसॉलचे कारण!
Just Now!
X