– डॉ. यश वेलणकर

माणसाचे बाळ लहानपणी प्राण्यांच्या सहवासात राहिले तर नंतर माणसासारखे चालू, बोलू, हसू शकत नाही, हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे. उत्क्रांतीच्या दृष्टीने चिम्पान्झी हा माणसाच्या सर्वात जवळचा प्राणी आहे. माणूस आणि चिम्पान्झी यांच्या पेशींतील जनुकांमध्ये केवळ तीन टक्के एवढाच फरक आहे. त्यामुळे चिम्पान्झीच्या पिल्लाला लहानपणापासून माणसासारखे वागवले तर काय होते, हे पाहणारा प्रयोग हर्बर्ट टेरेस यांनी केला. त्यासाठी १९७३ मध्ये त्यांनी चिम्पान्झीच्या १५ दिवसांच्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्याला ‘निम’ हे नाव देऊन त्याचा सांभाळ माणसाच्या बाळासारखा करू लागले. त्याला कपडे घातले, लाड केले.

सुरुवातीला निमच्या विकासाची गती माणसापेक्षा अधिक होती. दुसऱ्या महिन्यातच तो रांगू लागला, तिसऱ्या महिन्यात भिंतीला धरून उभा राहू लागला, २० महिन्यांचा झाल्यावर त्याला शी-शू कळू लागले. एक वर्षांचा असतानाच तो नर्सरीमध्ये जाऊ लागला. त्याचे स्वरयंत्र माणसासारखे नसल्याने शब्दांच्या उच्चाराची अपेक्षा न ठेवता खुणांची भाषा त्याला शिकवली जाऊ लागली. तो साडेतीन वर्षांचा असताना खुणांच्या मदतीने १२५ शब्द व्यक्त करायला शिकला, पण नंतर त्याची शिकण्याची गती मंदावली. तो केवळ जे शिकवलेले शब्द होते तेच वापरायचा. माणसाच्या बाळाच्या मेंदूत लहानपणीच सर्जनशीलता असते, त्यामुळे न ऐकलेली वाक्येदेखील ते बोलू लागते. निम चार वर्षांचा झाला तरी त्याला हे शक्य झाले नाही.

चिम्पान्झीला माणसासारखी भाषा शिकवणे शक्य नाही, हे टेरेस यांनी मान्य केले. आता निमचे शरीर आणि आडदांडपणा एवढा वाढला, की त्याला माणसाप्रमाणे घरात ठेवणे अशक्य झाले. त्यामुळे हा प्रयोग सोडून देऊन त्याला अन्य चिम्पान्झींबरोबर प्राणीसंग्रहालयात ठेवले. तेथील अधिकाऱ्यांना हे जाणवले की, अन्य चिम्पान्झींपेक्षा निमला माणसाची भाषा आणि भावना अधिक चांगल्या समजतात. २००० साली त्याचा मृत्यू झाला. एलिझाबेथ हेस यांनी निमचा घरी सांभाळ करणाऱ्यांच्या मुलाखतीवर आधारित ‘निम चिम्प्स्की : द चिम्प  व्हू वुड बी ह्य़ूमन’ नावाचे पुस्तक लिहिले. चिपान्झीच्या पिल्लाला त्याच्या आईपासून वेगळे करून असे वागवणे आणि नंतर प्राणीसंग्रहालयात प्राण्यासारखे जगायला लावणे अनैतिक आहे, अशी टीकाही या प्रयोगावर झाली. मात्र माणसाचे माणूसपण त्याच्या मेंदूतील वेगळेपणाने आहे, केवळ संस्कारांनी नाही, हे या प्रयोगाने सिद्ध झाले.

yashwel@gmail.com