– डॉ. यश वेलणकर

‘माइंडफुलनेस’ म्हणजे मनात येणाऱ्या विचारांना प्रतिक्रिया न करता त्यांचा साक्षीभाव ठेवून स्वीकार करणे, असे काही जणांना वाटते. मात्र, याच्या जोडीने शरीरातील संवेदना जाणणे आणि त्यांचा स्वीकार करणेदेखील महत्त्वाचे आहे, याचा त्यांना विसर पडतो. माणसाच्या आठवणी केवळ मेंदूत साठवलेल्या नसतात, तर सर्व शरीरात- विशेषत: हृदय आणि पोटातील अवयव येथेही असतात. त्यामुळे भूतकाळातील एखादा आघात कल्पनेने पुन्हा आठवला, तर तेथे संवेदना जाणवतात. मनातील ती स्मृती दडपून टाकलेली असली, ते विचार मनात येत नसले, तरीही ती आठवण मुद्दाम काढल्यानंतर शरीरात हृदयप्रदेशी, पोटात संवेदना जाणवतात. याचाच अर्थ त्या आठवणी तेथे असतात आणि जागृत मनात त्या नसल्या तरी सुप्त मनातून त्या गेलेल्या नसतात.

सुप्तमनाशी संपर्क करायचा असेल, तर केवळ विचारांचा साक्षीभाव पुरेसा नाही; शरीराकडे लक्ष नेणेही आवश्यक आहे. काही माणसे शरीराकडे लक्ष देत असतात, पण शरीरात जे जाणवते- म्हणजे आतडय़ांच्या हालचालीचा आवाज येतो किंवा छातीवर भार जाणवतो- त्यास घाबरून जातात. ‘हे नको’ अशी प्रतिक्रिया करीत राहतात. त्यामुळेही त्यांचा त्रास वाढतो. अशा वेळी अन्य माणसे त्यांना तिकडे लक्ष देऊ नको असा सल्ला देतात. हा सल्ला चुकीचा आहे, कारण शरीराकडे लक्ष साऱ्यांनीच द्यायला हवे. ही माणसे तसे लक्ष देत असतात; पण जे जाणवते ते वाईट अशी प्रतिक्रिया करणे त्यांनी थांबवायला हवे. सुप्तमनातील जुन्या जखमा बऱ्या करायच्या असतील, तर त्या प्रसंगाच्या आठवणीने शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना जाणून त्यांचा स्वीकार करायला हवा.

घटना घडते तेव्हा शरीरात हे बदल झालेले असतात, त्यांना भावनिक मेंदूने ‘हे नको’ अशी प्रतिक्रिया केलेली असते. त्याचमुळे त्या आठवणी साठवल्या गेलेल्या असतात. स्मरणशक्ती ही केवळ विचारस्वरूप नसते; शरीरात जे काही होते तेही मेंदू सतत जाणत असतो; हे चांगले, हे वाईट अशी प्रतिक्रिया करीत असतो. बाह्य़ घटना, विचार आणि शरीरातील संवेदना यांची एक गाठ तयार होते. प्रत्येक भावनिक प्रसंगात अशा गाठी तयार होतात. या गाठी सोडवायच्या असतील, तर केवळ विचार बदलून चालणार नाही; शरीरातील संवेदना जाणून त्यांना देत असलेली प्रतिक्रियाही बदलायला हवी. केवळ विचारात राहून चालणार नाही; शरीराकडेही लक्ष देत राहायला हवे.

yashwel@gmail.com