सुनीत पोतनीस

गेली ७० वर्षे तैवानमध्ये स्वतंत्र, स्वायत्त सरकार आणि सार्वभौमत्व प्रस्थापित असूनही चीनच्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने तैवानला  ‘राष्ट्र’ म्हणून प्रमाणित केलेले नाही, ही व्यथा तैवानवासीयांच्या मनात कायम आहे. चँग-कै-शैक यांनी चीनची मुख्य भूमी सोडून तैवानमध्ये आपले सरकार स्थापन केले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे बारा लाख समर्थक तिथे स्थायिक झाले. आज सत्तर वर्षांनी या देशाची लोकसंख्या अडीच कोटीहून अधिक आहे. चँग यांनी तैवानमध्ये मार्शल लॉ जारी केला. १९८७ पर्यंत हा मार्शल लॉ होता.

सध्या तैवानमध्ये ‘प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टी’ सत्तेवर आहे. या पक्षाच्या त्साय इंग वेन या तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत. हा पक्ष अत्यंत कट्टर ‘स्वतंत्र तैवानवादी’ समजला जातो. स्वतंत्र तैवानवादी वेन यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी चीन सतत प्रयत्न करत असतो. पण चीन जसजसा दबाव वाढवतो तसतशी तैवानची स्वातंत्र्यप्रेमी जनता व तिचे नेते अधिकाधिक कडवे होतात. चीनच्या आक्रमणाची टांगती तलवार तैवानच्या डोक्यावर कायम असूनही १९७० ते ९० या काळात तैवानने केलेली आर्थिक व औद्योगिक प्रगती विस्मयकारक आहे. तैवान हे सेमिकंडक्टर व मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे सर्वाधिक मोठे जागतिक उत्पादक आहे. इलेक्ट्रॉनिक्सची इंटिग्रेटेड सर्किट्स- म्हणजे चीप्सचे उत्पादन करणारी तैवानची तैवान सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जगातली सर्वाधिक मोठी सेमिकंडक्टर पुरवठादार कंपनी आहे. शिवाय तैवानमध्ये रसायन, तेल-शुद्धिकरण, इलेक्ट्रॉनिक्स, सिमेंट, स्टील, संचार, औषध व्यवसायही आघाडीवर आहेत. तैवानची राजधानी तैपेई हे देशाचे प्रमुख अर्थ-उद्योग केंद्र आहे.

केवळ ४०० कि.मी. लांबी आणि १४४ कि.मी. रुंदी असलेल्या आणि १५०० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा असलेल्या या छोटय़ा देशाने उच्च तंत्रज्ञान विकसित करून अल्पावधीतच जगाच्या औद्योगिक नकाशावर स्वत:ची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. यामुळे भरभक्कम अर्थव्यवस्थेच्या पायावर आज तैवान उभा आहे.

sunitpotnis94@gmail.com