– डॉ. यश वेलणकर

मानसिक आरोग्याचे तीन निकष जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केले आहेत; त्यापैकी तिसरा निकष अन्य व्यक्तींशी संपर्क साधून नाते जोडता येणे हा आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता हा त्रास असलेली व्यक्ती हेच करू शकत नाही. तुम्हाला ती माकडे आणि टोपीविक्या यांची गोष्ट आठवते आहे का? टोपीविक्याच्या टोप्या माकडांनी पळवल्या आणि आपापल्या डोक्यात घातल्या. आता त्या टोप्या परत कशा मिळवायच्या याचा विचार करीत असताना टोपीविक्याला एक कल्पना सुचली. त्याने आपल्या डोक्याची टोपी काढून खाली फेकली. ते पाहून  माकडांनीदेखील त्याच्या डोक्याच्या टोप्या काढून खाली टाकल्या. माकडाची ही नक्कल करण्याची कृती त्याच्या मेंदूतील मिरर न्युरॉन सिस्टिममुळे होते. माकडाच्या मेंदूत असते तशीच मिरर न्युरॉन सिस्टिम मानवी मेंदूतही असते. त्यामुळेच आपण  बोलायला शिकतो, दुसऱ्याच्या भावना समजू शकतो आणि प्रत्यक्ष खेळात सहभागी न होतादेखील तो खेळ पाहून आनंद घेऊ शकतो. ही सिस्टिम दुबळी असेल तर त्या व्यक्तीमध्ये स्वमग्नता हा आजार असतो असे मेंदूतज्ज्ञांना वाटते. हा आजार असणाऱ्या व्यक्तींना चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातील भावना ओळखता येत नाहीत, त्यांना दुसऱ्याची जांभई पाहून जांभई येत नाही. अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून या आजाराची लक्षणे दिसू लागतात. तिसऱ्या वर्षांनंतर निश्चित निदान करता येते. या आजाराची तीव्रता प्रत्येक मुलात कमीजास्त असते, याला ऑटिझम स्पेक्ट्रम म्हणतात. हा त्रास असलेली काही मुले मतिमंद असतात, तर काही खूप बुद्धिमान असू शकतात. या मुलात पहिले लक्षण जाणवते ते म्हणजे त्यांना ऐकू येते पण ती बोलत नाहीत. एखादाच शब्द बोलतात, त्यांना स्वत:ची वाक्ये तयार करता येत नाहीत. ती एकटीच खेळणे पसंत करतात, त्यांना हाक मारली तरी प्रतिसाद देत नाहीत. शाळेत जाऊ लागल्यानंतर ती गतिमंद आहेत असे वाटू लागते. माणसाचे सुरुवातीचे बरेचसे शिक्षण अनुकरणातून होते. असे अनुकरण करणे शक्य होत नसल्याने ही मुले मागे पडतात. स्वमग्नता पूर्णत: बरा होत नसला तरी काही कौशल्ये शिकवून त्याचा त्रास कमी करता येतो. अशी कौशल्ये ऑक्युपेशन थेरपिस्ट शिकवतात. ती शिकवताना माइंडफुलनेस थेरपीचा उपयोग होऊ शकतो.

yashwel@gmail.com