|| डॉ. यश वेलणकर

मानसिक त्रास कमी करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी साक्षीभावाने राहायचे, याचा अर्थ कोणतेच आनंद अनुभवायचे नाहीत असे नाही. माणूस सुखाचा उपभोग घेत असतो, त्या वेळी भोक्ता असतो. पंचेंद्रियांनी सुखाचा अनुभव घेता येतो. चांगले सिनेमे-नाटकांचा आनंद घेणे, प्रेक्षणीय स्थळे पाहणे हे दृष्टीचे सुख आहे. सुस्वर संगीताचा आनंद श्रवणेंद्रियाने मिळतो. सुरुची, सुगंध आणि सुखद स्पर्श आयुष्याची रंगत वाढवतात. भोक्ता होऊन त्यांचा आनंद घ्यायला हवा. आपण काही कृती करतो, त्या वेळी कर्ता असतो. माणूस खेळतो, गाणे म्हणतो, नृत्य करतो तेही आनंददायी असते. कृतीचा आनंद मिळतो, त्याला मानसशास्त्रात ‘फ्लो’ असे म्हणतात. ध्यानाच्या सरावाने ‘फ्लो’चा अनुभव सहजतेने येतो, असे संशोधन आहे.

ध्यान म्हणजे सर्व सुखांतून विरक्त होणे नाही. कर्ता आणि भोक्ता भाव अनुभवता येत नसेल, तर ते औदासीन्याचे लक्षण आहे. ते दूर करून रसिकतेने आयुष्याचा आनंद घ्यायला हवा. पण हा आनंद सदासर्वकाळ राहत नाही याचेही भान ठेवायला हवे. कोणतेही सुख सतत मिळत राहिले की, त्याचा कंटाळा येऊ  लागतो, मेंदूतील ‘डोपामाइन’ कमी झाल्याने असे होते. कंटाळा आला नाही तरी इंद्रियांची शक्ती कमी होऊ  लागते. यासाठी कोणत्याही सुखाचा उपभोग किती वेळ घ्यायचा, हे ठरवायला हवे. त्यासाठी साक्षीभाव आवश्यक असतो. तो असेल, तर ‘दिल मांगे मोअर’च्या लाटेत वाहून जायला होत नाही. पण त्यासाठी अधूनमधून साक्षीभावाचा सराव करायला हवा.

कर्ता आणि भोक्ता भाव जन्मत: असतो. बाळ जन्माला आले की लगेच दूध चोखू लागते, हसू-रडू लागते. साक्षीभाव मात्र जन्मत: नसतो. तो विकसित करावा लागतो. त्यासाठी ‘अटेन्शन’चा सराव करावा लागतो. सध्या आपण माहितीच्या समुद्रात वावरत आहोत, मात्र त्यामुळे आपले अटेन्शन, लक्ष देण्याची क्षमता दुबळी होत आहे. माणसाचे विचलित होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे. याचा परिणाम म्हणून अस्वस्थता वाढते आहे. सुखद प्रसंगातदेखील आपले चित्त थाऱ्यावर नसते. असे भरकटणारे मन आनंदी नसते. त्यामुळे उदासी घालवण्यासाठी, आनंदी होण्यासाठी ‘अटेन्शन ट्रेनिंग’ म्हणजेच ध्यानाचा सराव करायला हवा. एकाग्रता आणि समग्रता यांचा अनुभव घ्यायला हवा. आपले लक्ष कुठे आहे, हे साक्षीभावाने पाहायला हवे. त्यासाठी वेळ देणे म्हणजेच साक्षीध्यान होय!

डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com