News Flash

नवदेशांचा उदयास्त : आजचे आयव्हरी कोस्ट

जगातील सर्वाधिक मोठा कोको उत्पादक असलेल्या या देशात कोको आणि कॉफीच्या लागवडीवर तंत्रशुद्ध संशोधन सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

– सुनीत पोतनीस

फ्रान्सची वसाहत असण्याचे जोखड झुगारून ७ ऑगस्ट १९६० रोजी नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रजासत्ताक आयव्हरी कोस्टच्या अध्यक्षपदी फिलिक्स ह््युफाँ-बायग्नी हे नियुक्त झाले. फ्रेंचांच्या वसाहतकाळात आयव्हरी कोस्टची आर्थिक व्यवस्था आणि उद्योग-व्यवसायांची परिस्थिती चांगली होती. ह््युफाँ-बायग्नी यांच्या सरकारनेसुद्धा तशीच, उत्पादनाच्या ४० टक्के निर्यातीवर भर देऊन तीच व्यवस्था कायम ठेवली. कॉफी हे आयव्हरी कोस्टचे प्रमुख उत्पादन होते. पुढच्या ३० वर्षांत त्यांच्या सरकारने कॉफी, कोको, अननस आणि पामतेल यांचे उत्पादन दीडपड वाढवून आयव्हरी कोस्टला या पदार्थांचा प्रमुख जागतिक निर्यातदार बनवले. ह््युफाँ-बायग्नी हे १९६० ते १९९३ अशी ३३ वर्षे अध्यक्षपदी राहिले. इतर आफ्रिकी देश आणि फ्रान्सशी चांगले संबंध ठेवून त्यांनी देशात राजकीय, सामाजिक स्थैर्य आणले. १९९० साली झालेल्या पहिल्या बहुपक्षीय निवडणुकीतही ह््युफाँ-बायग्नी हे विजयी होऊन अध्यक्ष झाले.

परंतु पुढील काळात, विशेषत: एकविसाव्या शतकात या देशात चाललेल्या सत्तास्पर्धा, धार्मिक आणि वांशिक विद्वेषांनी डोके वर काढले. १९९९ साली झालेला लष्करी उठाव, तसेच २००२, २००७ आणि २०१० साली झालेल्या यादवी युद्धांमुळे हजारो लोक मारले जाऊन आयव्हरी कोस्टचे राजकारण ढवळून निघाले. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळले. सध्या या बहुपक्षीय अध्यक्षीय प्रजासत्ताक आयव्हरी कोस्टचे राष्ट्राध्यक्ष, गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले अलासन उताहा हे आहेत. देशाच्या अर्थकारणाचा गाडा पूर्ववत रुळावर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

फ्रेंच ही या देशाची राजभाषा. जगातील सर्वाधिक मोठा कोको उत्पादक असलेल्या या देशात कोको आणि कॉफीच्या लागवडीवर तंत्रशुद्ध संशोधन सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फ्रेंच वसाहती सरकारने ज्या पद्धतीने आयव्हरी कोस्टची अर्थव्यवस्था आणि प्रशासनाचा पाया घातला, त्याच पद्धतीने पुढच्या सरकारांनी वाटचाल केल्यामुळेच सध्या सार्वभौम आयव्हरी कोस्ट इतर पश्चिम आफ्रिकी देशांपेक्षा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे.

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:07 am

Web Title: article on todays ivory coast abn 97
Next Stories
1 कुतूहल : आर्किमिडीजची पशुसमस्या…
2 नवदेशांचा उदयास्त : आयव्हरी कोस्ट : फ्रेंच वसाहत ते नवराष्ट्र
3 कुतूहल : ‘काटकोन त्रिकोणां’चा गुणाकार?
Just Now!
X