– डॉ. यश वेलणकर

हास्य ही क्रिया सारखीच असली, तरी क्रूर हास्य आणि करुणाभावाचे हास्य यांमध्ये जाणवणारा फरक हाच सत्त्वावजय चिकित्सेतील सत्त्व, रज आणि तम गुण यांचा विचार करणे आवश्यक आहे हे स्पष्ट करणारा आहे. सत्त्व, रज आणि तम यांची लक्षणे ‘आयुर्वेद’ आणि ‘भगवद्गीता’ यांमध्ये सांगितली आहेत. त्यातील तत्त्वांचा उपयोग करून आजच्या काळातील कृतींचा विचार करता येईल. त्यांची उपयोगिता आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केली तर सर्व जगासाठी ते मार्गदर्शक होईल. त्या दृष्टीने मनातील उदासी लपवण्यासाठी केले जाणारे खोटे हास्य हे तमोगुणप्रधान, अहंकारी हास्य हे रजोगुणप्रधान आणि करुणाभावाने ‘सारे जण सुखी होवोत’ अशा भावाने केलेले हास्य हे सत्त्वगुणप्रधान, आरोग्यदायी म्हणता येईल.

अशाच प्रकारे कोणतेही काम आणि शारीरिक व्यायाम नाइलाज म्हणून उदासीने केला जात असेल तर तम; स्वत:चा अहंकार पुष्ट करण्यासाठी, महत्त्व वाढवण्यासाठी असेल तर रजोप्रधान आणि लोकांच्या गरजा भागवल्या जाण्यासाठी, त्यांचा त्रास कमी करण्याच्या हेतूने असेल तर सत्त्वप्रधान ठरते. शृंगारदेखील नाइलाजाने किंवा अनैसर्गिक असेल तर तम; केवळ स्वत:च्या सुखासाठी, दुसऱ्या व्यक्तीचा विचार न करता असेल तर रज आणि सम्यक उपभोग म्हणजे दोघांनाही सुख देणारा असेल तर सत्त्वप्रधान ठरतो. दिवसभर मनात उदासी आणि कंटाळा अधिक वेळ असेल तर तमोगुण वाढला आहे; तणाव आणि चिंता अधिक असेल तर रज वाढला आहे, असे निदान करायला हवे.

माणूस निराशेने ग्रासलेला असेल, आपले भविष्य अंध:कारमय आहे असे त्याला वाटत असेल तर तम; भविष्याची स्वप्ने असतील, पण कामाचा आनंद नसेल तर रज आणि गंतव्य स्थानाइतकाच प्रवासही आनंद देणारा असेल तर सत्त्वप्राधान्य असते. शरीरातील व्याधी आणि वेदना यांमुळे खूप व्याकुळता असेल तर तम; शरीरात काही तरी बिघडले आहे हे मान्य न करता त्याकडे दुर्लक्ष करून आजार वाढवणे हे रजोगुणाचे लक्षण आणि शरीराकडे साक्षीभावाने पाहत वास्तवाचा स्वीकार करून आवश्यक ते उपचार घेणे हे सत्त्वगुणाचे लक्षण आहे. सत्त्वावजय चिकित्सेमध्ये स्वत:मधील किंवा दुसऱ्या व्यक्तीमधील रज किंवा तम वाढला आहे हे ओळखून, त्यानुसार ध्यानातील विविध तंत्रांचा उपयोग केला जातो.

yashwel@gmail.com