03 June 2020

News Flash

मनोवेध : ‘स्व’विषयी समज

अपयश येता नये असे वाटणे स्वाभाविक आहे, पण अपयश येता‘च’ नये हा अविवेकी समज आहे.

संग्रहित छायाचित्र

डॉ. यश वेलणकर

माणूस रागावतो वा उदास होतो, त्या वेळी त्याच्या मनात त्या भावना निर्माण करणारे अनेक विचार येत असतात. ते विचार निर्माण होण्याचे कारण त्या माणसाच्या मनातील काही समज असतात. हे समज ‘स्व’विषयी, इतर माणसांविषयी व परिस्थितीविषयी असतात. एखादा विद्यार्थी परीक्षेत अपयश आल्याने उदास होतो; त्या वेळी मी सतत अचूक असलेच पाहिजे, मला अपयश कधीच येताच नये असा त्याच्या मनात दृढ समज असतो. अपयश येता नये असे वाटणे स्वाभाविक आहे, पण अपयश येता‘च’ नये हा अविवेकी समज आहे. हा ‘च’ जेवढा तीव्र असतो, तेवढी येणारी उदासी अधिक असते. ‘परफेक्शनिस्ट’ माणसांना असा राग किंवा उदासी येण्याची शक्यता अर्थातच जास्त असते. उत्तमाची आस धरायला हवी, पण पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम कृती करणे फार कमी माणसांना शक्य असते. नियमित सरावाने कोणतेही कौशल्य वाढत जाते. त्यामुळे सुरुवातीच्या काही कृती कमी गुणवत्तेच्या असू शकतात. मी यशस्वी होणार या भावनेने जीव ओतून प्रयत्न करायला हवेत, स्पर्धेत भाग घ्यायला हवा, ध्येय निश्चित करायला हवे, तेथे कामचुकारपणा नको, चलता है असा भाव नको.

पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी प्रत्येक वेळी यशोशिखर गाठता येतेच असे नाही. खेळांत, निवडणुकांत हार-जीत असतेच. उत्तम अभ्यास करूनदेखील परीक्षेत अपयश येऊ शकते. याचे भान राहिले नाही, की उदासी मनात घर करते. अशा वेळी समुपदेशक विचार करायला प्रवृत्त करून हे भान आणतो. ‘मी आटोकाट प्रयत्न केले होते- त्यामुळे मला यश मिळालेच पाहिजे,’ असा अविवेकी हट्ट असेल तर तो कसा अयोग्य आहे हे विविध उदाहरणांतून दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. विवेकनिष्ठ मानसोपचारात भूतकाळातील आघात किंवा लहानपणी असलेले वातावरण याची फार चर्चा केली जात नाही. वर्तमान स्थिती आणि भविष्यातील अपेक्षा यांचा तटस्थपणे विचार केला जातो. यश मिळण्यासाठी अनेक घटक जमून यावे लागतात. त्यातील कोणते घटक आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणते नाहीत, यांचा विचार करून आपले सारे प्रयत्न नियंत्रणात असलेल्या घटकांवर कसे लावता येतील हे पाहणे गरजेचे असते. मनातील अविवेकी समज बदलले की विचारप्रक्रिया बदलते आणि विघातक भावनांची तीव्रता कमी होते.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 12:08 am

Web Title: article on understanding the self abn 97
Next Stories
1 कुतूहल : भारत जैवविविधता पुरस्कार
2 मनोवेध : विवेकनिष्ठ मानसोपचार
3 कुतूहल : जनुके.. जैवविविधतेचे जनक!
Just Now!
X