आधुनिक पेट्रोलपंप (पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पम्प) ही एक अतिशय गुंतागुंतीची यंत्रणा आहे.यात यंत्रशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोहोंचा वापर केला जातो. यात ग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोलची मोजदाद करणारं उपकरण. यात एका बाजूनं पेट्रोल पंपात खेचलं जातं व दुसऱ्या बाजूनं ते पुढे सोडलं जातं.

पंपामध्ये दोन दंडगोलाकृती चाकं (गिअर) असतात. ही चाकं आपापल्या आसाभोवती फिरताना एकमेकांच्या भोवती फिरतात. या दोन्ही चाकांच्या विशिष्ट हालचालीमुळे यातील एका चाकाच्या वर प्रथम निर्वात पोकळी निर्माण होते व त्यामुळे त्यात ठरावीक आकारमानाचं पेट्रोल खेचलं जातं. त्यानंतरच्या स्थितीत वरील पोकळीत अडकलेलं पेट्रोल पुढे ढकललं जातं व त्याचवेळी पंपातील खालील बाजूस पोकळी निर्माण होऊ लागते. त्यानंतरच्या टप्प्यात खालची पोकळी ही ठरावीक आकारमानाच्या इंधनानं भरली जाऊ लागते. कालांतराने खालील पोकळीतलं पेट्रोल बाहेर फेकलं जाऊन वर पोकळी निर्माण होण्यास सुरुवात होते. या प्रकारे पोकळी निर्माण होणं, तिथे पेट्रोल भरणं आणि त्यानंतर ते पेट्रोल बाहेर ढकलून दिलं जाणं या क्रिया चाकांच्या वर तसेच खाली चक्राकार पद्धतीनं आलटूनपालटून होत राहतात.

चाकाच्या वरील आणि खालील पोकळीत प्रत्येकी अर्धा मिलिलिटर एवढं पेट्रोल मावेल, अशा पद्धतीने प्रमाणीकरण केलं जातं. म्हणजे दोन्ही चाकं एकमेकांभोवती एकदा फिरली की दोन्ही पोकळ्यांतील एकूण एक मिलिलिटर एवढं पेट्रोल बाहेर फेकलं जातं. चाके स्वतवरती ३६० अंश फिरल्यावर या चाकांवर बसवलेला एन्कोडर संवेदक दोन स्पंदनांच्या (पल्स) स्वरूपात विद्युत संदेश पाठवतो. आता ही चाकं जर एक हजारवेळा वर्तुळाकार फिरली तर एक हजार मिलिलिटर म्हणजे एक लिटर पेट्रोल बाहेर फेकलं जाईल आणि एकूण दोन हजार स्पंदनांची नोंद होईल. स्पंदनांची ही नोंद एका इलेक्ट्रॉनिक काउंटरद्वारे केली जाते.

जेव्हा पेट्रोल भरणारा कामगार आपल्यासमोर दिसणाऱ्या छोटय़ा पडद्यावरील आकडे बटण दाबून रिसेट करतो, तेव्हा हा इलेक्ट्रॉनिक काउंटर शून्य ही संख्या दर्शवतो. पंप सुरू झाला की एन्कोडरनं पाठवलेल्या स्पंदनांचं मायक्रो कंट्रोलरच्या (इलेक्ट्रॉनिक चिप) मेमरीत लिहिलेल्या आज्ञावलीद्वारे लिटरमध्ये रूपांतर केले जाते. प्रत्येक दोन स्पंदनांमागे पडद्यावरील पेट्रोल दर्शवणारा आकडा एक मिलिलिटरनं वाढत जातो.

पेट्रोल वितरित करताना ग्राहक आणि विक्रेता दोघांचेही नुकसान होऊ नये म्हणून हे प्रमाणीकरण फार महत्त्वाचं असतं. काही ठरावीक मुदतीनं हे प्रमाणीकरण पुनपुन्हा करून घ्यावं लागतं, कारण यंत्राच्या झीज होण्यानं बाहेर पडणाऱ्या पेट्रोलच्या मात्रेत फरक पडू शकतो!

श्रीकांत कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

गुरुदयालसिंह (१९९९)

अमृता प्रीतमनंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे पंजाबी लेखक आहेत प्रसिद्ध कादंबरीकार श्री. गुरुदयालसिंह. १९७९ ते १९९८ या कालावधीतील भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी १९९९ चा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना हिंदी लेखक निर्मल वर्मा यांच्यासह विभागून प्रदान करण्यात आला.

पंजाबमधील फरीदकोटच्या जैतो या गावी १० जानेवारी १९३३ रोजी एका निर्धन सुतार परिवारात गुरुदयालसिंह यांचा जन्म झाला. वयाच्या १२-१३ व्या वर्षी परिस्थितीवश त्यांना वडिलांच्या बढईच्या कामात मदत करावी लागल्याने शाळा सोडावी लागली. ते खूप निराश झाले. त्यांचे आयुष्य फक्त शारीरिक मेहनतीपुरते सीमित झाले. त्या कामात मेहनतीशिवाय कोणतेही आध्यात्मिक किंवा बौद्धिक तत्त्व नव्हते. शाळा सोडावी लागली, तरी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ते संपर्कात राहिले. गुरुदयालची हुशारी जाणणाऱ्या या शिक्षकांनी त्याला घरच्या घरीच आपले शिक्षण करीत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळा सोडल्यानंतर सुमारे १० वर्षांनंतर त्यांनी बाहेरून बहि:स्थ विद्यार्थी म्हणून मॅट्रीकची परीक्षा दिली. मग मॅट्रीक झाल्यावर या शिक्षकांनी त्यांना एका सरकारी प्राथमिक शाळेत नोकरी मिळवून देण्यात मदत केली. खूप कष्ट करून पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर ते लेक्चरर झाले. पंधरा वर्षांनंतर पंजाब युनिव्हर्सिटी पतियाळा येथे रीडर व पुढे प्रोफेसर झाले.

‘मढी दा दीवा’ ही त्यांची पहिली कादंबरी १९६४ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरी लेखनाने आधुनिक पंजाबी साहित्यात त्यांनी आपले विशिष्ट स्थान निर्माण केले. आदर्शवादी प्रवृत्तीपेक्षा यथार्थवादी स्वरूप लेखनाला देण्यात ते यशस्वी झाले. कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारात गुरुदयालसिंह यांनी लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यात त्यांच्या गावच्या मालवा, पटियालानातील रहिवासी, त्यांच्या समस्या, त्या समस्यांना भिडणाऱ्या व्यक्तिरेखांचे चित्रण प्रकर्षांने दिसते. सामान्य माणसाच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या श्री. गुरुदयालसिंह यांनी समाजाचा उपेक्षित आणि वंचित वर्गाला आपल्या कथासाहित्यात केंद्रस्थानी ठेवले. ग्रामीण पंजाबमधील आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा वंचित वर्गाचे चित्रण समर्थपणे आपल्या साहित्यातून केले आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com