डॉ. श्रुती पानसे

खरं तर लहान मुलांच्या मनात प्रश्नांचं मोठं भांडार असतं. याचं कारण म्हणजे त्यांच्या नजरेतून त्यांना दिसणारं जग हे पूर्णपणे नवीन असतं. त्यामुळे ‘हे असं का?’ असे असंख्य प्रश्न मनामध्ये सतत गोळा होत असतात.

हे प्रश्न विचारण्यासाठी आणि त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी योग्य माणसं आसपास असायला हवीत. समजा, काही कारणाने तशी माणसं मिळाली नाहीत तर कुतूहलाची आत्मिक प्रेरणा हळूहळू कमी होते, नाहीशी होते. याचा अर्थ ती पूर्णपणे संपत नाही, कारण आपल्याला एखाद्या गोष्टीचं कुतूहल वाटतं आहे आणि त्या कुतूहलाचं निराकरण करण्याची परिस्थिती जर आपल्या आसपास पुन्हा निर्माण झाली तर मनातलं कुतूहल पुन्हा जागतं.

या दृष्टीने जेव्हा आपण मुलांच्या कुतूहलाकडे, त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे किंवा ते प्रत्यक्ष बोलले नाहीत तरी त्यांच्या चेहऱ्यावरून दिसणाऱ्या- जाणवणाऱ्या शोधक वृत्तीकडे पाहिलं तर  आपली जबाबदारी लक्षात येईल. लहान मुलांच्या संगतीत असणारी सर्व मोठी माणसं, आई-बाबा, शिक्षक, मदतनीस या सर्वानी त्यांच्या कुतूहलयुक्त प्रश्नांना योग्य उत्तरं दिली तर हे कुतूहल जागं राहू शकतं.

कोणत्याही प्रकारच्या शिक्षणामध्ये कुतूहलाचं महत्त्व अपार आहे. हे असं का आहे? असा प्रश्न पडलाच नाही तर तो प्रश्न आणि त्याच्यापुढे निर्माण होणारी असंख्य प्रश्नांची मालिका याचं उत्तर मिळणार नाही.

‘पेडियाट्रिक रीसर्च’ या जर्नलमध्ये या संदर्भात एक लेख प्रकाशित झालेला आहे. एका संशोधनातून असं दिसून आलेलं, की आर्थिकदृष्टय़ा निम्न वर्गातील मुलांचे दोन गट केले. एका गटातील मुलांच्या मनात कुतूहल निर्माण होईल, अशा प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण केल्या. दुसऱ्या गटासाठी असं काहीही केलं नाही. यानंतर असं दिसलं की, पहिल्या गटात कुतूहलाच्या प्रेरणेमुळे त्यांचा अभ्यासातला रसही वाढला आहे. आपण एखादी गोष्ट शोधून काढतो तेव्हा त्यातून आनंद मिळतो. ज्याचं उत्तर आपल्याला माहीत नाही ते शोधून काढण्याची प्रेरणा ज्यांना मिळाली, त्या मुलांमध्ये तसा बदल दिसून आला.

वास्तविक सर्वच मुलांबरोबर – त्यातही सामाजिक- आर्थिक वंचित गटातल्या मुलांसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांनी हे समजून घेण्यासारखं आहे.

contact@shrutipanse.com