बायोगॅसमधील ज्वलनशील तत्त्व असते मेथेन हा वायू. मेथेनजनक जंतू नेहमीच विष्ठेत आढळत असल्याने विष्ठा हेच मेथेनजनक जीवाणूंचे अन्न आहे अशा गरसमजापोटी गेली सुमारे १५० वष्रे जगभर विष्ठा आणि शेण यांच्यापासूनच बायोगॅस निर्माण केला जात असे. प्रस्तुत लेखकाने २००३  साली असा मुद्दा मांडला की हे जंतू प्राण्यांच्या पोटात रहात असल्याने प्राणी जे अन्न खातात तेच या जंतूंचेही अन्न असते. हा मुद्दा लगेच जगन्मान्य झाला आणि सध्या अनेक ठिकाणी ओला कचरा, खरकटे अन्न, भाजीमंडईतला कचरा यांपासून बायोगॅस निर्माण केला जात आहे. मेथेनजनक जंतूंना ऑक्सिजन लागत नाही असाही एक गरसमज सामान्य जनतेत पसरलेला आहे. मेथेनजनक जंतू सजीव असल्याने त्यांना ऑक्सिजन लागतोच, पण ते तो हवेतून न घेता आपल्या अन्नातून घेतात आणि याच गुणधर्मामुळे ते काबरेहायड्रेटमधील ऑक्सिजन काढून घेऊन त्याचे मेथेन या हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर करतात, आणि आपल्या अन्नातील कार्बनचा या ऑक्सिजनबरोबर संयोग घडवून आणून आपल्या स्वतच्या चयनासाठी ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेमुळे बायोगॅसमध्ये त्याच्या घनफळाच्या सुमारे ४० टक्के या प्रमाणात कार्बन डायॉक्साइड मिसळलेला असतो. शुद्ध मेथेनमध्ये एल.पी.जी. इतकीच ऊर्जा सामावलेली असते, पण बायोगॅसमधील कार्बन डायॉक्साइडमुळे ती कमी होते. पण तरीही एक किलोग्रॅम बायोगॅसमध्ये जवळ जवळ एक किलोग्रॅम जळाऊ लाकडाइतकीच ऊर्जा असते. शेणापासून बायोगॅस बनविणे ही पद्धत मुळातच चुकीची असल्याने आमच्या संस्थेने खेडय़ांमध्ये वापरण्यासाठी एक नवी, हिरव्या पानांवर आधारित, बायोगॅसप्रणाली विकसित केली आहे. हिरवी पाने वापरणारी आणि प्लग फ्लो या तत्त्वावर चालणारी एक प्रणाली काही वर्षांपूर्वी बंगळूरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनेही विकसित केली होती पण तिच्यातून एक किलोग्रॅम पानांमधून केवळ ३६ लिटर बायोगॅस मिळत असे. आमच्या प्रणालीत हिरवी पाने घातल्यास प्रति किलोग्रॅम सुमारे १०० लिटर बायोगॅस मिळतो. या संशोधनामुळे हिरवी पाने हा एक नवा शाश्वत ऊर्जास्रोत आपल्याला उपलव्ध झाला आहे.
डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १४ मार्च
१९०८ > पत्रकार, कादंबरीकार गणपत खंडेराव पवार यांचा जन्म. फुलपाखरे, उषा, जुना बाजार, वंचिता (कादंबऱ्या), हवेतील मनोरे (ललित) आणि रशियन लोककथा (अनुवाद) ही पुस्तके त्यांनी लिहिली.  १९८५> नाटककार, कादंबरीकार वसंत शांताराम वरखेडकर यांचे निधन. ‘सत्तावनचा सेनानी’ सह पाच कादंबऱ्या तसेच ‘आनंदीबाई’, ‘नीरो’ ही नाटके त्यांच्या नावावर आहेत.
१९९२ > चरित्रकादंबऱ्या आणि प्रवासवर्णने लिहिणाऱ्या इंदुमती रामकृष्ण शेवडे यांचे निधन. ‘मिर्झा गालिब’, ‘बाबा नावाचा झंझावात’ (आमटे) आणि ‘आम्ही तो बदनाम’ (गोविंदपंत बुंदले) या कादंबऱ्या लिहिणाऱ्या इंदुमती शेवडे यांनी मराठी लघुकथा विषयात पीएच.डी. मिळवली होती.  
२००३ > गझल या रचनाबंधाचा दृढतापूर्वक प्रचार करणारे, महाराष्ट्राला ‘गझलेची बाराखडी’ शिकवणारे कवी सुरेश श्रीधर भट यांचे निधन. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’ आदी संग्रहांमधून, तसेच गझल-सादरीकरणाच्या कार्यक्रमांतून सुरेश भट महाराष्ट्रभर आणि बाहेरही पोहोचले, लाडके झाले. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’, ‘मल्मली तारुण्य माझे’, ‘उषकाल होता होता’ आदी त्यांची गाणीही गाजली.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : दमा : भाग १
दम्याने दमछाक झालेले दमेकरी सर्वाच्याच परिचयाचे आहेत. तोंडाला रुमाल धरलेल्या जाहिराती आपण पाहतो. ऑक्सिजनचा पंप, अ‍ॅस्थालिन, धोतऱ्याच्या विडय़ा, कनकासव, दमा कावळी, पिंपळी, धुरी, कोरफड, अश्विन पौर्णिमेला हैदराबाद किंवा अंबरनाथ यांसारख्या ठिकाणी दम्याचे औषध, असे अनेक प्रकार दमाग्रस्तांच्या परिचयाचे आहेत. जो सुचवेल तो तो उपाय माणसे करीत असतात. दर दमापेशंटगणिक उपचार आहेत. एकाचे औषध दुसऱ्याला लागू पडेलच असे नाही.
या लेखात दमा म्हणजे शास्त्रातील ‘तमक श्वास’ याचाच फक्त विचार आहे. शास्त्र क्षुद्र, तमक, ऊध्र्व, छिन्न महान असे पाच श्वासाचे दम्याचे प्रकार सांगते. ज्या विकारात माणसाला झोपावयास जमत नाही, उठून बसून रात्र काढावी लागते. कधी दिवसाही दम्याचा अ‍ॅटॅक येतो, त्याचा विचार आपण करीत आहोत.
या प्रकारचा दमा हा बऱ्याच वेळा अनुवंशिक असतो. कधी अ‍ॅलर्जीचा, कधी सर्दी-पडसे, खोकला यामुळे, कधी खराब वासामुळे, कमीअधिक श्रमाने अशी विविध कारणे दम्याची आहेत. बऱ्याच जणांचा दमा बहुधा उत्तर रात्री येतो. पावसाळय़ात ऋतुसंधीच्या काळात जास्त जणांना त्रास होतो. पुढे पुढे मात्र उलटसुलट औषधांनी व कुपथ्याने तो केव्हाही चाळवतो, बळावतो. आयुर्वेदात हा प्रकार ‘याप्य’ म्हणजे औषध पथ्यवाणी नीट ठेवले तर ताब्यात राहणारा विकार असे वर्णन आहे. दम्याच्या रोग्याने ठरवले तर पथ्यपाणी, वेळेवर जेवण, दीर्घ श्वसन व क्वचित औषध यामुळे दम्यावर जय मिळवता येतो. माझ्याकडे आजपर्यंत दम्याचे किमान पाच हजारांचे वर रुग्ण आले असतील. नेटाने ज्यांनी औषधोपचार, पथ्यपाणी केले त्यांचा दम बराचसा आटोक्यात आहे. दम्याकरिता विविध औषधे सुरू करण्याअगोदर पुदिना, आले, लसूण, ओली हळद अशी चटणी जेवणात वापरावी. तुळशीची पाने दहा, दोन मिरी दाणे दोन वेळा बारीक करून घ्यावे. काळय़ा मनुका रोज किमान तीस चावून खाव्यात. द्राक्षा फलोत्तमा!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : ‘हे झुंज नव्हे प्रमादु’
२० षटकांचे सामने हे प्रदर्शनी झुंजीचे उत्तम उदाहरण आहे. याला ट्वेन्टी-ट्वेन्टी म्हणतात. भारतातल्या या आयपीएलने जगाला नमविले आहे. गंमत अशी की, अशा प्रकारचे सामने खेळवणे म्हणजे क्रिकेटसारख्या सभ्य खेळावर डाग लागेल अशी भारतीय क्रिकेटच्या कन्ट्रोल बोर्डाची अधिकृत भूमिका होती. मग एक शकुनी आला. त्याने एक योजना आखली आणि एकदमच क्रिकेटचे सर्वेसर्वा वळले, श्रीमंत लोकांनी स्वत:च्या टीम्स बनविल्या आणि घोडे किंवा पूर्वीचे आफ्रिकेतून आणलेले गुलाम त्यांच्या धष्टपुष्टतेवर अवलंबून जसे बोली लावून विकले जात तसे खेळाडूंचे लिलाव झाले. माध्यमांना हाताशी धरून बातम्या झळकल्या. पूर्वरंगच इतका मजबूत होता की, गर्दी होणार म्हणून टेलिव्हिजनवर काही सेकंदांसाठी जाहिरातीचे भाव चक्रवाढ व्याजाने दिवसागणिक वाढले. या झुंजी बघायला जनसागर लोटले. प्रत्येक टीमने परदेशातून गोऱ्या मुलींचा तांडा आणला आणि त्या सामना चालू असताना नाचू लागल्या. स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी या अर्धनग्न मुलींबद्दल थोडीफार कुजबुज केली इतकेच. ज्या गोऱ्या देशांनी भारताला हिणवण्याचा इतिहास रचला होता त्या देशातले खेळाडू, समीक्षक आणि व्यावसायिकांनी गुडघे टेकून हजेऱ्या लावल्या. टीम्सच्या मालकिणीही होत्या. स्त्री-स्वातंत्र्याचा हा उत्तम नमुना होता. शिवाय नाचणाऱ्या मुलींप्रमाणे प्रेक्षक मालकिणींनाही बघू लागले. सामन्यानंतर पाटर्य़ा हाही कार्यक्रमाचा भाग होता. हे काळविटासारखे खेळाडू बघण्यासाठी आणि त्यांना मिठय़ा मारण्यासाठी हरिणींचा सुळसुळाट झाला. त्यामुळे छायाचित्रांचा खप वाढला. हा धंदा जसा वाढला तसा मग मूळचा जो संयोजक शकुनी होता तो डोईजड होत होता, म्हणून त्याला सुळावर चढवू अशी धमकी देऊन परागंदा करण्यात आले. या काळात जो मलिदा मिळाला त्यावर ‘खेळावर कसला कर लावता’ असे म्हणत कर देण्यास नकार देण्यात आला. प्रत्येक प्रादेशिक क्रिकेट परिषदांचे म्होरके राजकारणी मंडळी झाली. त्यातले अनेक मंत्री किंवा विरोधी पक्षांचे नेते होते. त्यांच्या हातात दुहेरी सत्ता होती. तेव्हा कर भरण्याचा प्रश्न कोण उभा करणार? आपल्या देशात धंद्यामध्ये चुरस आहे की नाही हे बघण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशन आहे. त्यांनी अहवाल दिला. एवढे अमाप पैसे आणि निरंकुश सत्ता असलेला हा क्रिकेट नावाचा धंदा देशाला घातक होईल. बटाटा वेफर ते ब्रेबर्न स्टेडियम सगळ्यांचे निर्णय हेच ठरविणार, हे योग्य नव्हे, असा तो अहवाल आहे. मी मधे दंभ हा शब्द वापरला होता, त्याचा अर्थ ढोंग आणि सोंग आहे. हा क्रिकेटचा वग एक ढोंगी सोंग आहे. यात निर्माण होणारा कृत्रिम उन्माद खेळाला आणि देशाला पैसे मिळवून देत असेलही, पण हा वग आपल्याला परवडणारा नाही. कारण यातून निर्माण होणाऱ्या वृत्ती घातकच असणार आहेत. ते हळूहळू सिद्ध होईलच.
रविन मायदेव थत्ते –  rlthatte@gmail.com