04 August 2020

News Flash

कुतूहल – कडू कारलं

‘कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडूच’ अशी एक म्हण आहे. विशेषत: एखाद्या व्यक्तीविषयी बोलताना ही म्हण आपण बरेच वेळा वापरतो.

| December 9, 2014 12:40 pm

‘कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडूच’ अशी एक म्हण आहे. विशेषत: एखाद्या व्यक्तीविषयी बोलताना ही म्हण आपण बरेच वेळा वापरतो. कळत-नकळतं आपण कारल्याच्या कडू या चवीबद्दल बोलत असतो. कारल्यामध्ये असा कोणता पदार्थ असतो की ज्यामुळे ते कडू लागतं? असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असेल.
कारलं किंवा इतर कोणताही पदार्थ कडू असल्याची जाणीव जीभ आपल्याला करून देते. जिभेच्या शेंडय़ापासून खारट चवीच्या मागच्या बाजूचा भाग असतो त्या भागात कडू चवीला प्रतिसाद देणाऱ्या पेशी जास्त प्रमाणात असतात. कारल्यासारखे कडू पदार्थ जी-प्रथिनांच्या  मदतीने चवीचे ज्ञान देतात. जी-प्रथिनं, ही प्रथिनांच्या कुटुंबातील प्रथिनं आहेत. कडू चवीच्या संवेदनांचे वहन करण्याचे काम जी-प्रथिनांतील अल्फा आणि बीटा प्रथिनं करतात. अल्फा प्रथिनं फॉस्फो-डाय-ईस्टरच्या द्विबंधांना उद्युक्त करतात. बीटा प्रथिनं पेशींच्यामधून कडू पदार्थातील कॅल्शिअम आयन सोडतात. कडू चवीची अनेक संयुग आहेत. कडू पदार्थाची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवण्याची क्रिया ही इतर चवीच्या मानानं जास्त प्रभावी असते. विषारी पदार्थ हे चवीला कडू असतात. हे पदार्थ आपल्या शरीरात जास्त  प्रमाणात जाऊ नयेत म्हणून ही यंत्रणा असावी. कारल्यात असलेल्या कॅल्शिअम या मूलद्रव्यामुळे कारलं कडू लागतं. त्याचप्रमाणे आंबट चव जशी आम्लांमुळे येते, तशी कडू चव ही उपक्षारामुळे (अल्कलॉइड्स) देखील येते. नायट्रोजन हे अल्कलॉइडमधील मूलभूत रासायनिक मूलद्रव्य आहे. याची दोन उदाहरणे म्हणजे क्विनाइन आणि कॉफीमधील कॅफेन. चहा, कॉफी, कोको या सर्व पदार्थात कॅफेन आणि थाओब्रोमीन हे कडू पदार्थ असतात. तसेच मॉर्फीन हा अफूच्या बोंडात असलेला कडू पदार्थ आहे.
खारट, आंबट, कडू, गोड या चार मूलभूत चवींबरोबर आता ‘उमामी’ या पाचव्या मोनोसोडिअम ग्लूटामेटच्या (अजिनोमोटो) चवीचाही अंतर्भाव मूलभूत चवींमध्ये केला जातो. पण आपल्याला आवडणारी तिखट ही चव धरली जात नाही, तर मिरची (कॅपसेनिन घटक) खाल्ल्याने निर्माण झालेल्या उष्णतेला जिभेवरील वेदनाग्राहक पेशींनी दिलेला तो प्रतिसाद असतो.
सुचेता भिडे (कर्जत) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – नहात धुवून घ्या..
गोष्ट जुनी म्हणजे १७ व्या शतकाच्या अखेरी आणि अठराव्या शतकाच्या आरंभीची. स्थळ व्हिएन्ना जनरल हॉस्पिटल. कथेचा नायक इग्नाझ सेमेलवाईज्. काळ युरोपातील परिवर्तनाचा. देशोदेशीच्या सीमा पार करून सर्वत्रपणे व्यावसायिकांची कार्यक्षेत्रं विस्तारित होती. इग्नाझ मूळचा हंगेरीमधला. नुकताच एक नवीन बदल तिथल्या समाजजीवनात झाला होता. बाळंतपणाकरिता मोठय़ा रुग्णालयात सोय झाली होती. व्हिएन्नाच्या या सर्वसाधारण रुग्णालयात दोन स्वतंत्र कक्ष होते. एक कक्ष होता ज्यामध्ये पारंपरिक पद्धतीने सुईणींच्या मदतीने बाळंतपणं पार पाडायची. दुसरा कक्ष डॉक्टर आणि शिकाऊ डॉक्टर सांभाळत. या दुसऱ्या कक्षात बाळंतपणानंतर मोठय़ा प्रमाणात स्त्रियांचे मृत्यू होऊ लागले. तीव्र वेदना, गर्भाशयाला सूज, ताप, उलटय़ा फेफरं आणि ओल्या बाळंतपणी लहानग्यांना मागे सोडून जगाचा निरोप घ्यायच्या.
इग्नाझ मृत्यूच्या या घाल्यानं अस्वस्थ झाला. असं का होतं याचा छडा लावला पाहिजे असा त्यानं ध्यास घेतला. त्याच्या नकळत वैज्ञानिक शोध, संशोधन आणि व्यवहाराच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रक्रियेचा त्यानं शोध लावला. अत्यंत सूक्ष्म अवलोकन, निरीक्षण, परीक्षण आणि विश्लेषण केल्याखेरीज कोणत्याही समस्येचं निवारण करता येत नाही.
इग्नाझनं लावलेल्या या वैद्यकीय संशोधनाचं महत्त्व आज वाटणार नाही, कारण त्यानं मांडलेला सिद्धान्त आज कॉमनसेन्स वाटतं. त्यात काय विशेष? असं लोकांना सहज वाटेल.
इग्नाझच्या लक्षात आलं की, डॉक्टर मंडळी आणि सुईणींच्या कार्यपद्धतीत मोठा फरक आहे. डॉक्टर मंडळी शवविच्छेदन, इतर रुग्णांची तपासणी ही कामं करून बाळंत कक्षात हजर राहत आणि कामाला सुरुवात करीत.
डॉक्टर मंडळी बाळंतपणाचे काम सुरू करण्यापूर्वी हात स्वच्छ धूत नाहीत. इथेच समस्येची मेख इग्नाझला सापडली. त्यानं प्रयोग म्हणून डॉक्टरांना हात धुवायला उद्युक्त केलं. त्यांनी ‘क्लोरिनेटेड लाइम’ नावाचं शुद्धीकरण जल वापरायला हवं असंही म्हटलं. बाळंतिणीची पहिली केस हाताळण्यापूर्वी नव्हे तर दोन केसच्या मध्ये थांबून हात स्वच्छ धुवावेत. सुरुवातीला हे सर्व नवीन कटकटीचं काम वाटे. त्यानंतर बाळंतपणाचं काम करताना एका डॉक्टरला इजा झाली आणि त्याचाही तशाच दूषितीकरणाने मृत्यू झाला. डॉक्टरांना हळूहळू हात धुण्याचं महत्त्व पटलं. पुढील दोन वर्षांत त्या विशिष्ट प्रकारच्या दूषितीकरणाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण नगण्य झालं.
१९ व्या शतकात हात धुणं आजच्या इतकं युरोपात सोपं नव्हतं. पाण्याचा प्रवाह नळातून वाहत नसे. पाणी थंड असे. क्लोरिनेटेड लाइममुळे हाताची त्वचा खराब व्हायची. परंतु इग्नाझनं आपलं म्हणणं रेटून पुढे नेलं. त्याला मुख्य विरोध झाला तो डॉक्टरांकडून. त्याची दोन मुख्य कारणं. त्या काळी बाळंतपणातील मृत्यू ही गोष्ट देवाचा शाप असं डॉक्टरांना वाटायचं. (अर्थात ही जुनी गोष्ट झाली) दुसरं कारण आपल्या चुकीमुळे अथवा अज्ञानामुळे रुग्णांचा मृत्यू होतोय, हे मान्य करायला डॉक्टरांचं मन ध्वजावत नव्हतं.
इग्नाझनं अशा विरोधाला न जुमानता आपलं वैद्यकीय संशोधन राबवलं.
गोष्ट छोटी वाटते, पण माणसाच्या प्रगतीमध्ये डोळसपणे पाहणं, तर्कशुद्ध विचार आणि सत्याचा आग्रह किती महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात, हे खरंय की नाही!!
मनमोर फुलतो तो अशा तर्कशुद्ध विचारांच्या पाठपुराव्यानं..
 डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com
        
प्रबोधन पर्व – आता राजकारणापासून मुक्तता नाही..
राजकीय नाटक नावाचा प्रकार असतो? का जी गोष्ट मुदलातच नाही, त्याची चर्चा आपण का करीत आहात असा प्रश्न कुणीही विचारू शकेल.. ‘नाटक की राजकारण। सज्ञानाही पण कळेना’ अशा थाटाचे उत्तर ह्या प्रश्नाला देता येईल. नाटक हे नाटक असते असे विधान करून, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ ह्या नाटकातील नायक त्याच्या चौकशीच्या वेळी प्रा. क्षीरसागर ह्यांना उत्तर देतो.. राजकीय, अराजकीय ह्या विवेचनाच्या कोटी (कॅटेगरीज) प्राचीन भारतीय साहित्यशास्रांना मान्य झाल्या असत्या असे वाटत नाही. विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी विश्वातही किंवा एकूण भारतीय जनमानसांत त्या रुजल्या आहेत असे वाटत नाही.  किंबहुना आपल्याकडील अभिजनांत राजकीय (पोलिटिकल) व तत्त्ववैचारिक (आयडियालॉजिकल) परिभाषेसंबंधी, मांडणीविषयी एक प्रकारची अप्रीती; किमानपक्षी संशय असतो. त्याचे एक उदाहरण म्हणजे श्री. मणी कौल ह्यांनी कै. गजानन माधव मुक्तिबोध ह्या िहदीमधील ज्येष्ठ कवीवर केलेला चित्रपट.. मुक्तिबोधांचा मणी कौल यांनी लावलेला अर्थही राजकीयच आहे. तो अर्थ ‘राजकारण’ कलाव्यवहारात केंद्रस्थानी असू शकते, असते ह्याचाच द्योतक आहे ’’
गोिवद पुरुषोत्तम देशपांडे ‘रहिमतपूरकरांची निबंधमाला- नाटकी निबंध’ या पुस्तकातील ‘आधुनिकता, राजकारण आणि नाटक’ या निबंधात कलाव्यवहारातील राजकारणाविषयी म्हणतात – ‘ राजकारण इतके मोठे’ कधी व का झाले याचा विचार आता करायला हवा. ही दृष्टी किंवा एकूणच कलाव्यवहारात राजकीय दृष्टी ही युरोपने आपल्याला दिलेली देणगी म्हणावी लागेल. युरोपने रेल्वे व टेलिफोन्स दिले. त्याचप्रमाणे राजकारण अत्र तत्र सर्वत्र, प्रसंगी नको तिथेसुद्धा असणे हीही युरोपची सप्रेम भेट मानावी लागेल.. मुद्दा असा की, आता राजकारणापासून मुक्तता नाही.. एका आधुनिक नाटकांत म्हटल्याप्रमाणे ‘राजकारण आता महाकाय राक्षस झाला आहे.  त्याची सावली नाही म्हटले तरी कुठून कुठून तरी अंगावर पडतेच,’ साहित्याचे, नाटकाचे तेच झाले आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2014 12:40 pm

Web Title: bitter gourd
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 आंबट आणि गोड चव
2 खारट चव
3 चवीची संवेदना
Just Now!
X