News Flash

कुतूहल – बॉनसाय

बॉनसाय हा कुणासाठी केवळ एक छंद होऊ शकतो तर कुणासाठी स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो. याचा प्रसार चीनमधून जपान व नंतर जगभरात झाला.

| December 4, 2013 12:32 pm

कुतूहल –  बॉनसाय

बॉनसाय हा कुणासाठी केवळ एक छंद होऊ शकतो तर कुणासाठी स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो. याचा प्रसार चीनमधून जपान व नंतर जगभरात झाला.
‘बॉन’ म्हणजे भांडे अथवा ट्रे आणि ‘साय’ म्हणजे झाड. बॉनसायचा ट्रे साधारणत: आयताकृती किंवा अंडाकृती असतो. त्यातील झाड म्हणजे निसर्गात आढळणाऱ्या मोठय़ा झाडांचे किंवा वृक्षांचे छोटे स्वरूप असते. बॉनसाय तयार करताना वृक्षाची भव्यता, फांद्यांची रचना, पानांचा आकार या सर्व बाबींचा विचार करावा लागतो.
बॉनसायचे खोड पूर्ण बॉनसायच्या दोन-तृतीयांश असावे. आपल्याला कोणत्या रचनेचे बॉनसाय हवे आहे, त्याप्रमाणे खोडाला विविध प्रकारे वळण दिले जाते. बॉनसायचे खोड मोठय़ा वृक्षाचा आभास निर्माण करणारे सरळसोट उभे असू शकते किंवा धबधब्याप्रमाणे कुंडीतून खाली झुकलेले असू शकते अथवा जाड बुंध्याचे वरती निमुळते होत गेलेले असू शकते. खोड कोणत्याही प्रकारचे असले तरी बॉनसायच्या खोडाच्या खालच्या म्हणजे मातीलगतच्या भागात फांद्या अजिबात नसतात.
फांद्या या खोडाच्या वरच्या एकतृतीयांश भागात एकावरती दुसरी याप्रकारे असतात. साधारणपणे पहिली आणि चौथी, दुसरी आणि पाचवी फांदी तसेच तिसरी आणि सहावी फांदी एकावर एक सरळ रेषेत असतात. अशा रचनेमुळे बॉनसायला त्रिकोणाकृती आकार येतो आणि झाडाचा घेरही दिसतो.
चांगल्या बॉनसायची पाने सुदृढ, आकाराने मोठय़ा झाडापेक्षा लहान असतात. मातीबाहेरील मुळे बॉनसायच्या बाजूने तसेच मागील बाजूला असतात. बॉनसायचा ट्रे खोल नसतो. त्यामुळे झाडास आधार मिळेल अशा प्रकारे बुंध्याच्या जवळ जाड, मातीमध्ये तिरकस जातील अशा प्रकारे मुळे वाढवावी लागतात. ट्रेमधील माती स्वच्छ, कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा तण नसलेली असते. त्यात सेंद्रीय खत जास्त प्रमाणात असते. ट्रेचा आकार, रंग, त्यातील बॉनसायच्या आकाराशी, रचनेशी सुसंगत असतो. तसेच बॉनसायची शोभा वाढवण्यासाठी वापरलेले साहित्य म्हणजेच शोभेचे दगड-गोटे, मॉस, रंगीत वाळू बॉनसायशी सुसंगत असते.
– मानसी भिर्डीकर (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – टोनी वॉटसन
टोनी स्कॉटिश आहे. सगळ्याच गोऱ्यांची आपण गोळाबेरीज करतो, तसेच इंग्रजांबद्दल पण इंग्लंडमध्येही प्रांत आहेत. त्यातला स्कॉटलंड हा सर्वात वैशिष्टय़पूर्ण आणि स्वाभिमानी. त्यांचा ध्वज आहे. तसे गरीबच. इतर इंग्रजांनी जगावर राज्य केले तेव्हा हेही त्यांच्याबरोबर होते एवढेच. कष्टाळू आणि बुद्धिमान दोन्ही, पण आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी नाहीत. यांनी जगाला अनेक अमोल रत्ने दिली. ज्या ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीवरून आपण इंग्रजी समजतो त्या शब्दकोशाची मूळ सुरुवात एका स्कॉटिश माणसाने केली. प्रकाश विद्युत चुंबकत्वाच्या तरंगाचा आहे हे सिद्ध करणारा मॅक्सवेल, दूरध्वनीचा उद्गाता बेल, चित्रवाणी (TV ) प्रथम दाखविणारा बेअर्ड, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ, पेनिसिलीनचा शोध घेतलेला फ्लेमिंग, क्लॉरोफार्म वापरून बेशुद्धावस्थेतल्या शस्त्रक्रियेचा जनक सिंपसन, वाफेवर यंत्र चालविणारा व्ॉट, डांबरी रस्त्याचे तंत्र काढणारा मॅकॅडम, हॅरी पॉटरची लेखिका रौलिंग, मँचेस्टर युनायटेड या सुप्रसिद्ध यशस्वी फुटबॉल संघाचा प्रशिक्षक फग्र्युसन आणि चिवट पण झुंजार टेनिसपटू ज्याने इंग्रजांना अनेक दशकांनंतर टेनिसमध्ये प्रावीण्य मिळवून दिले तो अँडी मरेही स्कॉटिशच.
 सगळी यादी खूपच लांब आहे, तर या स्कॉटिश टोनीची आणि माझी पहिली ओळख ८७ सालची. हाताच्या दोन्ही बाजूला त्वचा नसेल तर त्यावरच एक नावीन्यपूर्ण उपाय असा निबंध मी ब्रिटिश जर्नलला पाठविला होता. टोनी संपादक होता. त्याने मला लिहिले. या जखमेसाठी मी आणि मॅग्रेगरने पूर्वी एक उपाय सांगितला होता. त्यापेक्षा तुझी पद्धत जास्त सरस; मी या निबंधाचा स्वीकार करतो.
दोनच ओळीचे पत्र पण खूप बोलके होते. मी बोलभांड आणि स्वैर हा मितभाषी, मार्मिक आणि पद्धतशीर, हल्लीच्या आमच्या संगणक अवकाशातल्या पुस्तकाचा हा अनामिक सहसंपादक. इथल्या भल्या-भल्या लोकांकडून तपासून घेतलेल्या प्रकरणांवरची याची मल्लिनाथी आणि चुकांची दुरुस्ती वाचणे म्हणजे एक अत्युच्च सुखानुभव असतो. पूर्वीही मी ब्रिटिश जर्नलमध्ये लिहीत असे, तेव्हा त्याचे मृदू भाषेतले गोंजारणे अजून आठवते. इकडचा शब्द तिकडे चालत नाही. अवैज्ञानिकतेचा पुसट स्पर्श जरी असेल तर यांचा बोळा तयार असतो. प्रसिद्धी पराङ्मुख, जाहिरातीची मनापासून चीड, हा माझ्याहून एक-दोनच वर्षांने मोठा; परंतु मी चतुर आणि लबाड हा शहाणा, समजूतदार आणि ज्ञानी आणि मनापासून नि:स्वार्थीपणे पाठराखण करणारा. एवढेच नव्हे, पुरस्थग्रंथींचा कर्करोग झाल्यानंतरही कार्यरत राहणारा.
हाही एक स्कॉटिश रत्नच. गुणवान आणि गुणग्राही. हा संपादक असताना आम्ही Venous Flap नावाचा चमत्कारिक शोध लावला त्याची गंमत पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस-  भयंकर उदरवात : सोपे आयुर्वेदीय उपचार
नुकतेच एका ७६ वर्षांच्या वृद्धाचे पुढील स्वरूपाचे निनावी पत्र आले. त्याने सांगितलेली व्यथा खूप संख्येने अनेक वृद्धांना सतावत असते.  त्रास पुढीलप्रमाणे- कित्येक वर्षांपासून मला भयानक, भयंकर, प्रचंड, अतिप्रचंड गॅसेस होतात. सकाळी  संडास झाल्यावर पोट थोडा वेळ मोकळे वाटते. पण तासा-दीड तासात काही न खाता गॅसेस सुरू होतात. दुपारी जेवणानंतर गॅसेसचे प्रमाण खूपच त्रासदायक असते. वज्रासन, शशांकआसन, पोटावर मुठी आवळून धरणे इ. केल्यावरच संडासला होते व काही वेळ पोट मोकळे होऊन बरे वाटते. मात्र पुन्हा गॅसेस सुरू होतात. मुख्यत: मोठय़ांदा आवाज होतात. फार कंटाळलो आहे.
 वयाच्या साठ-पासष्ट नंतर खूप मोठय़ा संख्येने ही समस्या अनेकांना हैराण करून सोडते. या समस्येवर खूप औषधांपेक्षा पथ्यापथ्याचे साधेसोपे नियम, आपल्या दिनचर्येत योग्य तो बदल केला, खाणे-पिणे, दुपारची झोप, किमान व्यायाम याकरिता कटाक्षाने लक्ष दिले, सामान्यपणे एक आठवडय़ात रुग्णाला निश्चित बरे वाटते. पुढील श्लोक खूप काही सांगतो-
‘कफं पंगू, पित्तं पंगू, पंगवो मलधातव:।
वायूना यत्र नीयन्ते, तत्र गच्छंति मेघवत्।।’  .. तसेच,
‘हरीतकी जयेद्व्याधींस्तांस्तांश्च कफवातजान्।
कदाचित् कुप्यतिमाता, नोदरस्था हरीतकी।।’
या दोन ओळी वरील समस्यांबद्दल मोलाचे मार्गदर्शन करतात.
वरील स्वरूपाच्या तक्रारीकरिता एकूण आहाराच्या वेळा कटाक्षाने तीन वेळा कराव्यात. नाश्ता, दोन्ही भोजन यात सात तासांचे अंतर असावे. सकाळी व रात्री जेवणानंतर अवश्य फिरावयास जावे. पुदिना, आले, लसूण चटणी, सुंठमिश्रित गरम पाणी कटाक्षाने घ्यावे. भोजनोत्तर अभयारिष्ट, प्रवाळपंचामृत, आम्लपित्तवटी घ्यावी. झोपण्यापूर्वी किंवा पहाटे गंधर्वहरीतकी चूर्ण घ्यावे. कटाक्षाने जडान्न, मिठाई, मांसाहार, थंड पदार्थ टाळावेत. लसूण व हिरडा मायबापांना विसरू नये.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –  ४ डिसेंबर
१८९८ > ‘काव्यशेखर’ या टोपणनावाने कविता लिहिणारे भास्कर काशीनाथ चांदूरकर यांचा जन्म. पुष्पराग हा त्यांचा  संग्रह. याशिवाय प्रेमपुनर्जीवन ही विधवांच्या दुस्थितीचे वर्णन करणारी कादंबरी त्यांनी लिहिली होती.
१९४२ > कवी, समीक्षक निशिकांत धोडोपंत मिरजकर यांचा जन्म. श्री नामदेव दर्शन, श्री नामदेव चरित्र आणि काव्य, नामदेवांची अभंगवाणी ही संपादने, कवितेची रसतीर्थे  हे समीक्षात्मक पुस्तक अशी साहित्य संपदा.
१९६० > कवी, अनुवादक बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर यांचे निधन.
१९७३ > कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन. बाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी  हे माधव ज्यूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर मराठी नाटय़छटा  तसेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्या ख्रिस्तायन ची प्रत संपादित केली. कवी यशवंत यांच्यासह त्यांचे यशो-गिरी व वीणाझंकार हे संग्रह प्रकाशित झाले होते.
१९८१ > लेखक, विचारवंत आणि विविध भाषांचे अभ्यासक ज. द. गोंधळेकर यांचे निधन.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2013 12:32 pm

Web Title: bonsai tree 2
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल – रसायनांविना शेती
2 कुतूहल – कृषी कर्मयोगी
3 कुतूहल- शेती व श्वसनसंस्थेचे रोग- २
Just Now!
X