डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

मन अस्वस्थ असताना शरीरावर लक्ष नेण्याचा सराव करणे आवश्यक आहे, हे अनेकांना पटत नाही. मनातील अस्वस्थता त्रासदायक विचारांमुळे असते; ते विचार बदलायला हवेत, सकारात्मक विचार करायला हवेत, असेच अनेकांना वाटते. मात्र, आपल्या भावनिक स्मृती केवळ मेंदूत साठवलेल्या नसतात. त्या पूर्ण शरीरात असतात. त्यांचा त्रास मुळापासून घालवायचा असेल, तर शरीराकडे लक्ष नेणे आवश्यक आहे, ते का? ‘द बॉडी कीप्स द स्कोअर’ (२०१४) या डॉ. बेसेल फॉनदर कोल्क यांच्या पुस्तकात त्याचे उत्तर मिळते.

मनोरोगतज्ज्ञ असलेले डॉ. कोल्क हे गेली ४० वर्षे ‘मानसिक आघात’ या विषयावर संशोधन करीत आहेत. आघातोत्तर तणाव (पीटीएसडी) असलेल्या हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. युद्धात सहभागी सैनिक, अपघातातून वाचलेली माणसे, दारुडा बाप असलेली, लहानपणी मारझोड किंवा लैंगिक छळ सहन करावा लागलेली मुले यांना वरील त्रास होतो. त्या प्रसंगाच्या सतत आठवणी त्यांना येत राहतात. अशा आठवणी येत असताना त्यांच्या मेंदूत आणि शरीरात काय घडत असते, याचे संशोधन डॉ. कोल्क यांनी केले आहे. अशा आठवणी नसतात तेव्हा त्यांच्या मेंदूत आणि असा त्रास नसलेल्या माणसांच्या मेंदूत कोणते फरक दिसतात, याचाही अभ्यास त्यांनी केला आहे. या अभ्यासाचा निष्कर्ष डॉ. कोल्क यांनी त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात दिलेला आहे!

केवळ विचार बदलून किंवा विचार साक्षीभाव ठेवून पाहत राहिल्यानेही शरीरात नोंदवलेल्या भावनिक स्मृती बदलत नाहीत. त्या बदलायच्या असतील, तर शरीराकडे लक्ष देऊन मनात त्रासदायक भावना असतात तेव्हा शरीरात काय होते, ते जाणायला हवे. जे जाणवते त्याला ‘हे नको’ अशी प्रतिक्रिया न करता, त्याचा स्वीकार करायला हवा. ज्यांना तीव्र मानसिक आघात सहन करावे लागलेले असतात, त्यांच्या मेंदूमधील शरीरातील संवेदना जाणणारे भाग निष्क्रिय, बधिर असतात. ते सक्रिय करण्यासाठी शरीरातील संवेदना जाणण्याचे प्रशिक्षण त्यांना अन्य उपाय योजून द्यावे लागते. शरीराकडे लक्ष देण्याचा सराव कधीच केलेला नसतो, अशा निरोगी व्यक्तींनाही शरीरातील संवेदना सुरुवातीला जाणवत नाहीत. मात्र स्पर्श, वेदनांकडे लक्ष देण्याचा सराव केला, की मन अस्वस्थ असतानाही शरीरातील संवेदना समजू लागतात.