02 June 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : उच्चार

मूल बोलायला लागतं त्याच्या किती तरी आधीपासून ते ऐकायला लागलेलं असतं.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मराठी भाषक ‘ळ’चा उच्चार करतात, तसं हिंदी भाषिक लोकांना का जमत नाही? अरबी लोक ज्या पद्धतीने ‘ख’ म्हणतात, तसा उच्चार करायचा तर फार सराव का करायला लागतो?

मूल पहिल्या वर्षभरात जे ऐकतं, ते शब्द स्वतंत्रपणे एका कोषात जाऊन साठत असतात. शब्द ऐकून ठेवण्याची यंत्रणा आधी कामाला लागते. ऐकलेल्या शब्दांचा- वाक्यांचा अर्थ समग्रपणे लक्षात यायला लागतो. ऐकलेले शब्द  स्मरणकेंद्रातून काढून प्रत्यक्ष तोंडावाटे बोलून दाखवण्याची यंत्रणा थोडय़ा काळानंतर कामाला लागते.

मूल बोलायला लागतं त्याच्या किती तरी आधीपासून ते ऐकायला लागलेलं असतं. कारण आकलनाचं वर्णिक क्षेत्र हे जन्मापासून कार्यरत असतं, तर भाषानिर्मिती केंद्र म्हणजेच ब्रोका हे साधारणपणे १०-११ व्या महिन्यात विकसित होतं. प्रत्येक मूल बोलायला लागण्याचा काळ थोडाफार मागेपुढे होत असतो. याचं कारण ब्रोका क्षेत्र अद्याप विकसित होत असतं. प्रत्येकाचं हे क्षेत्र वेगवेगळ्या वेळेला विकसित होतं. त्यानंतर मुलं बोलतात.

जे शब्द- ज्या शब्दांचा उच्चार मुलांसमोर होतो, तेच त्यांना बोलता येतं.  या संदर्भात एका विद्यापीठात संशोधन झालेलं आहे. जपानी लोक बोलताना ‘र’ आणि ‘ल’ वेगवेगळे उच्चारत नाहीत. जपानी बाळांवर जे संशोधन झालं त्याआधारे हे सिद्ध झालं आहे की ‘र’ आणि ‘ल’ वेगवेगळा उच्चारण्याची क्षमता त्यांच्या मेंदूत वयाच्या दहा महिन्यांपर्यंत असते; पण त्यांना ‘र’ आणि ‘ल’चे वेगवेगळे अनुभव न दिल्यामुळे पुढे ही क्षमता नष्ट होते.

मात्र जपानी मूल जर जन्मापासून दुसऱ्या समाजात वाढलं, जपानीशिवाय इतर भाषा त्याला ऐकवल्या, र आणि ल ऐकवले तर त्यांनाही हे शब्द नक्की उच्चारता येतील. सारा-जेन ब्लॅकमोर आणि उटा फ्रिथ यांनी या संशोधनावर  प्रकाश टाकला आहे.

आसपासचं सगळं जग मूल आपल्या नजरेनं न्याहाळत असतं. मुलाच्या समोर जे काही प्रसंग घडतात त्यातूनच मूल अनेक गोष्टी न सांगताच शिकत असतं. त्याला जे दिसतं, त्याची नोंद त्याचा मेंदू घेतो. त्या वेळेस झालेलं संभाषण तो लक्षात ठेवतो. त्यांचा मेंदू या काळात सतत काही तरी ग्रहण करण्याच्या अवस्थेत असतो. म्हणून तर थोडय़ा कालावधीत तो खूप काही शिकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2019 3:44 am

Web Title: brain relation with pronunciation zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : बालवाडीशास्त्र
2 कुतूहल : एल निन्यो – ला निन्या
3 कुतूहल : व्हॅन अ‍ॅलनचे पट्टे
Just Now!
X