News Flash

मेंदूशी मैत्री : असहमती-सहमती

स्वत:चं बरोबर वाटण्याचं कारण असं असतं की, माणसं स्वत:च्या मनाशी काहीएक विचार करून त्याप्रमाणे वागतात.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

काही जणांशी आपलं चांगलं जमतं आणि काही जणांशी नेहमीच वाद होतात. असं का होतं?

आधी, का जमतं हे बघू. असं अनेकदा होतं की आपलं ज्यांच्याबरोबर नातं आहे, जे लोक आपल्या जवळचे आहेत, सहवासात आहेत, त्यांच्याऐवजी इतरांशी बौद्धिक- मानसिक साहचर्य निर्माण होतं. एकमेकांचे दृष्टिकोन समजतात. कारण या दोघांच्या मेंदूची जडणघडण परस्परांशी पूरक असते. यालाच आपण ‘वेव्हलेंग्थ जुळणं’ असं म्हणतो.

ही पूरकता नात्यावर अवलंबून नसते. वयावर अवलंबून नसते. शिक्षण, जात, धर्म, लिंग, एकमेकांमधलं भौगोलिक अंतर यांवरही अवलंबून नसते. तर.. ही पूरकता मेंदूच्या भावनिक- मानसिक- बौद्धिक- सामाजिक जडणघडणीवर अवलंबून असते.

ज्या दोन माणसांचे एकमेकांशी वाद असतात, एकमेकांचं पटत नाही, तेव्हा खरं तर दोन माणसांच्या दृष्टिकोनांत अंतर पडत असतं. याचं कारण प्रत्येकाच्या मेंदूची जडणघडण वेगळी झालेली असते. ते काही बाबतींत, काही विषयांमध्ये एकमेकांना पूरक नसतात, त्यांच्यात सहमती होत नाही.

जेव्हा सहमती नसते, तेव्हा माणसाचा हा नैसर्गिक स्वभाव आहे की, त्याला नेहमीच स्वत:चं बरोबर आणि दुसऱ्याचं चूक वाटत असतं. थोडीच माणसं अशी असतात की, ती चूक कबूल करतात. स्वत:चं बरोबर वाटण्याचं कारण असं असतं की, माणसं स्वत:च्या मनाशी काहीएक विचार करून त्याप्रमाणे वागतात. त्यामागे त्यांच्या दृष्टिकोनातून समर्पक कारण असतं. इतर माणसं त्या कारणांशी सहमत असतीलच असं नाही, पण त्यांना मात्र ते बरोबरच वाटत असतं.

माणसं आपापले दृष्टिकोन घेऊन ते सांभाळून ठेवत असतात. मात्र, हे करताना दुसऱ्याचे दृष्टिकोन ते विचारातसुद्धा घेत नाहीत. या एका गोष्टीमुळे लहान-मोठे वाद होत असतात.

हे वाद मिटवायचे असतील, तर एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे करायला हवी, ती म्हणजे- ‘त्या माणसाच्या जागी जर मी असते/असतो, तर काय केलं असतं?’ असा विचार करायला आपण शिकलो, तर आपला जगण्यातला बराच वेळ आणि चिडचिड वाचेल. मुख्य म्हणजे, असहमती नक्की का दर्शवायची आहे आणि सहमत केव्हा व्हायचं, याचा निर्णय घेणं सोपं जाईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 1:03 am

Web Title: brain study brain responses agree disagree zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : मेंदू बंद?
2 कुतूहल : आधुनिक घडय़ाळे
3 डोकं चालू राहण्यासाठी..
Just Now!
X