जग जवळ आलंय असं आपण म्हणतो. म्हणजे नेमकं काय झालंय? भौगोलिक अंतरं कमी झाली आहेत? मुंबईपासून दहा-बारा हजार किलोमीटर अंतरावरचं लंडन तिथून उठून ठाण्यापलीकडे येऊन वसलं आहे? तर तसं काही झालेलं नाही. परंतु दिसामासानं नवनवीन अवतारात सामोऱ्या येणाऱ्या संपर्कसाधनांच्या मदतीनं जगाच्या विरुद्ध टोकांवर राहणाऱ्या दोन व्यक्तींना एकमेकांशी जोडून त्यांच्यात जवळीक प्रस्थापित करणं अधिक सुलभ झालं आहे. पण नक्की किती, याचं काही मोजमाप आहे की आपला अंदाजपंचेच सारा कारभार!

म्हणूनच वैज्ञानिकांनी या जवळिकीचं मोजमाप करण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रांतल्या आणि गावांमधल्या काही जणांची निवड केली. प्रत्येकाला ज्याची ओळखपाळख नाही अशा व्यक्तीशी संपर्क साधायला सांगितलं गेलं.

त्यांच्या प्रयत्नांना काही दिशा मिळावी यासाठी त्या अनोळखी व्यक्तीचं नाव, व्यवसाय, छंद वगरेची माहिती दिली. पण त्याचा पत्ता वा टेलिफोन नंबर सांगितला नाही.

आता त्या प्रत्येकानं आपल्या मित्रपरिवारांना पत्र पाठवून त्या व्यक्तीचा पत्ता शोधण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली. म्हणजे समजा ती व्यक्तीडॉक्टर असून अमेरिकेत कुठं तरी आहे असं सांगितल्यास आपल्या ओळखीतल्या अमेरिकेतल्या डॉक्टरांना पत्रं पाठवली गेली. त्यांनी परत तशीच पत्रं त्यांच्या मित्रपरिवारांना पाठवली. अशा रीतीनं या दोन संपूर्ण अनोळखी व्यक्तींची पत्रभेट होण्यासाठी किती पायऱ्यांची, टप्प्यांची मजल मारावी लागते, हे पाहिलं गेलं.

त्यातून सरासरीनं या दोन व्यक्तींना एकमेकांशी जोडण्यासाठी पाच पायऱ्या पार कराव्या लागतात, हे दिसून आलं. यालाच त्या दोघांमधलं ‘डिग्रीज ऑफ सेपरेशन’ म्हटलं गेलं. तेच ती जवळीक मोजण्याचं एकक झालं.

या प्रयोगानंतर जेव्हा इंटरनेटचं युग अवतरलं तेव्हा परत एकदा हाच प्रयोग ई-मेलच्या माध्यमातून केला गेला. या वेळीही सरासरीनं दोघांमधलं संपर्कअंतर पाच पायऱ्यांचं असल्याचं दिसून आलं. साध्या पत्रापेक्षा ते थोडंसच कमी होतं.

आता सामाजिक माध्यमांचा सुकाळ झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, लिन्क्ड इनसारखे आधुनिक मित्रपरिवार तयार झाले आहेत. त्यांचा वापर केल्यास ही जवळीक अधिक वाढल्याचंही दिसून येईल. डिग्रीज ऑफ सेपरेशन कमी झाल्याचं नजरेला पडेल. करूनच पाहा ना, असा प्रयोग.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

नायर यांची अजरामर कादंबरी

एम. टी. वासुदेवन नायर   यांची ‘रण्डामूषम्’ (१९८४) ही महाभारताशी संबंधित  कथानकावर आधारित पौराणिक कादंबरी, त्यांची सवरेत्कृष्ट कलाकृती आहे. या कादंबरीसाठी त्यांना वलयार पुरस्कारासहित अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

दुसरा पांडव-भीम हा या कादंबरीचा नायक आहे. महाभारतातील भीमाच्या चित्रणापेक्षा त्यांचा भीम वेगळा आहे. पण त्यांच्या इतर कादंबऱ्यांमधील पात्रांप्रमाणे यातील भीम हा उपेक्षेच्या आहारी गेल्याने क्रोधित आहे. हििडबा आणि घटोत्कचही दूर किनाऱ्यावर फेकल्या जाण्याच्या त्याच्या दु:खात भागीदार आहेत. बळ, वैभवाचे दिवस संपून भीम एकाकीपणात रात्र चिंतनात घालवतो आहे. अस्तित्वाचे गंभीर प्रश्न त्याला छळत आहेत. भीमाचे चित्रण केवळ महापराक्रमी वीर वा धीरगंभीर नायक एवढेच नसून, त्याच्या मनातील अथांग करुणेचे, मृदू हृदयाचे चित्रण त्यांनी यात केले आहे. या कादंबरीत कोणत्याही आख्यायिका किंवा दंतकथा यांचा उपयोग त्यांनी केलेला नाही. द्रोणाविषयी भीम म्हणतो, कुठल्याही शिष्याला कुठल्या मर्यादेपर्यंत पोहोचू द्यायचे हे ते स्वत: ठरवीत. भीम म्हणतो, मला रथयुद्धाची आवड, पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी गदायुद्ध विद्येचाच आग्रह धरला. भीमाने आपला मामेभाऊ कृष्णाला कुठेही देवपद दिलेले नाही. द्यूतसभेचे सारे प्रकरणच नायरांनी अत्यंत सुंदर शब्दांत रंगवले आहे. द्रौपदीला राजसभेत ओढून आणल्यानंतर कृष्णाने वस्त्रे पुरविल्याचा त्यात किंचितही उल्लेख नाही.

अभिमन्यूच्या स्वभावाचे, पराक्रमाचे व भीमाशी निर्माण झालेल्या जवळिकीचे अत्यंत हृद्य वर्णन इथे आहे. युद्धात भीमपुत्र घटोत्कच आपल्या पराक्रमाने कौरवांची दाणादाण उडवतो. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून युधिष्ठिर अत्यंत दु:खी होतो. साऱ्या पांडव शिबिरावर अवकळा पसरलेली असते. तिथे कृष्ण येतो आणि म्हणतो, ‘अरे, असे रडता काय? आज तर तुम्ही उत्सव साजरा करायला हवा. घटोत्कच शेवटी कोण होता? राक्षस, असुर वंशाचा, ब्राह्मणांच्या यज्ञात विघ्ने आणणारा, त्याच्या मृत्यूसाठी रडायचं कशाला? तो मेला हे उत्तम झालं.’ कृष्णाने काढलेले हे उद्गार भीमाच्या हृदयाला घरे पाडीत जातात. अशा अनेक घटना, प्रसंगांतून भीमाची व्यक्तिरेखा लेखकाने साकारली आहे आणि त्याच्याच दृष्टिकोनातून महाभारत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com