डॉ. श्रुती पानसे  contact@shrutipanse.com

माणूस हा आनंदी होण्यासाठी जन्माला आला आहे की काळजी करण्यासाठी, असा प्रश्न पडतो. कारण काळजी करणं हा मानवी स्वभावाचाच एक भाग होऊन गेलेला असतो. काळजी करण्यासारखी परिस्थिती असेल आणि योग्य काळजी घेऊन प्रश्न सुटणार असतील, तेव्हा हे योग्यच आहे. पण काय होईल, काही चुकीचं किंवा वाईट होणार तर नाही ना, याची काळजी करणं हे मेंदूसाठी फारसं बरं नाही.

एका प्रमाणापर्यंत काळजी करणं हा प्रेमभावनेचा एक भाग आहे. मेंदूमध्ये ‘ऑक्सिटोसिन’ हे प्रेमाचं रसायन निर्माण होतं. पण याचं प्रमाण अतिरिक्त वाढतं व प्रचंड काळजी वाटत राहते आणि तशीच सवय बनून जाते. तेव्हा या काळजीचं (केअर) रूपांतर चिंतेमध्ये (वरीज्) होतं. सकारात्मक आणि आनंदी भावनेचं रूपांतर नकारात्मक रसायनांमध्ये आणि त्यामुळेच नकारात्मक भावनेमध्ये होतं.

स्वत:ची काळजी, मुलांची किंवा आई-बाबांची, जवळच्या नातेवाईकांची आणि इतरांची काळजी. या सर्वाच्या वागण्याची, आरोग्याची, अभ्यासाची, नोकरी-व्यवसायाची, बढतीची, वृद्धापकाळाची. त्यांना दुसऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाची किंवा त्रास होऊ  नये याची काळजी. आयुष्यात दु:ख न मिळता सुख-समाधानच मिळावं याची काळजी. कधीच न संपणाऱ्या आर्थिक काळज्या. याशिवाय समाजाची, देशातल्या ढासळत्या परिस्थितीची, वाढत्या गुन्हेगारीची, अपघातांची आणि अशाच किती तरी काळज्या मनात घर करून राहिलेल्या असतात.

यातून बाहेर पडण्याचा मार्ग एकच.. आपण निर्थक काळज्या करत असतो, तेव्हा आपलं मन भरकटतं. एकाग्रतेनं काम होत नाही. त्यामुळेच निर्णयक्षमता गमावून बसतो. आपण जास्तीत जास्त काय वाईट होऊ  शकतं, याची प्रत्यक्ष कल्पना करतो व मनानं परिस्थिती स्वीकारतो, तेव्हा चित्रविचित्र कल्पना बाजूला पडून समस्येकडे लक्ष केंद्रित होतं. कारण नसताना वा ज्यावर आपण काही करू शकत नाही अशा काळज्या बाजूला ठेवून तार्किक पद्धतीनं विचार करणं, तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रत्यक्ष पावलं उचलणं या गोष्टी व्हाव्यात. यामुळे ‘कॉर्टिसोल’चं प्रमाण कमी होऊन सारासार विचारशक्ती काम करायला लागते. सतत काळजीत राहिलो, तर शरीराचा रक्तप्रवाह ‘लिंबिक सिस्टीम’कडे- म्हणजे भावनांच्या प्रदेशातच घोटाळत राहतो. तो विचारांच्या प्रदेशाकडे- म्हणजेच ‘निओ कॉर्टेक्स’कडे वळवायचा असेल, तर सक्तीनं तार्किक विचार करावे लागतात.