29 May 2020

News Flash

रोगांचे कारण

ती आजार बरे करण्यासाठी आहे तशीच ओज आणि तेज वाढवण्यासाठी आहे.

डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com   

माणूस भावनेच्या आवेगात चुकीची कृती करतो, त्याला सत्त्वावजय चिकित्सेत ‘प्रज्ञापराध’ म्हणतात. साऱ्या शारीरिक आणि मानसिक आजारांचे ते एक कारण आहे. याचे तीन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे- काय योग्य आणि काय अयोग्य हे बुद्धीला कळलेले नसते. विचारांचा आणि भावनांचा परिणाम शरीरमनावर कसा होतो, तणावाचे दुष्परिणाम कोणते आहेत, ते कसे कमी करता येतात याची माहिती नसते. मनातील भावनांचा आवेग कसा टाळायचा, विवेकबुद्धी कशी विकसित होते, सुप्तमन कसा प्रभाव गाजवते हे माहीत नसते. ‘मनोवेध’मधून मनाचे स्वरूप व मानसोपचार याविषयीची माहिती मिळेल; तिचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी त्यावर विचार करायला हवा. शंका विचारायला हव्यात आणि या विषयाचे ज्ञान वाढवायला हवे.

प्रज्ञापराधाचा दुसरा घटक म्हणजे- ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग न करणे होय. योग्य/अयोग्य काय हे बुद्धीला  पटलेले असते, पण ते कृतीत येत नाही. कारण कृती होण्यासाठी सवयी बदलाव्या लागतात. स्वयंशिस्त वाढवून स्वनियमन करावे लागते. हे करणाऱ्या शक्तीस ‘धृति:’ म्हणतात. धृति: म्हणजे नियमनशक्ती. ही वाढवण्याचा एक मार्ग योगशास्त्र आहे. ‘पातंजल योगसूत्रा’चे पहिले सूत्र ‘अथ योगानुशासनम्’ असे आहे. योग हे स्वयंअनुशासन आहे. माणसाच्या मेंदूतील ‘प्रीफ्रन्टल कॉर्टेक्स’चे हे कार्य आहे. याला न्यूरोसायन्समध्ये ‘सेल्फ रेग्युलेशन’ म्हणतात. मानवी मेंदूच्या व्यवस्थापकीय कार्यापैकी हे महत्त्वाचे कार्य. सर्व रोगांचे कारण असलेला प्रज्ञापराध टाळायचा असेल, तर धृति: बळकट करायला हवी. संकल्प करून त्यानुसार वागायला हवे. ते शक्य झाले की स्वतलाच शाबासकी घ्यायला हवी.

प्रज्ञापराधाचा तिसरा घटक साक्षीभावाचा सराव न करणे हा आहे. त्याला ‘स्मृतिभ्रंश’ म्हणतात. ‘चरकसंहिते’त- ‘तत् त्व’चा म्हणजे ‘मी साक्षी’ हा विसर म्हणजे स्मृतिभ्रंश असे स्पष्ट सांगितले आहे. ‘मी साक्षी’ याचे स्मरण म्हणजे स्मृति, सजगता स्थापित करणे होय. ‘माइन्डफुलनेस’ हा इंग्रजी शब्द  याच अर्थाने वापरला जाऊ लागला. त्याचा सराव करायचा म्हणजे आपले लक्ष कुठे आहे, याकडे लक्ष द्यायचे. बुद्धी, धृति: आणि  स्मृती बळकट करणे ही सत्त्वावजय चिकित्सा आहे. ती आजार बरे करण्यासाठी आहे तशीच ओज आणि तेज वाढवण्यासाठी आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 2:14 am

Web Title: causes of diseases zws 70
Next Stories
1 कुतूहल : पाणी आणि हवामानबदल
2 मनोवेध : भावनांचा खेळ
3 मनोवेध : भावनावेग
Just Now!
X