क्लोरिन वायू विषारी असला तरी, विरंजन क्रिया व जंतुनाशक हे क्लोरिनचे गुणधर्म सर्वात जास्त वापरले गेले. सर्व प्रथम १८९७ मध्ये टायफॉइडचा उद्रेक झाल्यावर जंतुनाशक म्हणून पाणी शुद्ध करण्याकरिता क्लोरिन वापरला गेला. अमेरिकेत चिकन साफ करण्याकरिता हा वायू मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. इ. कोलाय (E.Coli) व एस. ऑरियस (S.Aureus) या जंतूंना मारण्यासाठी क्लोरिन अत्यंत प्रभावी ठरला आहे. डी.डी.टी. या कीटकनाशकात क्लोरिनचा समावेश असतो, पण डी.डी.टी.च्या घातक परिणामांमुळे त्यावर १९७३ पासून बंदी आहे. असा हा घातक वायू युद्धातही वापरला गेला. पहिल्या महायुद्धात २२ एप्रिल १९१५ रोजी अमोनियाचा संशोधक फ्रिट्ज हाबर याने दोस्त राष्ट्रांविरुद्ध वापरला. जवळजवळ पाच हजार जवान यामुळे मारले गेले. डोळे आणि त्वचेची आग करणाऱ्या वायूपासून बचावाकरिता खंदकात आश्रय घेतल्यावरही हवेपेक्षा अडीच पट जड असणाऱ्या या वायूने, खंदकात खाली जाऊन त्यांचा बळी घेतला. नशिबाने दुसऱ्या महायुद्धात दोन्ही बाजूंनी विवेक दाखवून, डोळ्यांना व त्वचेला घातक असणाऱ्या  आणि फुफ्फुसांमध्ये पाणी निर्माण करणाऱ्या या घातक वायूचा वापर टाळला. तरीही आता इराक युद्धात क्लोरिन पुन्हा वापरला गेला असावा अशी शंका आहे. सिरियामध्येतर प्रेसिडेंट असदने बंडखोरांविरुद्ध २०१४ व २०१५ मध्ये क्लोरिनचा वापर करून अनेकांचे प्राण कंठाशी आणले होते.

सोडिअम हायपोक्लोराइड (विरंजक), क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड अशा संयुगांच्या स्वरूपात क्लोरिनचा वापर केला जातो. योग्य वापर केल्यास क्लोरिन वायू बहुगुणी आहे. सुमारे चार कोटी टन क्लोरिनचे उत्पादन जगभर होते. त्यातील पाच टक्के कागद, लगदा उद्योगात वापरले जाते. तीस टक्के उत्पादन पॉलीव्हिनील क्लोराइड करता, तेरा टक्के असेंद्रिय,  तेरा टक्के सेंद्रिय संयुगे आणि चोवीस टक्के द्रावके निर्मिती करता मुख्यत्वे वापरले जाते. या वायूपासून निर्माण केलेले क्लोरोफ्लोरो हायड्रोकार्बन वातानुकूलित यंत्रात शीतक म्हणून वापरला जात होता; परंतु ओझोनला धोका पोहचल्यामुळे क्लोरोफ्लोरो हायड्रोकार्बनवर बंदी आहे. क्लोरोफ्लोरो हायड्रोकार्बनचा एक रेणू एक लाख ओझोनचे रेणू नष्ट करतो. क्लोरिनचा अति जास्त वापर कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

असा हा क्लोरिन वायू म्हणजे ‘विज्ञान, शाप की वरदान?’ ही उक्ती सार्थ ठरवतो.

डॉ. कविता रेगे, मुंबई

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org