३९० साली रोमनसम्राट थिओडोसियस याने ख्रिश्चन धर्माला अधिकृत राजधर्म म्हणून मान्यता दिली. त्यापूर्वी रोमन समाजात अनेक देवतांचा मूíतपूजक धर्म होता. ज्युपिटर हा त्यांचा प्रमुख देव. त्याशिवाय अपोलो, व्हिनस, हक्र्युलिस वगरे देवता होत्या. रोममध्ये पाचव्या, सहाव्या शतकात ख्रिश्चन धर्म स्थिरावला. सोळाव्या, सतराव्या शतकात ख्रिश्चन धर्मप्रमुख पोप याने चर्चसाठी अनेक जमिनी आणि धन जमवून आपले छोटेखानी साम्राज्य उभे केले. १८४९ साली रोमन प्रजासत्ताक स्थापन होऊन पोपची आणि चर्चची मालमत्ता सरकारजमा झाल्यामुळे त्याचे पाठीराखे आणि पोप असंतुष्ट झाले. मुसोलिनीने १९२९ साली यावर तोडगा काढून पोपला काही जमीन दिली. त्या ११० एकर जमिनीवर सध्याचे व्हॅटिकन सिटी स्टेट उभे राहिले. पोप हाच प्रमुख शासक असलेल्या या छोटय़ा देशाची लोकसंख्या आहे ८५०! पोपच्या या राज्याचे नाव आहे ‘सिटाडेल व्हॅटिकनो’. सेंट पिटर्स बॅसिलिका, सिस्टाइन चॅपेल (पोपचे निवासस्थान), म्युझियम आणि पुढय़ातला विशाल चौक मिळून ही व्हॅटिकन सिटी बनली. स्मृतिचिन्हे, पोस्टाची तिकिटे यांची विक्री आणि पर्यटक, भाविक यांच्या प्रवेशाचे उत्पन्न या महसुलावर व्हॅटिकनची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ६४ साली सम्राट निरोच्या काळात येशू ख्रिस्ताचा शिष्य सायमन ऊर्फ पिटरला इथे क्रुसावर देहान्त शासन दिले गेले. रोम आणि इटालीची ९० टक्के जनता कॅथलिक धर्मीय आहे आणि सेंट पिटर्स हे सध्या महत्त्वाचे ख्रिश्चन धर्मपीठ बनलेय. सेंट पीटर हा ख्रिश्चन धर्माचा पहिला पोप मानला जातो आणि त्याची कबर चर्चच्या प्रमुख वेदीखाली तळघरात आहे. ईस्टर आणि ख्रिसमसच्या दिवशी चर्चसमोरच्या विशाल चौकात मास भरतो आणि लाखो रोमनवासी येथे पोपचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात.

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

फ्लोराइड्स आणि ग्लॅडिओलस

फ्लोरीन हे अतिविषारी मूलद्रव्य बहुतेक ठिकाणच्या जमिनीत फ्लोराइडच्या रूपात असते. रॉक फॉस्फेट आणि बॉक्साइटच्या सान्निध्यात ते जास्त प्रमाणात असते. त्यामुळे फॉस्फरसयुक्त खतनिर्मिती कारखाने आणि अ‍ॅल्युमिनिअम वेगळे करणारे स्मेल्टॅर्स त्याचप्रमाणे काच कारखान्याचा परिसर या ठिकाणी फ्लोराइड प्रदूषण जाणवते.

फ्लोरीन पाण्यात सहज विरघळतो. जमिनीतील पाण्यातला फ्लोरीन मुळांवाटे वनस्पतीत शिरतो. मुळे, खोड, पाने, फुले यात पसरतो. जेव्हा पानावाटे बाष्प उत्सर्जति होते तेव्हा फ्लोराइड पानात साठून राहते. हवेतील फ्लोराइडही पानात शोषले जाते. विषारीपणा सहन न झाल्याने पानांच्या टोका-काठातील पेशी मरतात, पाने टोकाकडे आणि काठाकडे  काळी पडतात. हा काळेपणा टोकाकडून  देठाकडे पसरत जातो. हवा व पाणी दूषित राहिले तर हे काळपट डाग वाढत जाऊन झाड  मरते. खत कारखान्याच्या परिसरातील जमीन, विहिरीतील पाणी, हवा आणि वनस्पतीत फ्लोराइड्सचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचे अहवाल आहेत.

बाजारात मिळणाऱ्या काही टुथपेस्टमध्ये बॅक्टेरिया नाशक म्हणून अल्प प्रमाणात (१००० पी.पी.एम – दशलक्ष भागात एक हजार ) फ्लोराइड  वापरतात. तोंड धुताना ते धुतले जाते. पण वनस्पतींना १०० पी.पी. एम. फ्लोराइड विषारी ठरते. कारण हे रसायन पाना-फुलांत साठत जाते. अन्नपाण्यातून या विषाचे सतत शोषण झाल्यास फ्लुओरायसिस हा रोग होतो. हिरडय़ा अशक्त होऊन दात पडतात, हाडे झिजून पायांचा आकार बदलतो. कारखान्याच्या परिसरात वाढणाऱ्या गवत पाल्यावर चरणाऱ्या प्राण्यांचे दात पडून त्यांची उपासमार होते. गुरे उभी राहू शकत नाहीत.

परिसरातील फ्लोराइड्सचे उपकरणाद्वारे मापन करणे खर्चीक आणि वेळखाऊ असते. कुंडीत वाढवता येणाऱ्या फुलझाडावर फ्लोराइडचे मर्यादित डोस देऊन झाडावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करतात. अशा प्रयोगात ग्लॅडिओलस फ्लोराइडसाठी अतिशय संवेदनशील असल्याचे आढळून आले. त्यांच्या पानांची टोके आणि पांढऱ्या फुलांच्या पाकळ्यांचे काठ लगेचच काळे पडतात. परिसरातील या विषाचे तातडीचे दर्शक म्हणून ही शोभेची झाडे वापरण्याचा सल्ला संबंधित कारखान्यांना दिला जातो. हे काम हुशारीने केल्यास कमी वेळात, माफक खर्चात कारखान्याच्या परिसरातील फ्लोराइड्सच्या प्रदूषणाचे मापन होऊन धोक्याचे प्रमाण समजण्यास सोपे जाते.

–  प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org