एकोणिसाव्या शतकात अलेक्झांड्रिया येथून लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क शहरांमध्ये तीन प्राचीन इजिप्शियन ओबेलिस्क्स म्हणजे विजयस्तंभ आणून उभे केले गेले. या तीन स्तंभांना ‘क्लिओपात्राज् नीडल्स’ – क्लिओपात्राच्या सुया – असे मजेदार नाव दिले गेले आहे! खरे तर या ओबेलिस्क्सचा क्लिओपात्राशी तसा काहीही संबंध नाही. क्लिओपात्रा सातवीच्या जन्मापूर्वी- साधारणत: इ.स.पूर्व १४५० ते इ.स.पूर्व १३८० या काळात-  फॅरो टुथमॉस तृतीय आणि फॅरो रामेसिस द्वितीय यांच्या काळात (म्हणजे क्लिओपात्राच्या जन्मापूर्वी हजार वष्रे) हे स्तंभ तयार केले गेले. काही विशेष लढाई मारली किंवा आपल्या कारकीर्दीला पंचवीस वष्रे झाली की इजिप्तिशियन राजांमध्ये अशा प्रकारचे लाल ग्रॅनाइट दगडावर विजयलेख खोदण्याची प्रथा होती. दक्षिण इजिप्तमधील अस्वानच्या परिसरातील प्रचंड मोठय़ा ग्रॅनाइटच्या शिळा या कामासाठी निवडल्या जात. अशा प्रकारचे चित्रलिपीत (इंग्रजी शब्द : हायरोग्लिफ्स) खोदलेले हे ओबेलिस्क नेहमी प्रार्थनास्थळांच्या प्रवेशद्वारावर जोडीने उभे केले जात.

तत्कालीन इजिप्तचा शासक मुहम्मद अली याने १८१९ साली अलेक्झांड्रिया येथील एका मंदिराच्या प्रवेशद्वारावरील दोन ओबेलिस्कपकी एक ब्रिटनला आणि दुसरा अमेरिकेला भेट म्हणून दिले. प्रत्येकी २२४ टन वजनाचे आणि २१ मीटर उंचीचे लाल ग्रॅनाइटचे अवाढव्य स्तंभ लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये आणणे हे मोठे जिकिरीचे आणि खर्चीक काम होते. विल्यम जेम्स विल्सन यांनी या वाहतुकीसाठी दहा हजार पौंडांची देणगी दिल्यामुळे हे दोन विजयस्तंभ लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये पोहोचले. लंडनच्या वेस्टमिन्स्टरमध्ये १८७७ साली हा ओबेलिस्क उभा केला गेला. दुसरा ओबेलिस्क न्यूयार्कच्या सेंट्रल पार्कमध्ये १८८१ साली उभा राहिला. दक्षिण इजिप्तमधील लुग्झर येथील एका मंदिराच्या प्रवेशद्वाराशी उभ्या असलेल्या ओबेलिस्कच्या जोडीपकी एक, मुहम्मद अलीने फ्रान्सच्या सरकारला १८२६ साली भेट दिला. पॅरिसमधील प्लेस दि ला काँकॉर्ड या प्रसिद्ध चौकात हा विजयस्तंभ सन १८३३ मध्ये उभा केला गेला. हा ओबेलिस्क २३ मीटर्स उंच, तर २३६ टन वजनाचा आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

वैराण प्रदेश

पृथ्वीवर असे अनेक भाग आहेत जेथे वर्षभरात २५० मिलिमीटरसुद्धा पाऊस पडत नाही. जोडीला दिवसा ५० अंशापर्यंत पोहोचणारी गरम हवा आणि रात्री ५ अंशाला उतरणारे तापमान. अशा ठिकाणी वैराण प्रदेश तयार होतात. पृथ्वीवरील २५ टक्के जमीन वैराण आहे. अमेरिकेतील डेथ व्हॅली समुद्रसपाटीपेक्षा खाली आहे, तर अनेक उंच पर्वतही वैराण आहेत. अशा कठीण परिस्थितीतही अनेक वनस्पती-प्राणी अनुकूलन करून जगतात. त्यांची विविधता पर्जन्यवनातील जैववैविध्याच्या पाठोपाठ आहे. पाऊस थोडा असला तरी एकदम पडतो. दिवस-रात्रीच्या विषम तापमानामुळे वादळवारे नेहमीचेच. वनस्पती आणि प्राणी अशा टोकाच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे असल्याने तेथे तग धरू शकतात.

वनस्पतींची वाढ खुरटी, जमिनीवर एक-दोन मीटर उंच. जमिनीखाली मात्र मुळे पाण्याच्या शोधात खोलवर पोहोचणारी. राजस्थानात वाढणाऱ्या खेजडीची मुळे सहज ७-८ मीटर खोल पोहोचतात. एक-दोन मीटर उंचीच्या खेजडीच्या झाडाची मुळे जमिनीत ४३ मीटर पसरलेली असल्याची नोंद आहे. थोडय़ा वेळात पडणारा मोठा पाऊस जमिनीत मुरण्याआधी शोषून घेण्यासाठी लेप्तडेनिया आणि बोऱ्हाविया झुडपांची मुळे तीन-चार मीटर दूपर्यंत पसरलेली पुष्करच्या वाळूत पाहण्यात आली आहेत.

शोषलेले पाणी बाष्पोच्छ्वासाने हवेत जाऊ नये म्हणून झाडाच्या वाढीचा माफक वेग, लहान पाने, श्वसनरंध्रे खोलवर, त्यावर रक्षक रोम व मेणाची कमान मांसल पाना-खोडांत पाण्याची साठवण यामार्फत मिळालेले पाणी वनस्पती सांडू देत नाहीत. वाऱ्यामुळे वाळू उडल्यावर उघडी पडलेली मुळे बुचाच्या आवरणामुळे सुकून जात नाहीत आणि उडालेली गरम वाळू झुडपावर पडल्यास लहान पानांमधून जमिनीवर पडते, झुडूप गुदमरत नाही.

आफ्रिकेतील सहारा वाळवंट सपाट असून खडक आणि वाळूचे, समुद्रापासून दूर, कोरडे आहे. मध्य आणि उत्तर अमेरिकेतील वाळवंटे, खंडांच्या स्थलांतरामुळे डोंगर-दऱ्यांची आहेत. आफ्रिकेतील नमिब आणि चिलीतील अटाकामा वाळवंटे समुद्राजवळ आहेत. ऑस्ट्रेलियातील वाळवंटात लोकसंख्या  दर चौरस कि.मी. मध्ये एक इतकी कमी, तर दक्षिण आशियातील थर वाळवंटात सर्वात जास्त लोकवस्ती आहे.

जैवविविधतेच्या आणि उत्क्रांतीच्या अभ्यासकांना वैराण प्रदेश बरेच काही शिकवतात. थरच्या वाळवंटात आणखी कालवे काढून पाणीपुरवठा वाढवला तर जैववैविध्याचे काय होईल?

प्रा. शरद चाफेकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org