सुनीत पोतनीस

कॉलिन मॅकेन्झी हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत प्रथम लष्करी अधिकारी होते पुढे भारताचे पहिले सव्‍‌र्हेयर जनरल बनले. कॉलिन हे पुरातन वस्तूंचे संग्राहक आणि पौर्वात्य भाषा तसेच संस्कृतींचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्थानिक दुभाषे आणि विद्वानांच्या मदतीने दक्षिण भारतातील धर्म, मौखिक इतिहास आणि शिलालेख अभ्यासले. विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांताल वास्तुशास्त्रीय सौंदर्य आणि महानता प्रथम प्रकाशझोतात आणून जगाला ओळख करून देणारे मॅकेन्झीच होत.

कॉलिन मडरेक मॅकेन्झी हे जन्माने स्कॉटिश. स्कॉटलंडमधील स्टॉर्नाय द लुईस बेटावर १७५४ साली ते जन्मले. वडील व्यापारी. १७८३ साली कॉलिन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीसाठी मद्रासला दाखल झाले. प्रथम पायदळात सामान्य सैनिक म्हणून. पुढे त्यांची बदली इंजिनीअरिंग विभागात झाली. सन्य दलाच्या अभियांत्रिकी विभागात त्यांनी मदुराई, कोइमतूर, मद्रास वगैरे ठिकाणी काम केले. लष्करी अभियांत्रिकी विभागात त्यांनी कॅडेट म्हणून सुरुवात करून फर्स्ट लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर आणि कर्नल अशा बढत्या मिळत गेल्या.

१७९९ मध्ये कॉलिन श्रीरंगपट्टणच्या चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात ब्रिटिश सन्यात कॅप्टन होते. या युद्धात टिपूचा पराभव झाल्यावर कॉलिन यांनी १७९९ ते १८१० च्या दरम्यान म्हैसूर इलाख्याचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू निजामाच्या राज्याच्या सीमा निश्चित करणे हा होता. या भौगोलिक सर्वेक्षणाबरोबरच त्यांनी या परिसराचा राजकीय इतिहास, रीतीरिवाज, लोककथा, लोकसंख्या, वास्तुकला यांचाही अभ्यास केला. या सर्वेक्षणाच्या कामात अनेक दुभाषी, ड्राफ्टस्मन, इलस्ट्रेटर यांच्या चमूचा समावेश होता. त्यांचे प्रमुख दुभाषी कवेली वेंकट बोरिया हे संस्कृत, तामिळ, तेलुगू, कन्नड भाषांचे जाणकार होते. १८१५ साली कॉलिन मॅकेन्झींची नेमणूक भारताचे पहिले सव्‍‌र्हेयर जनरल या पदावर झाली. कलकत्त्यात फोर्ट विल्यम येथे भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय स्थापन करण्यात आले. कॉलिन मात्र काही काळ मद्रास येथेच राहिले. या काळात त्यांनी त्रावणकोर, हैद्राबाद, कूर्ग येथे उपसर्वेक्षकांच्या नेमणुका केल्या आणि १८१७ साली कलकत्त्याच्या सर्वेक्षण मुख्यालयात रुजू झाले.

sunitpotnis@rediffmail.com