दुसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रनिर्मितीसाठी लागणारे युरेनियम अमेरिकेने काँगोकडून घेतले होते. बेल्जियम हे दोस्तराष्ट्रांसमवेत होते. युरेनियमखेरीज तांबे, रबर व अनेक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अमेरिका आणि ब्रिटनला काँगोकडूनच होत असे. युद्धानंतर बेल्जियनांच्या वाढत्या स्थलांतरामुळे काँगोत गोऱ्यांची वस्ती वाढून त्यांची संख्या १९५० मध्ये एक लाखावर गेली. युद्धपश्चात हे नवे गोरे आल्यावर मूळ काँगोलीज लोकांपैकी उच्चशिक्षित, सरकारी नोकरीत अधिकारपदावर असलेल्या आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्या ‘बाबू’ लोकांचा एक वेगळा वर्ग तयार झाला. त्यांचे क्लब तयार झाले. इतर बांधवांपेक्षा ते स्वत:ला उच्च समजू लागले.
काँगो हे बेल्जियमच्या राजाची मालमत्ता (पण म्हणायचे- ‘फ्री स्टेट’!) असताना त्याने तिथल्या लोकांवर सक्तीची मजुरी लादली. १९२० ते १९५० पर्यंत सक्तीच्या मजुरीचे प्रमाण वाढतच गेले. या काळात काँगोच्या काही भागांत हिरे व तांब्याच्या खाणी सुरू झाल्या होत्या. या खाणींत आणि अन्यत्र सुरू असलेल्या सक्तीच्या मजुरीत १९३५ साली वाढ होऊन प्रत्येक काँगोलीज माणसाला वर्षातून ६० दिवस ही मजुरी बंधनकारक झाली. त्यामुळे या लोकांत बेल्जियन सरकारविरोधात विद्रोहाने मूळ धरले. त्यातून त्यांनी संपाचे हत्यार उपसल्यावर सरकारने दडपशाही सुरू केली. १९४८ मध्ये सक्तीच्या मजुरीचे प्रमाण वर्षातून १२० दिवस झाल्यावर लोकांचा असंतोष, संप, हिंसक निदर्शने व सरकारची अमानुष दडपशाही शिगेला पोहोचली.
उच्चशिक्षित काँगोलीज वर्गातही सरकारविरोधी सूर उमटू लागले. त्यास प्रतिसाद म्हणून बेल्जियन सरकारने स्थानिक नगरपालिकांमध्ये लोकनिर्वाचित प्रतिनिधींकडे काही अधिकार सोपविले. मात्र, लवकरच काँगोला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या काही संघटना तयार होऊन स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. अखेरीस बेल्जियन सरकारने नमते घेऊन ३० जून १९६० रोजी काँगोमधील बेल्जियन काँगो वसाहत सरकार बरखास्त करून काँगोलीज जनतेला स्वातंत्र्य प्रदान केले. त्यानंतर काँगोत संसदीय निवडणुका होऊन मूव्हमेंट नॅशनल काँगोलीज पक्षाचे पॅट्रिक लुमुम्बा हे या प्रजासत्ताक देशाचे पहिले पंतप्रधान आणि कासावुबु हे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त झाले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis94@gmail.com