सुताच्या गुणधर्मामधील सर्वात प्रमुख गुणधर्म म्हणजे सुताची तलमता. सुताचा काऊंट अर्थात ज्याला मराठीमध्ये सुतांक म्हणता येईल हे सुताची जाडी मोजण्याचे एक परिमाण आहे. कापड कोणत्या वापरासाठी बनवायचे आहे त्यावर ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुताची जाडी अवलंबून असते. उदा. सतरंजी, चादर अशा गोष्टींसाठी वापरण्यात येणारे कापड हे जाडे भरडे असते आणि अशा कापडासाठी जाडे भरडे सूत वापरावे लागते. शर्ट, पँट, वगरे गोष्टींसाठी वापरायचे कापड हे मध्यम जाडीचे असते आणि यासाठी मध्यम जाडीचे सूत वापरावे लागते. साडी, धोतर, मलमल अशा तलम कापडांसाठी तलम किंवा अत्यंत तलम सूत वापरावे लागते.
धातूच्या तारेची जाडी ही मायक्रोमीटर किंवा व्हíनयर कॅलिपर यासारख्या साधनांनी मोजतात. या प्रकारच्या मोजणीमध्ये तारेचा पृष्ठभागावर या साधनांनी प्रत्यक्ष स्पर्श करून जाडी मोजतात. परंतु सुताच्या बाबतीत ही साधने वापरता येत नाहीत. कारण सूत हे मऊ असते आणि पृष्ठभागावर दाब दिला असता त्याची जाडी कमी होते आणि म्हणून धातूच्या तारेची जाडी ज्या पद्धतीने मोजता येते त्या पद्धतीने सुताची जाडी मोजणे अशक्य असते. म्हणून सुताची जाडी ही त्याच्या रेषीय घनतेच्या रूपात अप्रत्यक्षपणे मोजली जाते व या रेषीय घनतेवर आधारित सुताला एक अंक बहाल करण्यात येतो याला ‘सुतांक’ असे म्हणतात. सुतांक हा सुताच्या रेषीय घनतेवर अवलंबून असतो. काही पद्धतीत सुतांक हा रेषीय घनतेच्या बरोबर उलटय़ा रीतीने दिला जातो. म्हणजे जर रेषीय घनता वाढली म्हणजे सुताची जाडी वाढली तर सुतांक कमी होतो आणि जर रेषीय घनता कमी झाली म्हणजे सुताची जाडी कमी झाली तर सुतांक वाढतो. म्हणजे सुताची जाडी आणि सुताला देण्यात येणारा सुतांक हे परस्परविरोधी प्रमाणात असतात. अशा पद्धतींना ‘अप्रत्यक्ष सुतांक पद्धत’ असे म्हणतात.
दुसऱ्या प्रकारच्या पद्धतीत सुतांक हा सुताच्या रेषीय घनतेच्या समप्रमाणात असतो. म्हणजे रेषीय घनता म्हणजेच सुताची जाडी वाढली तर सुतांक वाढतो आणि रेषीय घनता म्हणजेच सुताची जाडी कमी झाली तर सुतांक कमी होतो. अशा पद्धतींना ‘प्रत्यक्ष’ किंवा ‘सरळ सुतांक पद्धत’ असे म्हणतात.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – राजपिपला राज्यस्थापना
सध्याच्या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्याचे प्रमुख शहर राजपिपला ऊर्फ नांदोड येथे गोहिल राजपुतांच्या घराण्याची सत्ता असलेले प्रमुख संस्थान होते. नर्मदा आणि तापी या गुजरातच्या दोन नद्यांच्या खोऱ्यात आणि दक्षिणेला सातपुडा पर्वताच्या रांगा असलेल्या राजपिपला संस्थानचे राज्यक्षेत्र ४००० चौ. कि. मी. होते. ९२५ खेडी अंतर्भूत असलेल्या या संस्थानाची १९०१ साली लोकसंख्या होती १,१८,०००. राजपिपलाचे राज्य १३४० साली कुमार श्री समरसिंहजी या भावनगरच्या (पूर्वीचे घोघा) राजघराण्यातील वंशजाने स्थापन केले. उज्जैनच्या परमार राजपूत राजघराण्यातील राजा राव चौक्राना याने जुनाराज हे राज्य स्थापन केले होते. समरसिंहजी हा चौक्रानाच्या मुलीचा मुलगा. चौक्राना निपुत्रिक असल्याने गादीला वारस म्हणून समरसिंहजीला म्हणजेच नातवाला दत्तक घेतले. समरसिंहजीने जुनाराजच्या राजपदावर आल्यावर आपले नांव बदलून अर्जुनसिंहजी; तर राज्याचे नाव राजपिपला असे केले.
राजपिपलाच्या पुढच्या राज्यकर्त्यांना अहमदाबादचे सुलतान, मोगल बादशाह व पुढे बडोद्याचे गायकवाड यांच्या नियमित आक्रमणांना तोंड द्यावे लागले. अनेक वेळा या आक्रमणांमुळे राज्य सोडावे लागलेल्या राजांना आसपासच्या भिल्ल जमातीच्या लोकांनी मदत केल्यामुळे राजपिपला परत मिळाले. १७३० मध्ये, मोगलशाही दुबळी झाल्यावर महाराणा वेरीसालजी (प्रथम)ने मोगलांना खंडणी देणे बंद करून स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला. अठराव्या शतकाच्या अखेरीस गायकवाडच राजपिपलाकडून खंडणी वसूल करू लागले, पण ब्रिटिश हस्तक्षेप व राज्यावर आलेला महाराणा वेरीसाल द्वितीय याचे धोरण यांमुळे ही खंडणी बंद झाली.
याच वेरीसाल द्वितीयने १८५७च्या स्वातंत्र्य समरात ब्रिटिशांना विरोध केल्याने त्यांनी बेरीसालला पदच्युत करून त्याचा मुलगा गंभीरसिंहजीस १८६० साली गादीवर बसविले. गंभीरसिंहजीच्या  कुशासनामुळे राज्यात अनागोंदी माजल्याने त्याला पदच्युत करून महाराणा छत्रसिंहजीला ब्रिटिशांनी गादीवर बसविले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com