मासे हे व्यक्तीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी एक पोषक अन्नस्रोत आहे. मासा फार मऊ, लवकर शिजणारा, सहज पचणारा अन्नपदार्थ आहे. आपल्या शरीरास आवश्यक कबरेदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे अशी सर्व सत्त्वे त्यात आहेत. हृदयास निरोगी ठेवण्यास आणि रक्तप्रवाह नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे ओमेगा-३ माशातून आपल्याला उपलब्ध होऊ शकते. म्हणूनच, आहारतज्ज्ञ लहान बाळांना, गर्भवती स्रियांना आणि कुपोषितांना मासे खाण्याचा सल्ला देतात.
आपल्याकडे कुपोषणाची समस्या प्रकर्षांने जाणवते. या समस्येमुळे नवजात बाळांचे वजन कमी भरते. परंतु ज्या प्रांतात मासे खाल्ले जातात, तिथे ही समस्या कमी प्रमाणात आढळते, असा तज्ज्ञांचा अहवाल आहे. जगात भारत मासे उत्पादन क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामानाने, मत्स्यउत्पादन फार कमी आहे. आíथकदृष्टय़ा, मत्स्यउद्योग राष्ट्राला समृद्ध करण्यास मदत करीत आहे. दरवर्षी ताजे मासे, त्यांचे बीज, संकरित मासे व कोळंबी आणि त्यापासून तयार केलेली उत्पादने परदेशात निर्यात होतात. या व्यापारातून दरवर्षी दहा हजार कोटी डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलनाची आपल्याला मिळकत होते. या उद्योगातून मोठय़ा प्रमाणात रोजगारही उपलब्ध होतो.
केंद्र शासनाने १९४८ साली पश्चिम बंगाल, केरळ येथे मात्स्यिकीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन केल्या. त्यानंतर १९६२ साली शेतकरी, मत्स्यविकास अधिकारी यांना प्रशिक्षण देणारी सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन ही संस्था मुंबई येथे स्थापन करण्यात आली. हे पहिले व एकमेव मात्स्यिकी विद्यापीठ असून येथे पदवी व पदव्युत्तर शिक्षण देण्यात येते. १९६९ साली मात्स्यिकीचे पहिले विद्यालय कर्नाटकमधील मंगळूर येथे सुरू करण्यात आले.
 सध्या भारतात नऊ मत्स्य संशोधन संस्था, २० विद्यालये, प्रत्येक राज्यात त्यांची प्रशिक्षण केंद्रे व कृषी विज्ञान केंद्रे आहेत. मात्स्यिकीच्या विविध विषयांचे शिक्षण येथे देण्यात येते.

वॉर अँड पीस: क्षूद्र त्वचाविकार : तीळ, मास, चामखीळ, लांछन
दिवसेंदिवस छोटय़ा छोटय़ा त्वचाविकारांनी पछाडलेले रुग्ण मोठय़ा संख्येने; त्वचारोगतज्ज्ञांकडे जातात. डॉक्टरवैद्यांकडेही येतात. माझेकडे आलेल्या अशा रुग्णांना मी खूप पथ्यापथ्याचा सल्ला देणे जास्त पसंत करतो. काळे, वेदनारहित व तिळांसारखे जे त्वचेवर डाग उठतात त्यांस ‘तिलकालक’ म्हणतात. तेच जाड व उंच असल्यास त्यांस ‘मस’ म्हणतात. मसापेक्षांहि उंच, पांढरे वा काळे असतात त्यास ‘चामखीळ’ म्हणतात. जन्मत: काळा/पांढरा व त्वचेबरोबर जो वाटोळा डाग असतो त्यास ‘लांछन’ म्हणतात.
या सगळ्या क्षुल्लक त्वचाविकारात खाण्यापिण्याच्या बंधनांची मदत खूपच मोलाची व खर्चाच्या दृष्टीने अल्पमोलाची ठरते. मीठ, आंबट, खारट पदार्थ, लोणची, पापड, शिळे अन्न, फास्टफूड, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, मिसळभाज्या, दही, रसम सांबार, इडलीडोसा, ढोकळा, सॉस, व्हिनेगार, शेव, भजी, चिवडा आदी टाळावेत. जेवण साधे फिके, शक्यतो उकडलेल्या भाज्या, ज्वारी, मूग असे असावे. असे पथ्यापथ्य पाळल्यामुळे हे क्षुद्ररोग वाढत नाहीत. लवकर आटोक्यात येतात. तीळ या विकाराची कोणी कात्री देऊ शकत नाही. तीळ आपोआप येतात, आपोआप जातात. औषधोपचाराशिवायही जातात पण ज्यांचे तीळ खूप मोठे असतात त्यांनी त्या जागेचा वर्ण सुधारण्याकरिता एलादितेल थेंबथेंब दिवसातून ४-५ वेळा लावावे. तीळांची संख्या वाढत असल्यास प्रवाळ, कामदुधा, उपळसरी सकाळ संध्याकाळ; त्रिफळाचुर्ण रात्री अशी औषधे घ्यावी. मस खूप लहान असल्यास दुर्लक्ष करावे. सर्जरस किंवा राळेचे मलम घासून लावल्याने मस बहुधा ८-१५ दिवसात बरा होतो. मस आकाराने मोठा असल्यास घोडय़ाचा केस करकचून बांधावा. मस निश्चयाने गळून पडतो. चामखीळ विकाराकरिता सर्जरस मलम लावणे हा हुकमी उपाय! चामखीळीचा आकार मोठा असल्यास आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ अशी औषधे घ्यावी. लांछन विकारात क्षीरिवृक्षांच्या साली, कोंब दूधात वाटून लेप करावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      जत्रा
सार्वजनिक रुग्णालयांमध्ये नातेवाईकांना भेटण्याच्या वेळात जत्रा भरते. काही रुग्ण खूप आजारी असतात त्यांच्याबद्दल मी लिहीत नाही; परंतु बहुसंख्य, विश्वास ठेवा, बरे होण्याच्या मार्गावर असतात. त्या जत्रेत. आया-माया-ताया- बाप- काका-पोरटे सगळे येतात. पोरटे इथे गोटय़ा, क्रिकेटसारखे खेळ खेळतात. बाया फतकल मारून बसतात. बहुभाषिक असल्यातरी सुख-दु:खाच्या गोष्टी करतात. पुरुष सवते उभे राहतात आणि तंबाखू चोळत गावाकडच्या गप्पा मारतात. शस्त्रक्रिया झालेले रुग्ण हिंडू-फिरू लागले असतील तर बाहेर येतात. मग आपले कसे ऑपरेशन झाले ते सांगतात. एखादा विचारतो काय रे तुला ‘हॉक्सिजन’ दिला का तेव्हा उत्तर मिळते दोन सिलेंडर हॉक्सिजन दिला. बाळंतिणीच्या वॉर्डात जाताना काळजी घ्यावी लागते. माझा एक स्त्री/ प्रसूतीतज्ज्ञ आहे तो आधी परिचारिकेला सांगतो. मी राऊंडला येतो आहे सगळ्यांचे कपडे आवरा. मग सिस्टर वार्ड फिरते आणि हाकारे देते. या वार्डाच्या बाहेर सासू आणि माय बसलेली असते. बाळंतिणीचे ऑपरेशन करावे की, कसे याची चर्चा करतात. मग गर्दी ओसरते.
सर्वत्र सर्व प्रकारचा कचरा पडलेला असतो. मग संध्याकाळच्या पाळीचा एखादा कामगार येतो, तो कलाकार कसे हळुवार कुंचले मारतो तसा हळुवारपणे केर काढतो. असतात चार कर्मचारी, पण येतो एकच. बाकीचे तिघे सही करून आपली उद्यमशीलता दाखविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी खासगी नोकरी करतात. गणवेश बदलावा एवढाही संकोच त्यांना वाटत नाही. जो कामावर आलेला असतो तो म्हणतो काम झाल्याशी कारण, चारी मजले दोन तासांत मी साफ करतो. मुळात मग चार कशाला ठेवले? एकदा सगळीकडे कचरा पडला होता तेव्हा एका नातेवाईकाला मी म्हटले, ‘‘कशाला एवढी घाण करता?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘घाण? कुठे आहे घाण? घाण बघायची असेल तर धारावीत या’’ मी म्हणालो, ‘‘तेही खरेच.’’
नातेवाइकांची भेटण्याची वेळ नसते तेव्हा सुरक्षा रक्षक गेटवर उभे असतात, पास बघतात आणि माणसे सोडतात. कधी कधी हुज्जत घालतात. कधी कधी चिरीमिरी घेऊन प्रवेश दिला जातो. एकदा एकाला मी दोन रुपये घेताना पकडला. तो कावरा-बावरा झाला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा बिचकला. मी त्याला म्हटले, ‘‘अरे केवढी महागाई झाली. जरा दर वाढव’’ तेव्हा म्हणाला, ‘‘जुनी रूढी आहे, गरिबांना त्रास होईल असे मी काही करीत नाही.’’ एक रक्षक मला म्हणाला, ‘‘मुलीचं लग्न काढलंय. मला चार नंबर आत येण्याच्या गेटवर ठेवा. सध्या सहा नंबरवर आहे. तिथून सगळे बाहेर जातात, चार पैसेही मिळत नाहीत. दोन महिनेच चार नंबर द्या. मंडपाचा खर्च निघेल.
मी म्हणालो, ‘‘पुढच्या जन्मी तू मंत्री होशील.’’
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत: ७ सप्टेंबर
१९१४ > अनुवादक, ग्रंथसंपादक आणि ‘जनवाणी’ या समाजवादी विचारसरणीच्या नियतकालिकाचे संपादक माधव गजानन बुद्धिसागर यांचा जन्म. ‘मराठी सुनीत’, ‘प्राचीन मराठी गद्य’, ‘चिपळूणकर लेखसंग्रह’ आदी ग्रंथ त्यांनी संपादित केले.
१९१६ > लेखक-पत्रकार माधव पंढरीनाथ शिखरे यांचा जन्म. ‘स्मृतीची चाळता पाने’ आणि ‘रोजनिशीतील पाने’ हे त्यांनी ‘संजय’ या टोपणनावाने केलेल्या वृत्तपत्रीय लेखनाचे संग्रह निघाले, तर ‘अमेरिकन परराष्ट्र धोरण’ आणि ‘भारतीय संस्कृती’ ही त्यांची अनुवादित पुस्तके.
१९२७> ‘मराठी भाषेची घटना’, ‘अलंकार विवेक’, ‘बालबोध व्याकरण’,  ‘मराठी पद्य-वाचन’ आदी भाषाभ्यासाची, तर ‘लग्नविधी आणि सोहळे’ , ‘धर्म आणि नीतीपर व्याख्याने’ ही समाजविषयक पुस्तके लिहिणारे रामचंद्र भिकाजी जोशी यांचे निधन. (कथाकार व ललित-प्रवासवर्णनकार रा. भि. जोशी हे नंतरचे.. ते हे नव्हेत.)
१९५३> कथाकार, कादंबरीकार व कवी ‘बी. रघुनाथ’ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे अवघ्या ४०व्या वर्षी निधन. एवढय़ा अल्पकाळात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सात कादंबऱ्या, ६० कथा आणि १५०च्या आसपास कविता लिहिल्या होत्या.
 संजय वझरेकर