News Flash

कुतूहल: उन्हाळ्यात थंडाव्याची व्यवस्था

हिवाळ्यात कोंबडय़ांच्या घराच्या बाजूस प्लॅस्टिकचे किंवा पोत्याचे पडदे लावावेत. थंडीपासून कोंबडय़ांचा बचाव करायचा असेल तेव्हा पडदे खाली

| September 2, 2013 01:01 am

सोडावेत व इतर वेळी वर गुंडाळून ठेवावेत. उन्हाळ्यातील अतिउष्ण वाऱ्यांपासून बचाव करण्यास याचा उपयोग होतो.
हवामान थोडे उष्ण असल्यास व हवा मोकळी वाहात असल्यास विशेष समस्या नसते. परंतु हवा अधिक उष्ण (३५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान) व वाऱ्याच्या झळा वाहात असल्यास त्याचा कोंबडय़ांवर अनिष्ट परिणाम होतो. हवेचे तापमान अधिक असेल आणि हवा वाहाती नसेल तर घरातील उष्णतेचे प्रमाण बरेच वाढते आणि कोंबडय़ांना त्रास होतो. अशा वेळी आतील हवा थंड राहाण्याकरिता उपाय करणे आवश्यक असते. यासाठी कोंबडय़ांची घरे पूर्व-पश्चिम दिशेत बांधावीत. घराभोवती सात-आठ फूट अंतरावर मोठी पाने असलेली झाडे लावावीत. घराच्या बाह्य़ बाजूस व छपराच्या वरच्या बाजूस चुना किंवा पांढरा रंग द्यावा. छपराला एल्युमिनियम किंवा नवीन निघालेले कूलंट पेंट दिल्यास घराचे तापमान कमी होण्यास मदत होते. छपरावर तुरांटय़ा, कडबा, उसाची पाचट टाकावी, म्हणजे तापमान कमी होण्यास मदत होते.
घर थंड करण्याच्या विविध पद्धती कमी किमतीत विकसित झालेल्या आहेत. यामध्ये िस्प्रकलर्स आणि फॉगर्स यांचा समावेश होतो. घराच्या छतावर िस्प्रकलर बसवल्यास छपरावर दोन्ही बाजूंनी पाणी पडते आणि बाजूने लावलेले पडदे भिजतात. यामुळे पक्ष्याच्या घरामध्ये थंड हवा येते आणि तापमान कमी होण्यास मदत होते. तसेच घराच्या आतील बाजूस फॉगर बसवतात. फॉगरला पाणी कमी लागते. दुपारी १ ते ४वाजेपर्यंत अध्र्या तासाच्या फरकाने ४  ते ५ मिनिटे फॉगर चालवावेत. अशाप्रकारच्या माध्यमामुळे घरातील तापमान ५ ते ६ अंश सेल्सियसने कमी होण्यास मदत होते आणि पक्ष्यांचे उन्हापासून संरक्षण होते.

वॉर अँड पीस : गभणी समस्या : आयुर्वेदिय मार्गदर्शन
गर्भिणी समस्यांवर ज्या काळात आयुर्वेदिय मोठे ग्रंथ लिहिले गेले त्या वेळेस स्त्री व गर्भ परीक्षणाची आजच्यासारखी शंभर टक्के अचूक यंत्रणा नव्हती. चरक, सुश्रुत, वाग्भट, काश्यप संहितांमध्ये जे मार्गदर्शन केलेले आहे; त्यामागील तत्त्व कटाक्षाने पाळले; तरी तुमच्या-आमच्या लेकीसुनांच्या खूपच हिताचे ठरेल. ‘ज्या बाळंतपणाच्या दवाखान्यात नाव घातले आहे, त्यांच्याच सल्ल्याने चला,’ असा सावध सल्ला मी प्रथम देतो. तरीपण मंडळी हटत नाही. त्याकरिता हा थोडक्या शब्दातील सुरक्षित सल्ला.
गर्भिणी स्त्रियांची पहिल्या तीन महिन्यात जास्त काळजी घ्यावी लागते. गर्भव्यक्त झाला असता जी लक्षणे होतात ती लक्षणे पुढील प्रमाणे- शरीर कृश होणे, कूस जड होणे, मूच्र्छा, वांती, अरुची, जांभई, लालास्त्राव, ग्लानी, रोमपंक्ती स्पष्ट होणे, आंबट पदार्थावर वासना जाणे, स्तन पुष्ट व दुग्धयुक्त होणे, त्यांची अग्रे काळी होणे, पाय सुजणे, अनेक प्रकारचे डोहाळे होणे व कित्येकांच्या मते हस्तपादादिकांचा दाह. या लक्षणांनुरूप अनुक्रमे पुढील उपचार तारतम्याने योजाव : १) शतावरीकल्प, शतावरीघृत, २) आम्लपित्तवटी ३) लघुसूतशेखर ४) लघुसूतशेखर  ५)आम्लपित्तवटी ६) प्रवाळपंचामृत ७) ज्वरांकुश ८) चंद्रप्रभा ९) व १०) लघुसूतशेखर ११, १२ व १३) चंद्रप्रभा, १४) तारतम्याने डोहाळे पुरवणे, १५) शतधौतघृत लावणे.
गर्भाच्या हृदयाचा मातेच्या हृदयाशी संबंध असतो. यास्तव गर्भिणीचे डोहाळे न पुरविणे हे इष्ट नव्हे. चौथ्या महिन्यापासून सातव्या महिन्यापर्यंत अंगप्रत्यंगे स्पष्ट होतात. स्नायू, शिरा, केस, बळ, रंग, नखे व त्वचा व्यक्त होते. सातव्यात गर्भाची बहुतेक पूर्ण वाढ होते. या काळात गर्भिणीचे मासानुमास वजन वाढेल पण त्याचबरोबर पायावर फाजील सूज येणार नाही याकरिता चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि, शंृग, पुष्टीवटी, आम्लपित्तवटी, आस्कंदचूर्ण, अश्वगंधारिष्ट अशी औषध योजना फलप्रद ठरते. आठव्या महिन्यापर्यंत जुलाबाचे औषध द्यावयास नको. शुभं भवतु!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. फिनेल
लोकमान्य टिळक रुग्णालयात, स्वत: जमा केलेल्या पैशातून जेव्हा मी स्वच्छता अभियान चालवीत असे तेव्हा सगळ्यात मोठी अडचण काय असेल तर फिनेलच मिळत नाही, अशी एक तक्रार होती. मी म्हणालो, मी आणतो. किती बाटल्या आणू? कल्पना करा कोटय़वधी रुपये पगारावर आणि यंत्रांवर खर्च होत होते, पण फिनेलची बाटली नाही. मी आणतो म्हटल्यावर कामगार हतबुद्ध झाले. अनुकंपनेने नव्हे, तर मी जाब विचारीन म्हणून. तसेच कचरा गोळा करण्यासाठी असलेल्या मोठय़ा प्लास्टिक पिशव्यांचा तुटवडा. मी स्टोअर्समध्ये गेलो तर कळले टेंडर निघाले आहे. वेळ किती लागणार विचारले तर म्हणाले एक-दोन महिने लागतील. मग मी म्हणालो, तोवर काय करणार तर म्हणाले स्पॉट पर्चेस करता येते, पण त्याला ऑर्डर लागते. ती कोण देणार तर विभाग अधिकारी. ते विभाग अधिकारी म्हणाले, त्यालाही थोडा वेळ लागेल. तेव्हा मी म्हणालो मी विकत आणून देतो. तसे तिथला एक अधिकारी म्हणाला तुम्ही फिनेल आणणार, प्लास्टिक पिशव्या आणणार त्या ठेवणार कुठे? मी म्हणालो स्टोअर्समध्ये ठेवा. तेव्हा म्हणाले स्टॉक मिक्स होईल. मी म्हणालो माझ्या विभागात जागा आहे कोपऱ्यात ठेवतो. तेव्हा म्हणाले, शैक्षणिक विभागात असा माल ठेवता येत नाही. मग मी म्हटले, मला जागा द्या.
 मग एकदम टय़ूब पेटली ती कामगारांच्या हवालदाराची. तो म्हणाला, चार नंबरच्या जिन्याखाली ठेवू. तिथे गेलो तर म्हणाला, शहाणे असाल तर या जागेला कुलूप लावा. स्टोअर्समध्ये कुलूपच नव्हते म्हणून गाडी काढली पिशव्या फिनेल आणि कुलूप घेऊन आलो तोवर हवालदार महाशय गेले होते. स्वत: उचलून माल ठेवू लागलो तर तिथला सुरक्षारक्षक म्हणाला, साहेब गेटपास दाखवा आणि कुलूप लावायच्या आधी दुसरी किल्ली साहेबांच्या साक्षीने बोर्डावर लावावी लागेल.
शेवटी मी कंटाळलो आणि त्याला म्हणालो, तुला करायचे ते करून घे मी आता ठेवतोच. तसा म्हणाला, हे बेस्ट झाले. अहो साहेब, म्युन्सिपालटीत कायदा हातात घेतला तर काहीही अपाय होत नाही जर कायदा विचारायला गेलात मग काहीच होत नाही आणि हे फिनेल तुम्ही का आणता. अहो, स्टोअर्सला सांगा ते नक्की आणून देतील. मी त्याला म्हणालो, हो तेही खरेच उद्या तिथेच जातो.
रविन मायदेव थत्ते  

आजचे महाराष्ट्रसारस्वत: २ सप्टेंबर
१८८६ > ‘उपेक्षितांचे अंतरंग’ या कथासंग्रहाद्वारे दलितांची दु:खे मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणणारे श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म. ‘अनामिक’, ‘माणुसकीचा गहिवर’, ‘भावनांचे पाझर’ आदी त्यांची पुस्तकेही उपेक्षितांच्या अंतरंगाकडे पाहणारी आहेत. याखेरीज ‘रामदासांचे प्रपंचविज्ञान’, मराठी भाषेच्या विकासाबद्दलचे ‘रसवंतीची जन्मकथा’, मराठी काव्येतिहास सटीक मांडणारे  ‘संत, पंत, तंत’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
१९७६ > ‘भारतीय ज्ञानपीठ’ पुरस्काराचे मराठीतील पहिले मानकरी विष्णु सखाराम खांडेकर यांचे निधन. ‘ययाति’, ‘कांचनमृग’, ‘दोन धृव’, ‘हिरवा चाफा’, ‘सोनेरी स्वप्नं.. भंगलेली’ या कादंबऱ्यांसह १२ कादंबऱ्या. ‘वायुलहरी’, ‘सायंकाळ’ आदी १० लघुनिबंध संग्रह, ३० कथासंग्रह, सहा रूपक-कथा संग्रह, १० चित्रपटकथा आणि नऊ नाटके असे त्यांचे साहित्यभांडार आहे.
१९९० > मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास अशी ख्याती असलेले नरहर शेषराव पोहनेरकर यांचे निधन. दासोपंतांच्या ‘पासोडी’चे संपादन, ही त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी. ‘विरलेल्या गारा’ मध्ये अनोख्या व्यक्तींची शब्दचित्रे त्यांनी रेखाटली होती.
संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:01 am

Web Title: curiosity management of cool atmosphere in summer for chickens
टॅग : Curiosity
Next Stories
1 कुतूहल: कोंबडय़ांची मोठी घरे
2 कुतूहल-कोंबडय़ांची घरे
3 कुतूहल – कोंबडीच्या पिल्लाची जोपासना
Just Now!
X