शिक्षणाने आपण सर्व काही मिळवू शकतो, याचं एक उदाहरण म्हणजे भास्करराव मुंढे. सुरुवातीला त्यांनी बँकेत कारकुनाची नोकरी केली. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते आयएएस अधिकारी झाले. ज्या विद्यापीठाच्या वसतिगृहात खोली मिळाली नाही, त्याच विद्यापीठाचे ते काही काळ प्रभारी कुलगुरू झाले. मग औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त झाले. महाराष्ट्रातील एक निरपेक्ष वृत्तीने कार्य करणारा तडफदार अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
नाशिक जिल्ह्य़ातील गिरणा धरण प्रकल्प २००५ साली झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे ओसंडून वाहू लागला. त्याच वेळी धुळे जिल्ह्य़ातील तीन तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती अटळ होती. धुळे जिल्ह्य़ातील अवर्षण परिस्थितीबाबत आढावा घेताना अशी माहिती पुढे आली की, गिरणा धरणाचा पांझण डावा कालवा धुळे जिल्ह्य़ाच्या सीमेवरून जातो. पुराचे पाणी पांझण कालव्यात सोडून पुढे धुळे जिल्ह्य़ातील खोरदड गावाजवळ तोडून एका नाल्यात सोडले तर ते पुढे बोरी नदीत जाते व तिथून बोरी धरणात जाते. जिल्हाधिकारी या नात्याने  मुंढे यांनी तत्परतेने या कल्पनेचा पाटबंधारे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मंत्री, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सरकारी यंत्रणा या सर्वाचे उत्तम सहकार्य लाभल्याने पांझण कालवा फोडून गिरणेचे पाणी बोरी नदी व बोरी धरणात येऊ लागले. या मिनी जोड नदी प्रयोगामुळे शेकडो गावे, काही हजार हेक्टर शेती आणि लाखो ग्रामस्थ यांना पाणी मिळाले. या प्रयोगाचे त्या वर्षी सगळीकडे कौतुक झाले.
शासनाकडून कोणताही निधी न घेता केवळ स्थानिक संस्थांच्या सहकार्याने आणि त्यांच्या स्थानिक संस्थांच्या आíथक सहयोगातून नगण्य खर्च करून मिनी नदी जोड प्रकल्प यशस्वीपणे राबवला गेला. त्याचे फार मोठे श्रेय धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी भास्करराव मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे. मुंढे यांचे नेतृत्व, समन्वयासाठी त्यांनी केलेल प्रयत्न याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.                           

वॉर अँड पीस: हृदयशारीर कसे जपावे
तुम्हा-आम्हाकडे हृदय  नावाचा जो पंप आहे त्याचे शारीर हे स्नायूंनी बनविलेले आहे. ते ठणठणीत हवे म्हणजे ते आपल्या तऱ्हेच्या धावपळीला, श्रमांना, ताणतणावांना,  हवामान वा खाण्या-पिण्यातील बदलाला टिकून राहते. हृदयाच्या चार कप्प्यांची बांधणी लवचिक स्नायूंची असल्यामुळे विविध कप्प्यातील अशुद्ध/ शुद्ध रक्ताचे अभिसरण अखंड चालते.  या कप्प्यांत व हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिन्यात व हृदयाकडून  दुसरीकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत कदापि चरबी साठू नये. ज्याप्रमाणे नदीनाल्यात दगडधोंडे, गाळ साचल्यास पाण्याचा प्रवाह मंदावतो, खंडित होतो, त्या प्रमाणेच हृदयाचे कार्य फाजील चरबी वाढल्याने नीट होत नाही. इथे रक्तातील चरबीची तपासणी उपयोगी पडते. आपल्या शरीराचे वजन, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड ठराविक प्रमाणाच्या बाहेर वाढले असल्यास तत्काळ आहार, खाणे-पिणे, दुपारची झोप याबद्दलचे सामान्य आरोग्यनियम पाळावेत. जेवणात कटाक्षाने उकडलेल्या भाज्या, आळणी जेवण, ज्वारीची भाकरी घ्यावी. अती तेलकट, मांसाहार, केक/मिठाई पूर्ण वज्र्य. घाम निघेल असे गरम पाणी प्याले तर या कप्प्यांची हानी न होता ते शरीर सुधारते.
हृदयाकडे येणाऱ्या व हृदयाकडून जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचा जोम वाढविण्याकरिता अर्जुनसालीचा विविधप्रकारे उपयोग करता येतो. अर्जुनसालीचे चूर्ण, काढा, अर्जुनारिष्ट, राजकषाय यांच्या सुयोग्य वापरामुळे प्रथम लहान रक्तवाहिन्यांचा जोम वाढतो. नंतर मोठय़ा रक्तवाहिन्यांची ताकद वाढते. परिणामी हृदयाचे आकुंचन प्रसरण कार्य उत्तमपणे चालू राहते. हृदयाच्या अंतर्गत भिंतीत काहीवेळा लहान छिद्र असते.  त्याकरिता वयोमानानुसार अर्जुनसालीचा काढा घ्यावा. चिंता सोडावी. फाजील चरबी होऊ नये, वाढलेली कमी व्हावी म्हणून आरोग्यवर्धिनी चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ, अम्लपित्तवटी, रसायनचूर्णाची योजना फलदायी ठरते. पुदिना, आले, लसूण, ओली हळद, तुळशीची पाने चटणी, दीर्घश्वसन, प्राणायाम यांना विसरू नये.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      यज्ञ-व्यय आणि व्यवस्था
या विश्वाचे गमक उष्णता आहे, हे धगधगणारे विश्व हळूहळू निवते आहे आणि त्याचा व्यय होतो आहे आणि शेवटी हे विश्व लय पावेल किंवा पावले पाहिजे असे एक पदार्थ विज्ञानाचे प्रमेय आहे. सगळ्या शेकोटय़ा त्यात इंधन टाकले नाही तर विझतात. आपल्या विश्वाचा आकार अवाढव्य असला तरी आकार म्हटला की मर्यादा आल्या आणि म्हणूनच हे प्रमेय आले असणार.
 सकाळी ताजातवाना होऊन उठलेला माणूस व्यय पावत संध्याकाळपर्यंत दमतो आणि रात्री झोपून परत उठत असला तरी व्यय झालेली सगळी ऊर्जा परत कधीच मिळवू शकत नाही, कारण त्यातली काही लयाला जाते त्या सांडण्याला इंग्रजीत एल्ल३१स्र् असा शब्द आहे. कुंडली मांडताना बारा पैकी पहिले घर त्या दिवशीचा सूर्य सकाळी कोठल्या राशीच्या क्षितिजावर होता यावर ठरते. कारण तो सूर्य ऊर्जेचे स्रोत असतो. मग १२ घरे मांडून झाल्यावर जे बारावे स्थान असते ते व्ययस्थान असते. या स्थानातील ग्रह किंवा सूर्यही निर्बली होतात असे त्या शास्त्राचे (?!) गृहीतक आहे.
एल्ल३१स्र्८ च्या विरुद्ध शब्द र८ल्ल३१स्र्८ असा आहे. एल्ल३१स्र् किंवा व्यय शेवटी जिंकणारच असतात, पण ती अपरिहार्य क्रिया थोपविण्यासाठी नव्हे तर लांबवण्यासाठी संधारण किंवा र८ल्ल३१स्र्८च्या दिशेने पाऊल टाकावे, असे सगळ्याच क्षेत्रात (म्हणजे समाजशास्त्र, पर्यावरण किंवा वैयक्तिक जीवनात) मानले जाते. जलसंधारण हे त्यापैकी एक. पावसाने नद्यांमुळे जमिनीची धूप होते. ती गाळ आणत असेलही, परंतु त्यातला बराचसा गाळ वाहून समुद्रात पडतो. ते थांबवायचे असेल तर पाणी बांध घालून अडवावे किंवा मुळे जमिनीला घट्ट धरतात म्हणून झाडे लावावीत असा सल्ला विज्ञान देते.
जे निसर्गाचे असते त्याची प्रतिकृती माणसातही उमटतेच; आटोपशीर राहणे जड जाते. कारण मन ललचावले जाते. ‘तू’ ‘मी’ असते, चढाओढ असते, द्वेष मत्सर, राग, द्वेष अशा भावना असतात. यातून मार्ग काढण्यासाठी अंमळ विचार करण्याऐवजी शरीरात चाललेल्या अग्नीच्या यज्ञावरचे लक्ष उडते आणि माणूस इतरत्र उपाय शोधू लागतो. फक्त नियम असलेल्या परंतु मन नसलेल्या निसर्गाबरोबर तो व्यवहार करू लागतो तेव्हा विटांचे कुंड करून त्याला आहुती देऊ लागतो तोवर ठीक असते. परंतु इतिहास बघितला तर नरमेध (बळी) अश्वमेध आणि इतर अनेक प्राण्यांचे बळीचे बकरे केले गेले आहेत.
 मानवी व्यवहारांचे संधारण करायचे झाले तर आपण स्वत:लाच बांध घालून घ्यावे लागतात आणि चांगल्या वृत्तीची रोपटी लावून मानसिक धूप थांबवावी लागते, मग खऱ्या अर्थाने यज्ञ होतो. त्या यज्ञाबद्दल ज्ञानेश्वरांनी रचलेल्या रूपकाला जगात तोड नाही. त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत: १५ नोव्हेंबर
१९२३> लोकमान्य टिळकांचे पहिले चरित्रकार कृष्णाजी आबाजी गुरुजी यांचे निधन. ‘नाटय़कलेची उत्पत्ती’, ‘नाटकांची स्थित्यंतरे’, ‘माधवाचार्य चरित्र’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली होती.
१९२९ > कवयित्री शिरीष व्यंकटेश पै यांचा जन्म. वडील आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकातून लेखनाची सुरुवात त्यांनी केली. त्यांचे १० कथासंग्रहदेखील प्रकाशित झाले असले तरी कविता आणि ‘हायकू’ या काव्यप्रकारांसाठी विशेष ओळख आहे.
१९४८>  तब्बल ९६ पुस्तके (७९ कादंबऱ्या) लिहिणारे लोकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवळकर यांचा जन्म. त्यांच्या ‘दुनियादारी’ या सर्वाधिक गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट आल्याने लोकप्रियतेला पुन्हा उधाण आले. १० कथासंग्रह, लेख व काही कविताही त्यांनी लिहिल्या होत्या. पुस्तकांचे शतक गाठण्याआधीच (जुलै २००३) त्यांचे निधन झाले.
१९८२> महात्मा गांधींचे ‘पहिले सत्याग्रही’, विविध धर्मसंस्कृतींचे अभ्यासक आचार्य विनोबा भावे यांचे प्रयोपवेशनानंतर निधन. गीताई, गीताप्रवचने व मधुकर ही त्यांची अजरामर मराठी पुस्तके, परंतु मराठी, हिंदी व गुजरातीत त्यांनी एकंदर सुमारे ५० पुस्तके लिहिली होती.
संजय वझरेकर