दुधातील केसीन या प्रथिनापासून बनविलेल्या ‘अ‍ॅरलॅक’ या तंतूमध्ये जे प्रथिन असते ते लोकरीमधील प्रथिनापेक्षा फारसे वेगळे नसते. हा तंतू तयार करण्यासाठी प्रथम दूध घुसळून त्यामधून लोणी वेगळे केले जाते. तंतू तयार करण्याच्या दृष्टीने लोण्याचा उपयोग असत नाही. त्यानंतर लोणी काढलेले दूध ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापवून त्यामध्ये आम्ल मिसळले जाते. त्यामुळे दुधातील प्रथिन दह्याप्रमाणे एकत्र येते आणि हे दही वेगळे करून ते त्यामधील मीठ व आम्ल काढून टाकण्यासाठी धुतले जाते. हे दही नंतर वाळविले जाते. १०० किलो दुधापासून ३ किलो केसिन मिळते आणि तेवढय़ाच वजनाचा केसिन तंतू मिळतो.
हे दुधापासून मिळविलेले केसिन प्रथिन तंतू तयार करणाऱ्या कारखान्यात आल्यावर याचे प्रथमत: चांगले मिश्रण केले जाते. त्यानंतर त्यामध्ये कॉस्टिक सोडय़ाचे द्रावण मिसळले जाते. यामुळे हे केसिन सोडय़ाच्या द्रावणात विखुरले जाते. हे द्रावण नंतर गाळून तनित्रामधून बाहेर काढले जाते आणि त्यावेळी केसिन प्रथिनापासून तंतू तयार होतात. या तंतूंच्या निर्मितीसाठी आद्र्र कताई पद्धतीचा वापर केला जातो. हे तंतू कताईनंतर अखंड तंतूंच्या स्वरूपात असतात. त्यांचे सर्वसाधारणपणे लोकरीच्या तंतूंच्या लांबी एवढे तुकडे करून आखूड तंतू तयार केले जातात.
केसिन तंतूंचे बरेच गुणधर्म हे लोकरीशी मिळते जुळते असतात. केसिन तंतू हे उबदार आणि मऊ स्पर्श असलेले असे असतात. त्यामुळे लोकरीबरोबर मिश्रण करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. या तंतूंची ताकद लोकरीपेक्षा थोडीशी कमी असते, तर घनता लोकरी इतकीच असते. ओले केले असता केसिन तंतूंची ताकद कमी होते.
केसिन तंतूंचा उपयोग लोकरीबरोबर मिश्रण करण्यासाठी केला जात असे. याशिवाय कापूस, रेयॉन या तंतूंबरोबर मिश्रण करण्यासाठीसुद्धा केसिन तंतूंचा उपयोग केला जातो. लोकरीबरोबर मिश्रण करून केसिन तंतूचा वापर मोजे, स्वेटर, हॅट, गाऊन यांसारख्या गोष्टींसाठी केला जातो. तर केसिनच्या अखंड तंतूंचा उपयोग उशीमध्ये भरण्यासाठी आणि रजया तयार करण्यासाठी होतो.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – इंदौरच्या जवाहरांची वाटणी
इंदौर संस्थानाच्या खजिन्यातले मौल्यवान जडजवाहर होळकर घराण्याच्या सध्याच्या वारसांकडे न राहण्याची तीन कारणे झाली. महाराजा तुकोजीराव होळकर एका खुनाच्या संदर्भात गोवले गेल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना पदच्युत केले. त्यानंतर तुकोजीराव कायमसाठी फ्रान्समध्ये स्थायिक झाले. जाताना त्यांनी आपल्याबरोबर इंदौर पिअर्स, पोर्टर ऱ्होड्स, स्पॅनिश इक्विझिशन वगरे अनेक जवाहर आणि सोन्याचे दागिने नेले. (यापैकी ‘इंदौर पिअर्स’ ही हिऱ्यांची जोडी १९८७ साली ‘ख्रिस्टीज’ या लिलाव संस्थेने विकली, त्या वेळी २७ लाख डॉलर ही किंमत त्यासाठी मिळाली होती).
दुसरे कारण म्हणजे १९९० साली इंदौरच्या शिवविलास पॅलेसमधील चोरी! राणी शर्मिष्ठाबाईंच्या तिजोरीतून हिऱ्या-मोत्यांचे अनेक संग्रह चोरीला गेले.
तिसरे कारण म्हणजे १९६१ साली महाराणी उषादेवींना भरावा लागलेला १.१४ कोटी रुपयांचा मालमत्ता कर. होळकरांनी आपल्या मालमत्ता करभरणीचे नियोजन नीट केले नव्हते. अखेरीस उषादेवींनी जागतिक लिलावांद्वारे अनेक जडजवाहर विकून कराचा भरणा केला. शिवविलास पॅलेसमधील चोरीस गेलेले अनेक दागिने आणि मौल्यवान वस्तू पुरातन सामान विक्रेत्यांकडे सापडले. सापडलेल्या वस्तू कोर्टाच्या ताब्यात असल्याने होळकर वारसांना मिळालेल्या नाहीत. १९४७ साली भारत सरकारने महाराजा यशवंतराव होळकरांकडे त्यांच्याकडे असलेल्या पिढीजात मालमत्तेचा तपशील मागितला होता. त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या तपशिलातील सर्व मालमत्ता होळकर घराण्याची असल्याचे सरकारने जाहीर केले. होळकरांच्या अलीकडच्या पिढीतील प्रिन्स रिचर्ड होळकर (छायाचित्र पाहा) यांनी ज्वेलरी डिझायिनगचे शिक्षण घेऊन अनेक वष्रे जवाहिऱ्याचा व्यवसाय केला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com