सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com
१९९२ मध्ये चेकोस्लोव्हाकियातील सोव्हिएत वर्चस्वाखालील कम्युनिस्टांचे एकपक्षीय सरकार बरखास्त होऊन तिथे बहुपक्षीय चेक आणि स्लोव्हॅक संघराज्याचे प्रजासत्ताक सरकार कार्यरत झाले. या नवजात चेक अँड स्लोव्हॅक संघराज्यातील पश्चिमेचे चेक (झेक) प्रजासत्ताक व पूर्वेकडचे स्लोव्हॅक प्रजासत्ताक या घटक राज्यांतील मतभेदांनी डोके वर काढले. चेकोस्लोव्हाकिया संघराज्यातच बोहेमिया, मोराविया आणि सिलेशिया हे प्रादेशिक विभाग तर पूर्वेकडे स्लोव्हाकिया हा विभाग होता. ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्यकाळ आणि कम्युनिस्ट सत्ताकाळात पश्चिमेकडील चेक प्रदेशाचाच विकास अधिक झाला होता. त्यामुळे दोन्ही प्रदेशांत जी सुप्त तेढ होती तिला १९९२ नंतर तोंड फुटले. विशेषत: कम्युनिस्ट काळातील राष्ट्रीयीकृत चेकोस्लोव्हाकियन उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या मुद्दय़ावरून ठिणगी पडली.

चेक लोकांना सरसकट खासगीकरण तातडीने करायचे होते तर स्लोव्हॅकना ते टप्प्याटप्प्याने करायचे होते. या दोन प्रदेशांतले मतभेद, जून १९९२ मधील निवडणुकीत प्रकर्षांने पुढे आले. परंतु या निवडणुकीनंतर, मतभेद मिटविण्यासाठी दोन्हीकडील नेत्यांनी चर्चा-बैठकांतून सामोपचाराने तोडगा काढला. हा ‘तोडगा’ होता, संघराज्याच्या विभाजनाचा! या निर्णयाची कार्यवाही १ जानेवारी १९९३ रोजी ‘चेक अ‍ॅण्ड स्लोव्हॅक फेडरेशन’चे विभाजन करण्यात येऊन, म्हणजेच थोडक्यात चेकोस्लोव्हाकियाची फाळणी करून चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया प्रजासत्ताक हे दोन स्वायत्त देश अस्तित्वात आले. देशाची ही फाळणी कुठेही दंगेधोपे न होता पूर्णपणे सामोपचाराने शांततेत, कटुता येऊ न देता पार पडली आणि त्यामुळे युरोपात या विभाजनाला ‘वेल्व्हेट डिव्होर्स’ म्हणजे ‘मखमली घटस्फोट’ असे नाव पडले! तीन वर्षांपूर्वी याच भूमीवर सोव्हिएतप्रणीत एकपक्षीय कम्युनिस्ट पक्षाकडून बहुपक्षीय प्रजासत्ताक सरकार असा सत्ताबदल कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी न होता पार पडला, त्याला ‘वेल्व्हेट रिव्होल्यूशन’ असे म्हटले गेले होते! फाळणीपूर्व चेकोस्लोव्हाकियात चेक वंशीय ५१ टक्के, स्लोव्हॅक १६ टक्के, जर्मन वंशीय २२ टक्के तर हंगेरियन ५ टक्के असे विविध वंशांचे मिश्रण होते.

चेक आणि स्लोव्हाक प्रजासत्ताके (नकाशाप्रमाणे) विलग झाली तरी ध्वजांवरचे रंग तेच राहिले आहेत- स्लोव्हाक ध्वजाच्या मधोमध क्रूसासारखे चिन्ह  आहे.